लंडन/मॉस्को – नाटो व रशियातील संबंध रसातळाला गेले असून एखादा अपघात किंवा गैरसमजुतीतून दोघांमध्ये युद्धाचा भडका उडू शकतो, असा इशारा युरोपियन अभ्यासगटाने दिला आहे. एका पत्राद्वारे हे आवाहन करताना दोन्ही बाजूंमध्ये सुरक्षेच्या दृष्टिने यापूर्वी झालेले करार कालबाह्य झाल्याचा दावाही करण्यात आला. सध्या दोन्ही बाजूंना युद्ध नको असून त्यासाठी पारदर्शकता पाळून वाटाघाटींचा मार्ग कायम ठेवणे हाच महत्त्वाचा उपाय ठरतो, असा सल्लाही अभ्यासगटाने दिला आहे.
काही दिवसांपूर्वीच नाटोने आपल्या अहवालात रशिया हा अजूनही मोठा धोका असल्याचे स्पष्ट केले होते. हा धोका रोखण्यासाठी लष्करी तैनाती व सदस्य देशांमधील संरक्षण सहकार्यावर भर देण्याची आवश्यकताही व्यक्त करण्यात आली होती. त्यापूर्वी रशियाच्या वरिष्ठ नेत्यांनी नाटो सध्या ‘रशियाकडून असलेला धोका’ या एकाच सूत्रावर आपले अस्तित्त्व टिकवून असल्याची टीका केली होती. त्याचवेळी नाटो सदस्य देशांकडून रशियाच्या सीमेनजिक सुरू असलेल्या हालचालींवर बारकाईने लक्ष असल्याचा इशाराही दिला होता. गेल्या काही महिन्यात नाटो व रशियाची लढाऊ विमाने तसेच युद्धनौका यांच्या परस्परांच्या हद्दीनजिक हालचाली वाढल्याचेही समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर, ‘युरोपियन लीडरशिप नेटवर्क’ या अभ्यासगटाने, दोन्ही बाजूंनी परस्परांमधील संवाद वाढवावा असे आवाहन केले आहे. ‘नाटो व रशियामधील संबंध सातत्याने गुंतागुंतीचे व अस्वस्थ करणारे राहिले आहेत. शीतयुद्धानंतरच्या काळाचा विचार करता सध्या दोन बाजूंमधील संबंध पूर्णपणे रसातळाला गेले आहेत. गेल्या 30 वर्षात दोन्ही बाजूंना सुरक्षित ठेवणारे करारही कालबाह्य झाले आहेत किंवा फिस्कटले आहेत. त्यामुळे एखादा अपघात किंवा गैरसमजुतीतून दोन्ही बाजूंमध्ये युद्धाचा भडका उडू शकतो’, असा इशारा अभ्यासगटाने दिला.
दोन्ही बाजूंमध्ये तणाव का निर्माण झाला याच्या कारणांबाबत मतभेद असू शकतात, मात्र सध्या दोन्ही बाजूंना युद्ध नको आहे याकडे ‘युरोपियन लीडरशिप नेटवर्क’ने लक्ष वेधले. त्यामुळे दोन्ही बाजूंनी युद्ध टाळण्यावर भर द्यायला हवा, असे आवाहन करण्यात आले आहे. अमेरिका, रशिया व युरोपिय देशांनी ही बाब गांभीर्याने घ्यावी, असेही अभ्यासगटाने बजावलेे. गेले चार महिने अमेरिका, रशिया व युरोपिय देशांमधील माजी लष्करी व राजनैतिक अधिकारी तसेचे सुरक्षाविषयक तज्ज्ञ संघर्ष टाळण्याच्या विविध शक्यतांवर चर्चा करीत असल्याची माहितीही पत्रात देण्यात आली आहे.
दोन्ही बाजूंमध्ये कधीही युद्धाचा भडका उडण्याची शक्यता दिसत असल्याने ते चर्चेद्वारे टाळण्याचे प्रयत्न सुरू केल्याचेही ‘युरोपियन लीडरशिप नेटवर्क’कडून सांगण्यात आले. संवाद व चर्चेचे अधिकाधिक मार्ग खुले ठेवणे आणि परस्परांच्या लष्करी हालचालींबाबत पारदर्शकता बाळगणे यासारख्या उपायांच्या माध्यमातून रशिया व नाटोमधील तणाव कमी होऊ शकतो, असा दावा अभ्यासगटाचा भाग असलेल्या माजी अधिकाऱ्यांनी केला आहे. या अभ्यासगटात रशिया, ब्रिटन, जर्मनी, इटली या देशांच्या माजी परराष्ट्र व संरक्षणमंत्र्यांसह सुमारे 145 राजनैतिक अधिकारी व तज्ज्ञांचा समावेश आहे. त्यामुळे या अभ्यासगटाने दिलेला इशारा व संबंधित बाबी लक्ष वेधून घेणाऱ्या ठरत आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |