राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या हाती केंद्रित झालेली सत्ता चीनसाठी धोकादायक

‘एचके पोस्ट’च्या लेखात इशारा

बीजिंग – राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या हाती केंद्रित झालेली सत्ता चीनची अर्थव्यवस्था तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रभावाच्या दृष्टिने धोकादायक ठरु शकते, असा इशारा ‘एचके पोस्ट’ या वेबसाईटवरील लेखात देण्यात आला आहे. दोन आठवड्यांपूर्वी चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीने विशेष ठराव मंजूर केला होता. या ठरावामुळे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची देशावरील पकड अधिक घट्ट झाल्याचे सांगण्यात येते.

केंद्रित झालेली सत्ता

‘जिनपिंग यांच्या एकाधिकारशाहीवर शिक्कामोर्तब झाल्याने कम्युनिस्ट पार्टीतील इतर महत्त्वाकांक्षी नेत्यांसमोरील चिंता वाढल्या आहेत. जिनपिंग यांच्या काळात कम्युनिस्ट राजवटीची आक्रमकता व संरक्षणसामर्थ्यही वाढते आहे. त्यामुळे शेजारी देश व पाश्‍चात्य जगातही चिंतेचे वातावरण आहे’, असे लेखात बजावण्यात आले आहे.

जिनपिंग यांच्याकडे नागरी तसेच लष्करी पातळीवरील सर्वोच्च पदे आहेत. तज्ज्ञांच्या दाव्यानुसार, शी जिनपिंग अजून दशकभर सत्तेत राहू शकतात. त्यामुळे सध्या कम्युनिस्ट पार्टीच्या पॉलिटब्युरोमध्ये असणार्‍या नेत्यांचे राजकीय बढतीचे मार्ग बंद झाले आहेत. जिनपिंग यांनी सर्व अधिकार आपल्याकडे घेऊन निर्णय घेण्यास सुरुवात केल्याने सामूहिक नेतृत्त्वाच्या संकल्पनेला धक्का बसला आहे. ही बाब काही नेत्यांना नाराज करणारी आहे, असे ‘एचके पोस्ट’ने म्हटले आहे.

केंद्रित झालेली सत्ता

राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या काळात शेजारी देशांबरोबरील संघर्ष वाढले असून हे देश पाश्‍चात्य देशांकडे ओढले जात आहेत, याकडे लेखात लक्ष वेधण्यात आले आहे. याबरोबरच कोरोनाची साथ, ‘एनर्जी क्रायसिस’ यासारख्या गोष्टींचे चीनच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम झाल्याचेही दिसून आले आहे. ही बाब चीनच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्थानाला धक्का देणारी ठरत असल्याची जाणीव लेखात करून देण्यात आली आहे.

२०१८ साली जिनपिंग यांनी राष्ट्राध्यक्षपदासाठी असलेली वयाची व कालावधीची मुदत रद्द केली होती. त्यानंतर कम्युनिस्ट पार्टीच्या विचारसरणीमध्ये ‘शी जिनपिंग थॉट’ म्हणून आपल्या धोरणांचा व विचारांचा समावेश करणे भाग पाडले होते. जिनपिंग यांनी ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’वर नियंत्रण असणार्‍या ‘सेंट्रल मिलिटरी कमिशन’चे प्रमुख पदही आपल्याकडे घेण्यात यश मिळविले होते.

मात्र आता चीनच्या कम्युनिस्ट पार्टीतूनही राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या धोरणांविरोधात सूर उमटू लागले आहेत. गेल्या वर्षी सध्याचे परराष्ट्र धोरण चीनसाठी लाभदायी ठरलेले दिसत नाही, अशी नाराजी चीनच्या ‘पिपल्स लिबरेशन आर्मी’चे वरिष्ठ लष्करी अधिकारी जनरल दाई शी यांनी व्यक्त केली होती.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info