रशिया बेलारुसमध्ये ‘टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स’ तैनात करणार

- राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची घोषणा

मॉस्को/मिन्स्क/किव्ह – येत्या काही महिन्यात रशिया आपले ‘टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स’ बेलारुसमध्ये तैनात करील, अशी घोषणा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केली. अण्वस्त्रांची ही तैनाती, ब्रिटनने युक्रेनला ‘डिप्लेटेड युरेनियम’चा वापर असलेले तोफगोळे पुरविण्याबाबत घेतलेल्या निर्णयाला प्रत्युत्तर असल्याचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी स्पष्ट केले. १९९०च्या दशकानंतर रशियाने आपली अण्वस्त्रे रशियाबाहेरील देशात तैनात करण्याची ही पहिलीच वेळ असेल. पुतिन यांच्या या निर्णयावर युक्रेनने टीकास्त्र सोडले असून अमेरिकेने सावध प्रतिक्रिया नोंदविली आहे.

‘टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स’

रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासह रशियाच्या वरिष्ठ नेत्यांनी रशियाच्या अण्वस्त्रसज्जतेचा वारंवार उल्लेख केला होता. रशियाला पराभूत करण्याच्या योजना आखणाऱ्यांनी हा अण्वस्त्रसज्ज देश आहे, हे विसरू नये असे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी उघडपणे बजावले होते. तर रशियाच्या काही नेत्यांसह लष्करी अधिकाऱ्यांनी रशियाने युक्रेनमध्ये ‘टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स’चा वापर करावा, अशी आग्रही मागणीही केली होती. युक्रेनबरोबरील संघर्ष सुरू असतानाच रशियाने दोनदा प्रगत अण्वस्त्रांच्या चाचण्या घेतल्या होत्या. आपल्या ‘न्यूक्लिअर फोर्सेस’ना ॲलर्टवर राहण्याचे आदेशही रशियन राष्ट्राध्यक्षांनी दिले होते.

‘टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स’

त्याचवेळी दुसऱ्या बाजूला पुतिन यांनी बेलारुसबरोबरील संरक्षणसहकार्य वाढविण्यावर भर दिला होता. युक्रेनबरोबरील संघर्ष सुरू असतानाच राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासह संरक्षणमंत्री सर्जेई शोईगू व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बेलारुसचा दौरा केला होता. दोन देशांमध्ये संरक्षण सहकार्य वाढविण्याबाबत करारही झाले होते. त्यात रशियन संरक्षणदलांसह क्षेपणास्त्रे तसेच हवाई सुरक्षा यंत्रणेच्या तैनातीचीही तरतूद होती.

करारानुसार, रशियाने जवळपास १० हजार जवान बेलारुसमध्ये तैनात केले आहेत. त्याचवेळी ‘एस-४०० डिफेन्स सिस्टिम’ व इस्कंदर क्षेपणास्त्रेही बेलारुसमध्ये तैनात करण्यात आली. बेलारुसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी काही महिन्यांपूर्वी रशियाकडे अण्वस्त्रांची मागणी केली होती. बेलारुसच्या या मागणीनुसार, रशिया अण्वस्त्रे तैनात करणार असल्याचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी मुलाखतीत स्पष्ट केले. जुलै महिन्यापर्यंत बेलारुसमध्ये अण्वस्त्रांच्या ‘स्टोरेज’साठी उभारण्यात येणाऱ्या तळाचे काम पूर्ण होणार असून त्यानंतर रशियन अण्वस्त्रे बेलारुसमध्ये तैनात होतील, असे पुतिन यांनी सांगितले.

‘टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स’

बेलारुसमध्ये अण्वस्त्रांची तैनाती आंतरराष्ट्रीय नियमांना धरूनच असल्याचा दावाही रशियन राष्ट्राध्यक्षांनी केला. ‘बेलारुसमधील तैनातीत नवीन काहीच नाही. अमेरिका गेली अनेक दशके अशा प्रकारची तैनाती करीत आला आहे. अमेरिकेने त्याच्या मित्रदेशांमध्ये अण्वस्त्रे तैनात केली आहेत. आम्हीही तेच करीत असून कोणत्याही नियमांचा भंग होणार नाही. अण्वस्त्रप्रसारबंदी संदर्भात दिलेल्या वचनांचे रशिया पालन करील’, असे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी बेलारुसमध्ये तैनात केलेल्या अण्वस्त्रांचे नियंत्रण पूर्णपणे रशियाकडेच असेल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

रशियन राष्ट्राध्यक्षांनी अण्वस्त्रतैनातीबाबत केलेल्या घोषणेवर युक्रेनने टीकास्त्र सोडले आहे. रशियाने बेलारुसला ‘न्यूक्लिअर होस्टेज’ बनविले असून नवी घोषणा अधिक अस्थैर्य निर्माण करणारी आहे, अशी टीका युक्रेनच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी केली. अमेरिकेने या मुद्यावर सावध प्रतिक्रिया नोंदविली. रशिया व बेलारुसमध्ये गेल्या काही महिन्यांपासून अण्वस्त्रांच्या तैनातीवर चर्चा सुरू होती. असे असले तरी सध्या रशिया अण्वस्त्रांचा वापर करील, असे कोणतेही संकेत दिसत नाहीत, असे बायडेन प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info