रशियाविरोधात सुरू केलेल्या प्रतिहल्ल्याच्या मोहिमेत युक्रेनच्या लष्कराला मोठे यश मिळाल्याचा दावा

- खेर्सन, खार्किव्ह व डोन्बासमधील काही भागांवर युक्रेनचा ताबा

मोठे यश

किव्ह/मॉस्को – युक्रेनच्या लष्कराने रशियाच्या ताब्यातील क्षेत्रात सुरू केलेल्या प्रतिहल्ल्यांच्या मोहिमेला मोठे यश मिळाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये युक्रेनच्या लष्कराने दक्षिणेतील खेर्सन प्रांतासह डोन्बास तसेच खार्किव्हमधील काही शहरांवर पुन्हा ताबा मिळविला आहे. डोन्बास व खेर्सनमधील काही क्षेत्रांमध्ये रशियन फौजेने बचावात्मक पवित्रा स्वीकारल्याचे रशियन मिलिटरी ब्लॉगर तसेच डोन्बासमधील बंडखोरांकडून सांगण्यात आले. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनीही युक्रेनच्या यशाचा उल्लेख करीत पुढील लक्ष्य क्रिमिआ असल्याचा इशारा दिला आहे.

मोठे यश

जुलै महिन्यात युक्रेनचे वरिष्ठ अधिकारी तसेच नेत्यांनी लवकरच रशियाविरोधात प्रतिहल्ले सुरू होतील, असे संकेत दिले होते. युक्रेनच्या या रशियाविरोधी कारवाईसाठी अमेरिकेने पुढाकार घेतल्याचे व त्यासाठी सहाय्याची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढविल्याचे समोर आले होते. युरोपमधील विविध तळांवर युक्रेनी पथकांना प्रशिक्षण देऊन प्रगत शस्त्रे व संरक्षण यंत्रणा युक्रेनी लष्कराला पुरविण्यात आल्या होत्या. त्याचवेळी अमेरिकी गुप्तचर यंत्रणा तसेच तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांकडूनही युक्रेनला सहकार्य करण्यात येत आहे. या जोरावरच युक्रेनने रशियाविरोधी मोहिमेची तीव्रता वाढविली असून त्याला आता यश मिळत असल्याचे समोर येत आहे.

रशियाच्या नियंत्रणाखाली असलेल्या डोनेत्स्क प्रांतातील रशियासमर्थक बंडखोर, रशिया तसेच युक्रेनमधील मिलिटरी ब्लॉगर्स, रशियन माध्यमे तसेच परदेशी विश्लेषकांकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, ईशान्य युक्रेनमधील खार्किव्ह प्रांतात असलेल्या व्हर्बिव्हका शहर युक्रेनने पुन्हा ताब्यात घेतले असून बॅलाकिलिआ शहराला वेढा घातला आहे. या क्षेत्रातील काही गावेदेखील युक्रेनच्या नियंत्रणाखाली आली आहेत. बॅलाकिलिआत सध्या दोन्ही फौजांदरम्यान घनघोर संघर्ष सुरू असल्याचे रशियन ब्लॉगर्सकडून सांगण्यात आले.

मोठे यश

डोन्बासमधील ओझर्न शहर युक्रेनच्या ताब्यात आले असून ‘सिव्हस्की डोनट्स’ नदीचे पात्रही युक्रेनी लष्कराने ओलांडले आहे. रशिया व समर्थक बंडखोरांच्या फौजा डोनेत्स्क प्रांतातील कोडेमा शहर राखण्यासाठी संघर्ष करीत असल्याचे डोनेत्स्क पीपल्स रिपब्लिकचे प्रमुख डेनिस पुशिलिन यांनी सांगितले. तर दक्षिणेकडील मोहिमेत खेर्सन प्रांतातील व्हिसोकोपिलिआ शहरासह दोन क्षेत्रांवर ताबा मिळविल्याची माहिती युक्रेनने दिली आहे. तर कॉस्ोम्का व बेझिमेन शहरासाठी रशियाविरोधात तीव्र संघर्ष पेटला असल्याचेही युक्रेनच्या संरक्षण विभागाकडून सांगण्यात आले. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी युक्रेनी फौजांना मिळालेल्या यशाचा उल्लेख करताना लवकरच क्रिमिआवरही विजयाचा झेंडा फडकेल, असे वक्तव्य केले.

दरम्यान, अमेरिकेने गुरुवारी युक्रेनला 67.5 कोटी डॉलर्सचे नवे संरक्षणसहाय्य जाहीर केले. जर्मनीत पार पडलेल्या एका बैठकीत अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी याची घोषणा केली. या सहाय्यात हॉवित्झर्स व अँटी टँक सिस्टिम्सचा समावेश आहे.

English      हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info