वॉशिंग्टन – अमेरिकेवर झालेल्या अभूतपूर्व सायबरहल्ल्यामागे रशियाच असल्याचे स्पष्ट झाले असून आता अमेरिकेने या हल्ल्याला ‘जशास तसे’ प्रत्युत्तर द्यायला हवे, अशी आक्रमक मागणी सिनेटर मार्को रुबिओ यांनी केली. सिनेटर रुबिओ हे अमेरिकी संसदेच्या ‘इंटेलिजन्स कमिटी’चे प्रमुख असल्याने त्यांचे हे वक्तव्य लक्ष वेधून घेणारे ठरते. गेल्या आठवड्यात अमेरिकेवर झालेल्या सायबरहल्ल्यामागे रशियाचा हात असल्याची कबुली परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी शुक्रवारी दिली होती.
‘अमेरिकेवर झालेल्या सायबरहल्ल्यांची व्याप्ती अजूनही स्पष्ट झालेली नाही. पण हा हल्ला अभूतपूर्व असून जगातील निवडक देशांकडेच ही क्षमता असल्याचे यापूर्वी दिसून आले आहे. ज्या प्रकारे हल्ला झाला आहे, ती पद्धत रशियाकडून सायबरक्षेत्रात करण्यात येणार्या कारवायांशी मिळतीजुळती आहे. हल्ल्यांमागे कोण आहे, याबद्दल आपण ठाम आहोत आणि ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. आता फक्त निर्बंध लादून चालणार नाही तर अमेरिकेने प्रतिहल्ला चढवायला हवा’, अशी आक्रमक मागणी सिनेटर रुबिओ यांनी केली.
‘रशियन यंत्रणांनी चढविलेला हल्ला अमेरिकेच्या इतिहासातील अतिशय भयानक हल्ला असून त्याचे परिणाम अजून समोर आलेले नाहीत. या धोक्यातून पूर्णपणे बाहेर पडण्यासाठी प्रचंड स्रोत व वेळ आवश्यक आहे. मात्र अमेरिकेने या हल्ल्याविरोधात जबरदस्त व जशास तसे प्रत्युत्तर द्यायलाच हवे’, असे मार्को रुबिओ यांनी बजावले. रुबिओ अमेरिकी संसदेतील ‘सिनेट इंटेलिजन्स कमिटी’चे प्रमुख असून या समितीवर अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी आहे.
दोन वर्षांपूर्वी व्हाईट हाऊसने अमेरिकी यंत्रणांना परदेशी धोक्यांविरोधात सायबर प्रतिहल्ले चढविण्याची परवानगी दिली होती. त्यासाठी ‘सायबर वेपन्स’चा वापर करण्यासही मान्यता देण्यात आली होती. या मंजुरीनंतर अमेरिकेच्या सायबर कमांडने रशिया तसेच इराणविरोधात आक्रमक सायबर मोहिमा राबविल्याचेही उघड झाले होते. गेल्या वर्षी अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी चीनच्या कारवायांविरोधातही अशा हल्ल्यांचा वापर होऊ शकतो, असे संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर रुबिओ यांनी केलेली मागणी लक्ष वेधून घेणारी ठरते.
दरम्यान, ब्रिटनचे लष्करप्रमुख जनरल सर निक कार्टर यांनी रशिया व चीनच्या धोक्याचा उल्लेख करून त्यांना सायबरक्षेत्रात प्रत्युत्तर देण्याची क्षमता आवश्यक असल्याचे बजावले आहे. नजिकच्या काळात ब्रिटनच्या सुरक्षेसाठी रशिया व चीन हे दोन्ही देश प्रमुख आव्हान तसेच मोठा धोका असतील, असा स्पष्ट इशारा जनरल कार्टर यांनी दिला. या दोन्ही देशांना पराभूत करण्यासाठी नव्या धोरणांची गरज असून त्यांना त्यांच्याच खेळात मात द्यायला शिकायला हवे, असे ब्रिटनच्या लष्करप्रमुखांनी म्हटले आहे.
रशिया व चीनविरोधातील धोरण आखताना सायबर क्षेत्र आणि माहितीचा प्रसार यावर विशेष लक्ष द्यायला हवे, असे कार्टर यांनी सांगितले. युद्धाचा भडका उडणार नाही, अशा रितीने सायबरक्षेत्रात प्रत्युत्तर देणार्या क्षमता विकसित कराव्या लागतील, असा सल्लाही जनरल कार्टर यांनी दिला.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |