अफगाणी लष्कराच्या कारवाईत 24 तासात अडीचशे तालिबानी ठार

  • तालिबानच्या मॉर्टर हल्ल्यात पाच जणांचा बळी
  • कंदहार विमानतळावर तालिबानचे रॉकेट हल्ले

काबुल – अफगाणिस्तानच्या लष्कराने केलेल्या कारवाईत गेल्या 24 तासात 254 तालिबानी दहशतवादी ठार झाले. तर तालिबानने कंदहार येथील विमानतळावर रॉकेट हल्ले चढविल्याचे वृत्त आहे. याआधी हेरात व हेल्मंड या प्रांतांच्या राजधान्या ताब्यात घेण्यासाठी तालिबानने हल्ला चढविल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण हेरातची राजधानी तालिबानच्या हाती पडू नये, यासाठी अफगाणी लष्कराने नवी कुमक धाडली आहे.

24 तासात

अफगाणिस्तानच्या लष्कराने तालिबानच्या विरोधात आत्तापर्यंतची सर्वात मोठी लष्करी कारवाई सुरू केल्याचा दावा स्थानिक माध्यमे करीत आहेत. तालिबानने ताब्यात घेतलेले जिल्हे, भाग तसेच सीमाचौक्या पुन्हा नियंत्रणाखाली आणण्यासाठी अफगाणी लष्कराने विमाने, हेलिकॉप्टर्स यांच्याबरोबर तालिबानविरोधात स्थानिक टोळ्यांची मोठी आघाडी उभी केली आहे. गेल्या चोवीस तासात अफगाणी लष्कराने 13 प्रांतात केलेल्या कारवाईत तालिबानच्या किमान 254 दहशतवाद्यांना ठार केल्याचे जाहीर केले. यामध्ये राजधानी काबुलसह कंदहार, हेरात, हेल्मंड, गझनी, कुंदूझ, कपिसा या प्रांतातील कारवायांचा समावेश आहे.

यापैकी हेल्मंड आणि कंदहार प्रांतात अफगाणी लष्कराने तालिबानच्या ठिकाणांवर जोरदार हवाई हल्ले चढविले. हेल्मंडमधील कारवाईत 51 दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. तर हेरात शहरात अफगाणी लष्कर, स्थानिक टोळ्यांनी तालिबानवर चढविलेल्या हल्ल्यांमध्ये किमान शंभर दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा स्थानिक अधिकार्‍याने केला. हेरातच्या सुरक्षेसाठी अफगाणी लष्कराची विशेष तुकडी येथे दाखल झाल्याचे फोटो अफगाणी संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केले. त्याचबरोबर तालिबानने अफगाणी जनतेला आणि महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य केल्याचा आरोप अफगाण सरकारने केला.

24 तासात

तालिबानच्या दहशतवाद्यांनी शनिवारी रात्री कंदहार शहरातील सर्वात महत्वाच्या विमानतळावर रॉकेट हल्ले चढविले. या हल्ल्यात जीवितहानी झाली नाही. पण पायाभूत सुविधांचे नुकसान करणार नाही, असे कबुल करणार्‍या तालिबानने दोहा कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप अफगाणी सरकारने केला.

कंदहार विमानतळाचा वापर आपल्या सहकार्‍यांवरील हल्ल्यासाठी झाल्याने, या विमानतळाला लक्ष्य केल्याचे तालिबानचा प्रवक्ता झबिहुल्ला मुजाहिद याने म्हटले आहे. तालिबान विमानतळावर हल्ला करून थांबले नाही, तर शहरात मॉर्टर हल्ले चढवून दहशतवाद्यांनी पाच जणांचा बळी घेतला. यामध्ये दोन मुलांचा समावेश असल्याचा संताप अफगाण सरकारने व्यक्त केला आहे.

English  हिंदी 

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info