रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यास अमेरिका व मित्रदेश निर्णायक प्रत्युत्तर देतील

- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांचे युक्रेनला आश्‍वासन

वॉशिंग्टन/मॉस्को/किव्ह – रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यास अमेरिका व मित्रदेश रशियाला निर्णायक प्रत्युत्तर देतील, असे आश्‍वासन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दिले आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्याबरोबर झालेल्या फोनकॉलदरम्यान हे आश्‍वासन देण्यात आल्याची माहिती व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांनी दिली. गेल्याच आठवड्यात अमेरिका व रशियाच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये फोनवरून चर्चा झाली होती. त्यात अमेरिकेने रशियाला कठोर निर्बंध लादण्याचा इशारा दिला होता.

अमेरिका व मित्रदेश

रशियाने युक्रेनच्या सीमेवर सुमारे एक लाख जवान तैनात केल्याचा दावा अमेरिका व युक्रेनकडून करण्यात आला आहे. ही तैनाती युक्रेनवरील नव्या आक्रमणाची तयारी असल्याचे इशारे पाश्‍चात्य नेते तसेच विश्‍लेषकांकडून देण्यात येत आहेत. रशियाने हे दावे फेटाळले असून अमेरिका व पाश्‍चात्य देश विनाकारण परिस्थिती चिघळविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे प्रत्युत्तर दिले आहे. त्याचवेळी युक्रेनवरून निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी ‘सिक्युरिटी पॅक्ट`चाही प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन व पुतिन यांच्यात फोनवरून चर्चा झाली आहे. त्याचवेळी पुढील आठवड्यात अमेरिका व रशियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे.

या पार्श्‍वभूमीवर बायडेन यांनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना केलेला कॉल लक्ष वेधून घेणारा ठरतो. यावेळी बायडेन यांनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना सुरक्षेच्या मुद्यावर आश्‍वस्त केल्याची माहिती व्हाईट हाउसच्या प्रवक्त्या जेन साकि यांनी दिली. ‘रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यास अमेरिका, अमेरिकेचे मित्रदेश व सहकारी रशियाला निर्णायकरित्या प्रत्युत्तर देतील, असे वचन अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी दिले आहे`, असे साकी यांनी सांगितले. त्याचवेळी युक्रेनला विश्‍वासात घेतल्याशिवाय अंतिम निर्णय घेणार नसल्याचेही बायडेन यांनी झेलेन्स्की यांना सांगितल्याचे प्रवक्त्यांनी स्पष्ट केले.

अमेरिका व मित्रदेश

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये युरोपमधील शांतता व चिथावणीखोर कारवाया रोखणे यासारख्या मुद्यांवर चर्चा झाल्याचे नमूद केले. त्याचवेळी अमेरिका व मित्रदेशांकडून देण्यात आलेल्या समर्थनाबद्दल आभार व्यक्त केले आहेत. दरम्यान, रशिया व चीनकडून सुरू असलेल्या आक्रमक कारवायांच्या पार्श्‍वभूमीवर बायडेन यांच्याकडून अण्वस्त्र धोरणात होणारे संभाव्य बदल लांबणीवर पडल्याचे वृत्त आहे. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी सत्तेची सूत्रे स्वीकारल्यानंतर अण्वस्त्रांबाबत ‘नो फर्स्ट युज` किंवा ‘सोल पर्पज्‌‍` असे बचावात्मक धोरण स्वीकारण्याचे संकेत दिले होते. मात्र चीनकडून तैवानवर व रशियाकडून युक्रेनवरील हल्ल्याची शक्यता लक्षात घेता बायडेन बचावात्मक धोरण स्वीकारण्याची चूक करणार नाहीत, असा दावा विश्‍लेषक करीत आहेत. आता धोरणात बदल केल्यास बायडेन यांचे विरोधक, रशिया व चीनच्या मुद्यावर त्यांची कोंडी करतील, असे विश्‍लेषकांनी म्हटले आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info