‘ईस्ट चायना सी’मध्ये संयुक्त युद्धसरावाची घोषणा करून जपान व ब्रिटनचा चीनला इशारा

‘ईस्ट चायना सी’मध्ये संयुक्त युद्धसरावाची घोषणा करून जपान व ब्रिटनचा चीनला इशारा

टोकिओ/लंडन – ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्राच्या गस्तीसाठी रवाना होणारी ब्रिटनची विमानवाहू युद्धनौका जपानबरोबरच्या युद्धसरावात सहभागी होणार आहे. जपान आणि ब्रिटनच्या परराष्ट्र व संरक्षण मंत्र्यांमध्ये झालेल्या ‘टू-प्लस-टू’च्या बैठकीत ही घोषणा केली. जपान व ब्रिटनची ही घोषणा चीनसाठी इशारा ठरते. तसेच ‘ईस्ट तसेच साऊथ चायना सी’च्या क्षेत्रातून प्रवास करणार्‍या परदेशी जहाजांवर लष्करी कारवाईचा कायदा करणार्‍या चीनवर ब्रिटनच्या नेत्यांनी टीका केली. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील लोकशाहीवादी देशांच्या आघाडीत सहभागी होण्याची तयारी ब्रिटनने याआधीच दाखविली होती.

जपानचे परराष्ट्रमंत्री तोशिमित्सू मोतेगी आणि संरक्षणमंत्री नोबुओ किशी तर ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डॉमनिक राब आणि संरक्षणमंत्री बेन वॉलेस यांच्यात नुकतीच व्हिडिओकॉन्फरन्सद्वारे बैठक पार पडली. तीन वर्षानंतर पहिल्यांदाच पार पडलेल्या या टू-प्लस-टू बैठकीत चारही नेत्यांमध्ये ईस्ट तसेच साऊथ चायना सी, हाँगकाँग, उघूरवंशिय, तैवानच्या मुद्यावर चर्चा झाली. समान मूल्ये आणि सामरिक हितसंबंधांच्या आघाडीवर ब्रिटन व जपानमध्ये एकमत असल्याचे ब्रिटनने यावेळी जाहीर केले.

ब्रिटनच्या नौदलातील ‘एचएमएस क्विन एलिझाबेथ’ या विमानवाहू युद्धनौकेची गस्त इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील आपल्या मित्रदेशांबाबतची आपली वचनबद्धता दाखवून देणारी असल्याचे संरक्षणमंत्री वॉलेस म्हणाले. या सागरी क्षेत्रातील वाहतूक आंतरराष्ट्रीय नियमांवर आधारीत व सुरक्षा आणि समृद्धीला प्रोत्साहित करणारी असावी, अशी टिपणी करून ब्रिटनच्या संरक्षणमंत्र्यांनी चीनला लक्ष्य केले. ‘ईस्ट व साऊथ चायना सी’च्या क्षेत्रावरील वर्चस्वासाठी चीनने तयार केलेल्या कायद्यावरही ब्रिटनने चिंता व्यक्त केली.

तर ब्रिटन आणि जपानच्या युद्धसरावात ‘एचएमएस क्विन एलिझाबेथ’ युद्धनौकचा सहभाग अतिशय महत्त्वाचा असल्याचे जपानने म्हटले आहे. साधारण महिन्याभरापूर्वी ब्रिटनने ‘एफ-३५’ विमानांनी सज्ज असलेली आपली विमानवाहू युद्धनौका ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्रासाठी रवाना करण्याची घोषणा केली होती. या वर्षाच्या अखेरीपर्यंत आपली युद्धनौका सदर सागरी क्षेत्रात दाखल होईल, असे ब्रिटनने म्हटले होते. ब्रिटनच्या या घोषणेवर चीनने जोरदार टीका केली होती. त्याचबरोबर ब्रिटनच्या या तैनातीविरोधात योग्य ती कारवाई करणार असल्याचा इशारा चीनने दिला होता.

युरोपिय महासंघातून ‘एक्झिट’ घेतलेल्या ब्रिटनने गेल्या काही आठवड्यांपासून इंडो-पॅसिफिक क्षेत्राकडे आपले लक्ष वळविले आहे. त्याचबरोबर चीनच्या वाढत्या आक्रमकतेविरोधातही ब्रिटनमधील बोरीस जॉन्सन यांचे सरकार भूमिका घेत आहे. फ्रान्सने देखील ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्रात भारत व ऑस्ट्रेलियासह नवी आघाडी उघडण्याची घोषणा केली होती. गेल्या वर्षी यासंबंधी तिनही देशांच्या नेत्यांमध्ये व्हर्च्युअल बैठकही पार पडली होती.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info