कोरोनामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेतून तिसरे महायुद्ध भडकेल – ब्रिटनच्या संरक्षणदलप्रमुखांचा इशारा

लंडन – कोरोनाच्या साथीमुळे निर्माण झालेली अनिश्चितता व अस्वस्थतेच्या काळात, जगात सध्या सुरू असलेल्या क्षेत्रिय संघर्षाचे रूपांतर तिसऱ्या महायुद्धात होण्याचा धोका आहे, असा गंभीर इशारा ब्रिटनच्या संरक्षण दलप्रमुखांनी दिला आहे. प्रादेशिक स्तरावरील तणावांचा सहजगत्या भडका उडून अनेक देश युद्धात खेचले जातात, हे इतिहासातील घडामोडींनी यापूर्वी दाखवून दिले आहे, याकडेही संरक्षणदलप्रमुख जनरल सर निक कार्टर यांनी लक्ष वेधले. आर्थिक संकट, जागतिक सत्तास्पर्धा व क्षेत्रिय संघर्षातून कधीही मोठ्या लष्करी संघर्षाची ठिणगी उडू शकते, हे लक्षात ठेऊन या धोक्यापासून ब्रिटनने कायम सज्ज रहावे, असेही जनरल कार्टर यांनी बजावले.

जनरल कार्टर यांनी एका ब्रिटीश वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिसऱ्या महायुद्धाच्या धोक्याबाबत इशारा दिला. यावेळी त्यांनी, युद्धाची भयावहता काय असते याची जाणीव ठेवली नाही तर पुढील काळात लोकांमध्ये युद्ध करणे योग्यच आहे, ही भावना वाढीस लागेल, अशी भीतीही व्यक्त केली. ‘कोरोनाच्या साथीमुळे जगात सध्या प्रचंड अनिश्चितता निर्माण झाली आहे. जग अस्वस्थ बनले आहे. जागतिक सत्तास्पर्धा व बदलती समीकरणे आपल्या जीवनाचा भाग बनला आहे. या क्षणाला जगाच्या विविध भागात सुरू असणारे क्षेत्रिय संघर्ष हा सर्वात मोठा धोका आहे. एखादे चुकीचे पाऊल या संघर्षांचे रूपांतर मोठ्या भडक्यात करु शकते. त्यातून महायुद्धाला तोंड फुटण्याचा धोका आहे आणि सर्वांनी या धोक्याबाबत सावध रहायला हवे’, या शब्दात ब्रिटीश संरक्षणदलप्रमुखांनी तिसऱ्या महायुद्धाबाबत बजावले.

युद्ध छेडणाऱ्यांना त्याच्या परिणामांची जाणीव नसते, असा दावाही त्यांनी केला. ‘एखादा क्षेत्रिय स्तरावरील वाद अथवा तणाव अचानक भडकतो. त्यात सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढत जाते. मोठ्या प्रमाणात शस्त्रांचा वापर सुरू होतो आणि यावर नियंत्रण मिळविण्यापूर्वीच सगळ्या बाजूंकडून सर्वंकष युद्धाला सुरुवात होते’, असा इशारा कार्टर यांनी दिला.

यावेळी जनरल कार्टर यांनी गेल्या शतकात झालेल्या दोन महायुद्धांकडेही लक्ष वेधले. ‘इतिहासाची कदाचित जशीच्या तशी पुनरावृत्ती होणार नाही. पण त्यातून पुढे घडणाऱ्या घटनांचा अंदाज येऊ शकतो. गेल्या शतकात झालेल्या दोन महायुद्धांचा विचार केला, तर त्यासाठी कारणीभूत ठरलेल्या घटना मोठ्या युद्धाचा भडका उडविण्यास कारण ठरू शकतात, असा दावा कोणीही करू शकले नसते. मात्र चूक घडली आणि आपण कल्पनाही करू शकणार नाही इतकी प्रचंड व्याप्ती असणाऱ्या युद्धांना तोंड फुटले’, याची जाणीव कार्टर यांनी करून दिली.

ब्रिटीश संरक्षणदलप्रमुखांनी कोणत्याही विशिष्ट देशाचा अथवा तणावाचा उल्लेख केला नाही. मात्र सध्या ‘साऊथ चायना सी’मध्ये असलेला तणाव, आखात व आफ्रिकेत सुरू असणारे संघर्ष, ग्रीस व तुर्कीमध्ये चाललेला वाद आणि आर्मेनिया-अझरबैजान युद्ध या घटना महायुद्धास कारणीभूत ठरू शकतात, असे दावे विश्लेषकांकडून यापूर्वी करण्यात आले आहेत.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info