चीन-तैवान संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिका व जपानमध्ये ‘सिक्रेट वॉरगेम्स’

वॉशिंग्टन/टोकिओ – चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी तैवान मुद्यावर दिलेल्या धमकीच्या पार्श्‍वभूमीवर, अमेरिका व जपानने गुप्तपणे युद्धसरावांना सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे. ‘द फायनान्शिअल टाईम्स’ या दैनिकाने यासंदर्भातील वृत्त दिले. अमेरिका व जपानमधील विश्‍वसनीय सूत्रांच्या आधारे हे वृत्त देत असल्याचा दावा दैनिकाने केला आहे.

‘सिक्रेट वॉरगेम्स’

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राजनैतिक पातळीवर तसेच संरक्षणक्षेत्रात तैवानला मोठ्या प्रमाणात सहकार्य करण्याचे धोरण राबविले होते. अमेरिकेच्या या धोरणात, इंडो-पॅसिफिकमधील इतर प्रमुख देशांनीही तैवानबरोबरील सहकार्य वाढविण्याच्या मुद्याचा समावेश होता.

त्यानुसार जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया या देशांनी तैवानबरोबर विविध पातळ्यांवर संबंध दृढ करण्यास सुरुवात केली आहे. तैवानच्या मुद्यावर संघर्ष भडकल्यास त्यात तैवानला समर्थन करण्याची भूमिका जपान व ऑस्ट्रेलियाने घेतली आहे. काही दिवसांपूर्वीच जपानच्या संरक्षणमंत्र्यांनी तैवानची सुरक्षा जपानशी जोडलेली आहे, अशी ग्वाही दिली होती.

सध्या अमेरिका व जपानमध्ये सुरू असलेले गुप्त ‘टेबलटॉप वॉरगेम्स’ही ट्रम्प यांच्या कालावधीत स्वीकारण्यात आलेल्या धोरणांचा भाग असल्याचे सांगण्यात येते. अमेरिकेच्या एका माजी अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, तैवानसाठी ‘इंटिग्रेटेड वॉर प्लॅन’ तयार करणे हा अमेरिका व जपानमधील ‘सिक्रेट वॉरगेम्स’चा भाग आहे. त्या अनुषंगाने अमेरिका, जपान व तैवानमध्ये माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी स्वतंत्र चौकटही तयार करण्यात येत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

‘टेबलटॉप वॉरगेम्स’बरोबरच साऊथ चायना सी व ईस्ट चायना सीमध्ये ‘डिझास्टर ट्रेनिंग’च्या नावाने सरावांचे आयोजन करण्यात येत असून, त्यामागेही तैवानसंदर्भातील योजनेचा सराव हाच हेतू असल्याचे ‘द फायनान्शिअल टाईम्स’च्या वृत्तात म्हटले आहे.

English    हिंदी

 

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info