बीजिंग – येत्या काळात ‘ईस्ट तसेच साऊथ चायना सी’च्या सागरी क्षेत्रासाठी धोकादायक ठरणार्या परदेशी जहाजांवर ‘पिपल्स लिबरेशन आर्मी’च्या तटरक्षकदल थेट कारवाई करणार आहे. चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने तसा कायदा संमत करून तटरक्षक दलाला आदेश दिले आहेत. चीनचा कायदा या सागरी क्षेत्राचा वापर करणार्या देशांसाठी इशारा असल्याचा दावा केला जातो. काही तासांपूर्वीच जपानने ‘साऊथ चायना सी’मधील चीनच्या अरेरावीवर टीका केली होती. तसेच जपानने चीनच्या विरोधात अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी सहकार्य करावे असे आवाहन केले होते.
काही तासांपूर्वी चीनच्या ‘नॅशनल पिपल्स काँग्रेस’ची बैठक पार पडली. यामध्ये चीनच्या तटरक्षकदलासाठी विशेष कायदा संमत करण्यात आला आहे. यानुसार चीनच्या तटरक्षक दलाला परदेशी जहाजांच्या विरोधात शस्त्राचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ‘ईस्ट व साऊथ चायना सी क्षेत्रात परदेशी संघटना किंवा व्यक्तीकडून चीनचे सार्वभौमत्त्व, सार्वभौम अधिकार किंवा सागरी क्षेत्रांना धोका निर्माण झाला तर त्याविरोधात शस्त्राचा वापर करा’, असे आदेश या कायद्याद्वारे चीनने दिले आहेत. चीनच्या सरकारी मुखपत्राने यासंबंधीची बातमी प्रसिद्ध केली आहे.
यात विशेष काही नसून चीनच्या सार्वभौमत्त्वाच्या सुरक्षेसाठी तटरक्षकदलाला हे अधिकार दिल्याची माहिती चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी दिली. त्याचबरोबर जपानचे प्रशासन असलेल्या सेंकाकू द्विपसमुहावर देखील चीनचा अधिकार असल्याचा दावा चुनयिंग यांनी यावेळी केला. चीनच्या मुखपत्राशी संबंधित लष्करी विश्लेषकांनी देखील सागरी सुरक्षेबाबात आंतरराष्ट्रीय कायद्यांमध्ये विशेष नियम नसल्याचे सांगून चीनच्या राजवटीच्या कायद्यांचे समर्थन केले. त्याचबरोबर चीनच्या तटरक्षकदलाने सेंकाकूच्या द्विपसमुहाजवळ यापुढे नियमित गस्त घालावी, असेही एका विश्लेषकाने सुचविले आहे.
काही तासांपूर्वीच अमेरिका आणि जपानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची भेट पार पडली होती. या भेटीत जपानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिगेरू कितामूरा यांनी ‘ईस्ट व साऊथ चायना सी’मधील चीनच्या आक्रमकतेचा मुद्दा उपस्थित केला. त्याचबरोबर येत्या काळातही बायडेन यांच्या नव्या प्रशासनाने अमेरिका व जपानमधील सागरी सुरक्षेविषयक सहकार्य कायम ठेवावे, असे आवाहन कितामूरा यांनी केले. तर अमेरिकेने देखील या सागरी क्षेत्रात युद्धनौका रवाना केली होती. कम्युनिस्ट राजवटीने घेतलेल्या निर्णयाचे समर्थन करताना, चीनच्या मुखपत्राने या दोन्ही घटनांचा उल्लेख केला.
दरम्यान, तटरक्षक दलाला लष्करी कारवाईचे अधिकार देणार्या चीनने ‘साऊथ चायना सी’मधील आपला प्रभाव वाढविण्यासाठी मोठ्या हालचाली केल्याचा दावा अमेरिकी अभ्यासगटाने केला आहे. पॅरासेल आणि स्प्रार्टले द्विपसमुहांच्या सागरी क्षेत्रातील घडामोडींवर नियंत्रण ठेवण्यासाठी चीनने हैनान बंदरात पाणबुडीचे मोठे तळ विकसित केले आहे. चीनच्या या बंदराचे सॅटेलाईट फोटोग्राफ्स या अभ्यासगटाने प्रसिद्ध केले आहेत. सदर नौदलतळ हा ‘साऊथ चायना सी’मधील चीनचे वर्चस्व वाढविणारा ठरेल, असा इशारा या अभ्यासगटाने दिला आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |