वॉशिंग्टन/मॉस्को/किव्ह – नव्या वर्षात रशिया युक्रेनविरोधातील मोहिमेची धार अधिक वाढवित असतानाच पाश्चिमात्य देशांनी युक्रेनला शस्त्रसहाय्य जाहीर करण्याचा सपाटा सुरू ठेवला आहे. गेल्याच महिन्यात अब्जावधी डॉलर्सच्या शस्त्रांची घोषणा केल्यानंतर अमेरिकेने पुन्हा एकदा युक्रेनला नव्या संरक्षणयंत्रणा पुरविण्याचे संकेत दिले आहेत. यात ‘ग्राऊंड लॉन्च्ड् स्मॉल डायमीटर बॉम्ब’(जीएलएसडीबी) क्षेपणास्त्रांसह सुमारे दोन अब्ज डॉलर्सच्या शस्त्रसामुग्रीचा समावेश असेल, असे अमेरिकी सूत्रांनी सांगितले. ‘जीएलएसडीबी’ क्षेपणास्त्रांचा पल्ला दीडशे किलोमीटर्सचा आहे. या क्षेपणास्त्रांच्या पुरवठ्याला मान्यता देऊन अमेरिकेने युक्रेनच्या रशियातील हल्ल्यांना एक प्रकारे मंजुरीच दिली असल्याचा दावा विश्लेषक करीत आहेत.
गेल्या महिन्यात जर्मनीतील रॅम्स्टेन एअरबेस या अमेरिकी तळावर युक्रेनला शस्त्रसहाय्य पुरविणाऱ्या ‘डिफेन्स कॉन्ट्रॅक्ट ग्रुप’ची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की व संरक्षणमंत्री ओलेक्सी रेझ्निकोव्ह यांनी वाढीव शस्त्रपुरवठ्याची मागणी केली होती. यावेळी अमेरिकेने रशिया पुन्हा नव्याने आक्रमणाची तयारी करीत असल्याचे सांगून युक्रेनला अधिक शस्त्रे देण्याची गरज असल्याचा मुद्दा मांडला होता. त्याचवेळी जोपर्यंत युक्रेनला गरज आहे तोपर्यंत अमेरिका शस्त्रपुरवठा सुरू ठेवेल, अशी ग्वाहीदेखील दिली होती. या बैठकीपूर्वीच अमेरिकेने युक्रेनला अडीच अब्ज डॉलर्सच्या शस्त्रसहाय्याची घोषणा केली होती.
त्यानंतर अवघ्या दहा दिवसांच्या अवधीत अमेरिकेने पुन्हा एकदा युक्रेनला मोठे शस्त्रसहाय्य देण्याची तयारी सुरू केली आहे. यात 150 किलोमीटर्सचा पल्ला असलेल्या ‘ग्राऊंड लॉन्च्ड् स्मॉल डायमीटर बॉम्ब’(जीएलएसडीबी) क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. ही क्षेपणास्त्रे अमेरिकेच्या ‘बोईंग’ कंपनीने विकसित केली असून त्याच्या निर्मितीत युरोपमधील ‘साब’ या कंपनीचाही समावेश आहे. त्यामुळे या क्षेपणास्त्रांचा पुरवठा वेगाने होईल, असा दावा करण्यात येतो. ‘जीएलएसडीबी’ क्षेपणास्त्रांचा पुरवठा हा युक्रेनकडून रशियात करण्यात येणाऱ्या हल्ल्यांसाठी सहाय्यक ठरेल, असा दावा विश्लेषक तसेच सूत्रांकडून करण्यात येतो.
‘जीएलएसडीबी’व्यतिरिक्त जॅवेलिन मिसाईल्सदेखील मोठ्या प्रमाणात पाठविण्यात येणार आहेत. तसेच ‘मल्टिपल लाँच रॉकेट सिस्टिम्स’, रडार्स व ‘पॅट्रिऑट’साठी लागणारी सहाय्यक यंत्रणा, तोफगोळे व सशस्त्र वाहनांचाही नव्या शस्त्रसहाय्यात समावेश असणार आहे. यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या ‘ब्रॅडले टँक्स’पैकी 60 टँक्स अमेरिकेने युक्रेनसाठी रवाना केल्याची माहितीही देण्यात आली आहे.
मात्र युक्रेनकडून सातत्याने मागणी करण्यात येत असलेल्या ‘आर्मी टॅक्टिकल मिसाईल सिस्टिम’ व ‘एफ-16’ लढाऊ विमानांना अमेरिकेने स्पष्ट नकार दिला आहे. ‘आर्मी टॅक्टिकल मिसाईल सिस्टिम’मधील क्षेपणास्त्रांचा पल्ला तब्बल 300 किलोमीटर्स आहे. यासह ‘एफ-16’चा पुरवठा रशिया-युक्रेन संघर्षाचा भडका अधिक तीव्र करणारा ठरेल, अशी भीती अमेरिकी तसेच युरोपियन वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिका व नाटोच्या शस्त्रपुरवठ्यावर रशियाच्या गुप्तचर प्रमुखांनी टीकास्त्र सोडले आहे.
‘अमेरिकेसह नाटो रशियाला पराभूत करण्याची स्वप्ने पहात आहेत. मात्र हे कधीच शक्य होणार नाही’, असे रशियाचे गुप्तचर प्रमुख सर्जेई नॅरिश्किन यांनी बजावले. दरम्यान, रशियाने डोन्बासमधील सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर असलेल्या बाखमतला वेढा घालण्यास सुरुवात केल्याचा दावा रशियन लष्कराकडून करण्यात आला. या शहरानजिकचे दोन महत्त्वाचे भाग रशियाने ताब्यात घेतले असून त्यानंतर वेढा घालण्याची मोहीम सुरू झाल्याचे सांगण्यात येते.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |