लंडन/मॉस्को – दोन वर्षांपूर्वी रशियाने ब्रिटनमध्ये केलेल्या रासायनिक हल्ल्यांची आठवण करून देत, रशिया पुन्हा रासायनिक हल्ला घडवून हजारो जणांचे बळी घेऊ शकतो, असा इशारा ब्रिटनचे संरक्षणमंत्री बेन वॉलेस यांनी दिला. गेल्या काही महिन्यात रशियाचे वर्तन नेहमीप्रमाणे राहिले नसल्याची जाणीवही त्यांनी यावेळी करून दिली. काही दिवसांपूर्वीच रशियाच्या काही युद्धनौका व पाणबुड्या ब्रिटनच्या सागरी हद्दीनजिक धोकादायकरित्या वावरताना आढळल्या होत्या.
गेल्या काही वर्षात ब्रिटन व रशियामधील संबंध अधिकाधिक तणावपूर्ण होताना दिसत आहेत. २०१४ साली रशियाने युक्रेनवर हल्ला करून क्रिमिआवर ताबा मिळविल्यानंतर ब्रिटनने रशियाविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. ब्रिटीश सरकारकडून रशियाबरोबरील लष्करी सहकार्य थांबवून निर्बंधांची घोषणा करण्यात आली होती. ब्रिटनमध्ये ‘स्कॉटलंड’ तसेच ‘ब्रेक्झिट’च्या मुद्यावर झालेल्या सार्वमतादरम्यान रशियाने हस्तक्षेपाचे प्रयत्न केल्याचे दावेही करण्यात आले होते. त्यानंतर २०१८ साली ब्रिटनमध्ये वास्तव्यास असलेले माजी रशियन गुप्तहेर सर्जेई स्क्रिपल व त्यांची मुलगी युलिया यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला होता.
स्क्रिपल व त्यांच्या मुलीला मारण्यासाठी ‘नोव्हिचोक’ या रासायनिक घटकाचा वापर करण्यात आला होता. या रासायनिक हल्ल्यातून दोघेही बचावले असले तरी एका ब्रिटीश महिलेचा बळी गेला होता. सदर घटनेनंतर ब्रिटन व रशियातील संबंध चांगलेच चिघळले असून ब्रिटनने आपल्याकडील २३ रशियन राजनैतिक अधिकार्यांची हकालपट्टी केली होती. त्यापूर्वी २००६ साली रशियाने ब्रिटनमध्ये वास्तव्यास असलेला माजी गुप्तहेर अलेक्झांडर लितविनेन्को याचीही रासायनिक हल्ल्याच्या माध्यमातून हत्या केली होती. काही महिन्यांपूर्वी रशियातील राजकीय नेते अॅलेक्स नॅव्हल्नी यांच्यावरही ‘केमिकल एजंट’चा वापर झाल्याची घटना उघड झाली होती.
संरक्षणमंत्री बेन वॉलेस यांनी स्क्रिपल यांच्यावर झालेल्या हल्ल्याकडे लक्ष वेधताना रशिया त्याच प्रकारचा हल्ला ब्रिटनमध्ये घडवून आणू शकतो, असा इशारा दिला. ‘रशिया ब्रिटनच्या रस्त्यांवर वेगळ्या पद्धतीने नर्व्ह एजंटचा वापर करून हजारो जणांचे बळी घेऊ शकतो’, असे वॉलेस यांनी बजावले. यावेळी त्यांनी रशियाचे सध्याचे वर्तन बदलले असल्याचीही जाणीव करून दिली. ‘ब्रिटनकडून रशियाला सातत्याने त्यांचे वर्तन बदलण्याबाबत तसेच आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. तसे घडले तर ब्रिटन व रशियामध्ये चांगले संबंध प्रस्थापित होण्याची अपेक्षा आहे’, असे संरक्षणमंत्री वॉलेस म्हणाले.
ब्रिटनमध्ये गेल्या काही दिवसात कोरोनाच्या साथीचा फैलाव वाढत असल्याचे दिसत आहे. त्याचवेळी ‘ब्रेक्झिट’ची प्रक्रियाही अंतिम टप्प्यात असून त्यावरून असलेली अनिश्चितताही वाढते आहे. चीन व रशियासारखे देश या परिस्थितीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करु शकतात, असे ब्रिटनमधील अभ्यासगट तसेच विश्लेषकांकडून सातत्याने बजावण्यात येत आहे. ब्रिटनच्या गुप्तचर प्रमुखांनी नुकताच चीन हा ब्रिटनच्या सुरक्षेसाठी सर्वात मोठा धोका असल्याचा उल्लेख केला होता. त्यानंतर आता संरक्षणमंत्र्यांनी रशियन हल्ल्याच्या धोक्याकडे लक्ष वेधणे महत्त्वाचे ठरते.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |