आखातात नव्याने बॉम्बर्स तैनात करून अमेरिकेचा इराणला इशारा

वॉशिंग्टन – अमेरिकेची अण्वस्त्रे वाहून नेणारी ‘बी-52एच’ दिर्घपल्ल्याची बॉम्बर्स विमाने आखातात दाखल झाली आहेत. अणुशास्त्रज्ञांच्या हत्येनंतर खवळलेला इराण आखातातील अमेरिकेच्या हितसंबंधांसाठी धोका ठरू शकतो. त्यामुळे इराणला इशारा देण्यासाठी या बॉम्बर्सची तैनात केल्याचे अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने जाहीर केले. गेल्या महिन्याभरात अमेरिकेने आखातात दुसऱ्यांदा बॉम्बर्स तैनात केले आहेत. दरम्यान, इराकमधील इराणसंलग्न दहशतवादी गट अमेरिकेच्या ठिकाणांवर हल्ले चढविण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.

अमेरिकेच्या लुईझियाना येथील बार्क्सडेल हवाईतळावर तैनात असलेली दोन ‘बी-52एच स्ट्रॅटोफोर्ट्‌ट्रेस’ बॉम्बर्स विमाने आखातात तैनात केली आहेत. सुमारे 36 तासांचे उड्डाण करून ही बॉम्बर्स विमाने आखातात दाखल झाल्याची बातमी अमेरिकी वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केली आहे. अल्प वेळात, लांब पल्ला गाठणे आणि नॉन-स्टॉप उड्डाण करण्याचे उद्दिष्ट या विमानांनी गाठल्याचा दावा अमेरिकेचे लष्करी अधिकारी करीत आहेत. आखाती देशांसाठी अमेरिकेने उभारलेल्या ‘सेंट्रल कमांड’ अर्थात ‘सेंटकॉम’चे प्रमुख जनरल फ्रँक मॅकेन्झी यांनी या तैनातीची माहिती देताना इराणला इशारा दिला.

‘कुठल्याही हल्ल्यावेळी अतिरिक्त लष्करी सामर्थ्य वेगाने तैनात करण्यास जगात कुठलाही देश अमेरिकेसारखा सक्षम नाही, हे अमेरिकेच्या विरोधकांनी लक्षात घ्यावे. अमेरिकेला युद्ध नको. पण कुठल्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिका सदैव सज्ज आहे’, असे जनरल मॅकेन्झी यांनी इराणचा थेट उल्लेख न करता बजावले. त्याचबरोबर, आखातातील अमेरिकेच्या अरब मित्रदेशांना आश्‍वस्त करण्यासाठी आणि आखातातील स्थैर्य व सुरक्षेसाठी ही तैनाती आवश्‍यक होती, असेही जनरल मॅकेन्झी यांनी सांगितले.

अमेरिकेत सध्या सत्ताबदलाचा काळ आहे. भावी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन पुढच्या महिन्यात 20 जानेवारी रोजी आपल्या पदभाराची शपथ घेतील. त्याचबरोबर इराकमधून अमेरिकेच्या सैन्यमाघारीची प्रक्रिया देखील सुरू आहे. अशा या बदलांच्या काळात सुरक्षेला असलेला धोका वाढला असून त्यासाठी ही तैनाती जरूरी असल्याचे जनरल मॅकेन्झी म्हणाले. अमेरिकेच्या या बॉम्बर्सच्या तैनातीमुळे कुठलेही चुकीचे पाऊल उचलण्याआधी शत्रूदेश आपल्या निर्णयावर नक्कीच विचार करील, असे ‘सेंटकॉम’च्या प्रमुखांनी बजावले.

हे दोन्ही बॉम्बर्स आखातात कुठल्या देशात तैनात होतील, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. पण पर्शियन आखातातून प्रवास करणाऱ्य या बॉम्बर्सना सोबत करण्यासाठी सौदी अरेबिया, कतार आणि बाहरिन या देशांनी आपली लढाऊ विमाने रवाना केली होती. दोन आठवड्यांपूर्वी देखील अमेरिकेने आपली बॉम्बर्स विमाने आखातात रवाना केली होती. सदर विमाने कतारमध्ये तैनात असल्याचा दावा केला जातो. तर अमेरिकेची ‘युएसएस निमित्झ’ ही महाकाय विमानवाहू युद्धनौका गेले काही दिवस अरबी समुद्र आणि पर्शियन आखाताच्या मध्यावर तैनात आहे.

दोन आठवड्यांपूर्वी इराणमध्ये ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ मोहसिन फखरीझादेह यांची हत्या झाल्यानंतर आखातातील या लष्करी हालचाली वाढल्या आहेत. आपल्या अणुशास्त्रज्ञाच्या हत्येसाठी इस्रायल आणि अमेरिका जबाबदार असल्याचा आरोप इराणचे नेते व अधिकारी करीत आहेत. इराणमधून तसेच आखातातील इराणसंलग्न दहशतवादी संघटनांकडून फखरीझादेह यांच्या हत्येचा सूड घेण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. इराकमधील ‘कतैब हिजबुल्लाह’ या इराणसंलग्न दहशतवादी गटाने अमेरिकेच्या हितसंबंधांवरील हल्ल्याची तयारी केल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अशा परिस्थितीत, अमेरिकेच्या बॉम्बर्सची ही तैनाती इराणला इशारा देणारी असल्याचा दावा केला जातो.

English  हिंदी

 

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info