वॉशिंग्टन/तैपेई – ज्यो बायडेन राष्ट्राध्यक्षपदी आल्यानंतर अमेरिकेच्या चीनविरोधी भूमिकेत बदल होईल, असा दावा काही विश्लेषकांकडून केला जात आहे. मात्र बायडेन चीनबाबत उदार धोरण स्वीकारणार नाहीत, असे संकेत मिळत आहेत. ज्यो बायडन यांचे लष्करी सल्लागार असलेले अमेरिकेचे माजी लष्करी अधिकारी जनरल स्टॅन्ले मॅक्क्रिस्टल यांनी चीनबाबत काढलेले उद्गार हेच सिद्ध करीत आहेत. ‘तैवानला चीनपासून असलेल्या धोक्याला अमेरिकेकडून प्रत्युत्तर देण्याची वेळ आलेली आहे’, असे मॅक्क्रिस्टल यांनी बजावले आहे.
‘चीनने गेल्या काही वर्षात आपले संरक्षणसामर्थ्य प्रचंड प्रमाणात वाढविले आहे. अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौकेला बुडवतील अशी हायपरसोनिक क्षेपणास्त्रे विकसित केल्याचे दावे चीनकडून करण्यात येत आहेत. त्यांच्याकडील वाढत्या लष्करी क्षमतेने त्या क्षेत्रातील समीकरणे बदलली आहेत. चीनचा विचार करताना बायडेन प्रशासनाला आत्मसंतुष्ट भूमिका घेऊन चालणार नाही. नाहीतर एक दिवस सकाळी जागे झाल्यावर, चीनने मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रांचा वर्षाव करून तैवान ताब्यात घेतला, असे ऐकण्याची वेळ येऊ शकते. हा हल्ला टाळण्यासाठी अमेरिकेने आता चीनकडून तैवानला असलेल्या धोक्याला प्रत्युत्तर देण्याची वेळ आली आहे’, या शब्दात जनरल स्टॅन्ले मॅक्क्रिस्टल यांनी संभाव्य संघर्षाची जाणीव करून दिली.
हे प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेने आपले संरक्षणसामर्थ्य वाढविण्याबरोबरच त्या क्षेत्रातील सहकारी तसेच भागीदार देशांनाही सहाय्य करून आघाडी मजबूत करायला हवी, असा सल्लाही बायडेन यांच्या सल्लागारांनी दिला आहे. चीनचा मुकाबला करायचा असेल तर अमेरिकेने एक आशियाई सत्ता असल्याप्रमाणे विचार करायला हवा, असेही जनरल मॅक्क्रिस्टल म्हणाले. त्याचवेळी ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्रात चीनच्या लष्करी आक्रमकतेला रोखण्यात बराच उशिर झाल्याचा इशाराही त्यांनी दिला. ‘चीनने आपल्या जहाजात वाफ भरून ते पूर्ण सज्ज ठेवले आहे. त्यामुळे ते अजून निघाले नसले तरी निघण्याच्या विचारात नक्कीच आहेत, हे लक्षात ठेवायला हवे’, या शब्दात पुढील काळात ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्रात संघर्षाची दाट शक्यता असल्याचे जनरल मॅक्क्रिस्टल यांनी बजावले.
सध्या राष्ट्राध्यक्ष नियुक्त ज्यो बायडेन यांचे सल्लागार म्हणून कार्यरत असणाऱ्या जनरल स्टॅन्ले मॅक्क्रिस्टल यांनी आखात तसेच अफगाणिस्तानमधील युद्धात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 1990-91 साली झालेल्या आखाती युद्धापासून आपली कारकिर्द सुरू करणाऱ्या मॅक्क्रिस्टल यांनी 2003 साली सुरू झालेले ‘इराक वॉर’ व त्यानंतर अफगाणिस्तानात तालिबानविरोधात सुरू असलेल्या संघर्षात निर्णायक जबाबदारी सांभाळली. 2009-10 मध्ये अफगाणिस्तानातील ‘अमेरिका-नाटो फोर्स’चे प्रमुख म्हणून काम केलेल्या जनरल मॅक्क्रिस्टल यांनी त्यानंतर निवृत्ती जाहीर केली होती.
बायडेन यांचे सल्लागार चीन-तैवान युद्धाबाबत वक्तव्य करीत असतानाच तैवानने अमेरिकेकडून 300 अतिरिक्त पॅट्रिऑट क्षेपणास्त्रे खरेदी करण्याचे संकेत दिले आहेत. तैवानच्या ‘एअरफोर्स कमांड’ने यासंदर्भात हालचाली सुरू केल्याची माहिती तैवानमधील ‘ॲपल डेलि’ या दैनिकाने दिली आहे. अमेरिकेने या खरेदीला मान्यता दिल्यास 2027 सालापर्यंत तैवानकडील पॅट्रिऑट क्षेपणास्त्रांची संख्या 650पर्यंत जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. काही महिन्यांपूर्वीच अमेरिकेने तैवानबरोबर ‘पॅट्रिऑट’ क्षेपणास्त्र यंत्रणा अद्ययावत करण्यासाठी 62 कोटी डॉलर्सचा करार केला होता. त्यानंतर पुन्हा तैवानने नव्या क्षेपणास्त्रांच्या खरेदीचे संकेत देणे लक्ष वेधून घेणारे ठरते.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |