आफ्रिकेच्या साहेलमधून दहशतवादी संघटना उखडून टाकू – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन

आफ्रिकेच्या साहेलमधून दहशतवादी संघटना उखडून टाकू – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन

पॅरिस/एन्डजमेना – आफ्रिकेच्या साहेल क्षेत्रात हिंसाचार करणार्‍या अल कायदा व संलग्न दहशतवादी गटांना संपविण्यासाठी फ्रान्स या क्षेत्रातील आपली लष्करी तैनाती यापुढेही कायम ठेवेल, अशी ग्वाही फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी दिली. बुधवारी फ्रान्स व ‘साहेल’ क्षेत्रातील देशांच्या राष्ट्रप्रमुखांची व्हर्च्युअल बैठक आयोजित करण्यात आली होती. फ्रान्सने २०१३ साली केलेली तैनाती व आफ्रिकी देशांच्या सहभागानंतरही या क्षेत्रातील दहशतवादी कारवायांची तीव्रता वाढल्याचे समोर येत आहे. त्यामुळे फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी दिलेली ग्वाही महत्त्वाची ठरते.

२०१२ साली उत्तर मालीत कट्टरपंथिय गटांनी बंडाचा प्रयत्न केला होता. बंड अपयशी ठरले असले तरी त्यानंतर निर्माण झालेल्या अस्थैर्याचा फायदा दहशतवादी संघटनांनी उचलल्याचे दिसत आहे. गेल्या काही वर्षात ‘अल कायदा’, ‘आयएस’ व ‘अन्सरउल इस्लाम’ यासारख्या दहशतवादी संघटनांनी आपला प्रभाव वाढविण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन वर्षात माली, नायजेरिया व नायजर या देशांमध्ये एकामागोमाग होणार्‍या हल्ल्यांनी या संघटनांची ताकद वाढल्याचे दिसून येते.

‘आयएस’ व ‘अल कायदा’शी संलग्न असलेल्या दहशतवादी गटांकडून माली, नायजर, बुर्किना फासो तसेच नायजेरियाच्या लष्करावर सातत्याने हल्ले चढविण्यात येत आहेत. या हल्ल्यांमध्ये जवळपास ४०० हून अधिक जवानांचा बळी गेल्याचे सांगण्यात येते. ‘साहेल’ क्षेत्रातील देशांनी आतापर्यंत केलेल्या कारवाया व मोहिमांना चांगलाच धक्का बसला आहे. त्यातच सततच्या दहशतवादी हल्ल्यांनी ‘साहेल’ देशांमधील लष्कराकडे योग्य प्रशिक्षण, शस्त्रास्त्रे व माहितीचा अभाव असल्याचे स्पष्ट झाले होते.

‘साहेल’मध्ये तैनात असणार्‍या फ्रेंच लष्करालाही आपले ५० जवान गमवावे लागले आहेत. त्यामुळेच फ्रान्सही आक्रमक बनला असून गेल्या काही महिन्यात दहशतवादविरोधी कारवायांचा वेग वाढविला आहे. फ्रान्सने यापूर्वीच या भागात तब्बल साडेचार हजार जवान तैनात केले होते. मात्र दहशतवादी संघटनांकडून आफ्रिकी देशांसह फ्रान्सच्या लष्करी तळांवरही मोठे हल्ले चढविण्यात आले होते. त्यामुळे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी गेल्या वर्षी ६०० अतिरिक्त जवान तैनात करण्याची घोषणा केली होती.

गेल्या दोन वर्षांपासून आफ्रिकेतील मोहिमेसाठी युरोपिय देशांचे सहाय्य घेण्यासाठी हालचाली करीत आहे. मात्र युरोपिय महासंघ व प्रमुख देशांनी अद्याप त्याला पुरेसा प्रतिसाद दिलेला नाही. युरोपिय महासंघाने आर्थिक सहाय्याव्यतिरिक्त इतर सहकार्यासाठी तयारी दर्शविलेली नाही. त्यामुळे फ्रान्सला यासाठी अधिक जोरदारपणे प्रयत्न करावे लागतील, असे संकेत मिळत आहेत. फ्रेंच राष्ट्राध्यक्षांनी दहशतवादी संघटनांना संपविण्याची ग्वाही देतानाच फ्रान्स आपल्या लष्करी तैनातीत कपात करणार नसल्याचेही स्पष्ट केले.

फ्रान्सव्यतिरिक्त साहेल क्षेत्रातील आघाडीचा देश असणार्‍या ‘चाड’नेही अतिरिक्त लष्करी तैनातीची घोषणा केली आहे. चाडचे राष्ट्राध्यक्ष इद्रिस डेबी एत्नो यांनी १,२०० जवान तैनात करण्यात येतील अशी माहिती दिली आहे. हे जवान नायजर, माली व बुर्किना फासोच्या ‘बॉर्डर झोन’मध्ये तैनात असतील, असेही स्पष्ट करण्यात आले. साहेल क्षेत्रातील पाच देशांनी यापूर्वीच ‘जी५एस’ नावाने स्वतंत्र दलाची निर्मिती केली असून त्यात तीन हजार जवानांचा समावेश आहे. मात्र त्याला पुरेसे यश मिळाले नसल्याने या युद्धातील फ्रान्सची भूमिका व योगदान महत्त्वाचे ठरते.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info