रशियाकडून युक्रेनी शहरांवर ८३ क्षेपणास्त्रांचा वर्षाव

- क्रिमिआतील हल्ल्याचा सूड घेतल्याची राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची घोषणा

मॉस्को/किव्ह – क्रिमिआ व रशियाला जोडणाऱ्या ब्रिजवर युक्रेनने केलेल्या दहशतवादी हल्ल्यांना रशियाने घणाघाती प्रत्युत्तर दिले. सोमवारी रशियन फौजांनी युक्रेनमधील शहरांवर तब्बल ८३ क्षेपणास्त्रांचा वर्षाव करून हाहाकार माजवला. हा कर्च ब्रिजवरील हल्ल्याचा सूड असल्याचे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी बजावले आहे. युक्रेनची राजधानी किव्हमध्ये क्षेपणास्त्रे कोसळल्यानंतर राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी सुरक्षेसाठी बंकरमध्ये हलवावे लागले. या हल्ल्यानंतर रशिया स्वस्थ बसणार नसून पुढच्या काळातही रशियाचे असे हल्ले सुरू राहतील, असा इशारा राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी दिला आहे.

८३ क्षेपणास्त्रांचा वर्षाव

शनिवारी पहाटे युक्रेनने रशिया व क्रिमिआला जोडणाऱ्या कर्च ब्रिजवर दहशतवादी हल्ला घडविला होता. या हल्ल्यानंतर युक्रेनसह युरोपिय देशांनी विजयी व चिथावणीखोर प्रतिक्रिया दिल्या होत्या. रशियाने सदर हल्ला दहशतवादी घटना असल्याचे सांगून त्याला प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला होता. अवघ्या 48 तासांमध्ये रशियाने पूर्ण युक्रेनमध्ये क्षेपणास्त्रांचा मारा करून आपला इशारा वास्तवात उतरविला आहे. सोमवारच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमधून रशियाने युक्रेनसह पाश्चिमात्य देशांच्या आघाडीला आपल्या लष्करी सामर्थ्याची चुणूक दाखविल्याचे मानले जाते.

सोमवारी सकाळपासून युक्रेनची राजधानी किव्हमध्ये हवाईहल्ल्यांचे सायरन वाजण्यास सुरुवात झाले. अवघ्या एका तासाच्या अवधीत युक्रेनमध्ये तब्बल 25 हून अधिक क्षेपणास्त्रे डागण्यात आल्याचे सांगण्यात येते. या हल्ल्यांमध्ये युक्रेनच्या गुप्तचर यंत्रणेच्या मुख्यालयाच्या नजिकचा परिसर तसेच परदेशी दूतावासांनजिकच्या भागांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त वीज, जलपुरवठा व पूल यासारख्या पायाभूत सुविधांवरही घणाघाती हल्ले करण्यात आले.

राजधानी किव्हव्यतिरिक्त युक्रेनमधील दहाहून अधिक प्रमुख शहरांना लक्ष्य करण्यात आले. त्यात पश्चिम युक्रेनमधील लिव्हसह डिनिप्रो, सुमी, खार्किव्ह, ओडेसा, टेर्नोपिल, विनित्सिआ, झायटोमिर, इवानो फ्रँकिव्हस्क, क्रोपिव्हनित्स्की, ख्मेलनित्स्की व झॅपोरिझिआ यांचा समावेश आहे. रशियाच्या क्षेपणास्त्रहल्ल्यांमध्ये मोठी जीवितहानी झाल्याचे वृत्त असून ठोस आकडेवारी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. युक्रेनच्या बहुतांश प्रांतांमधील वीज तसेच पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून अनेक आघाडीच्या शहरांमध्ये ‘ब्लॅकआऊट’ झाल्याचे सांगण्यात येते. स्थानिक प्रशासनाकडून युक्रेनी नागरिकांना पुन्हा ‘ॲलर्ट’ जारी करण्यात आला असून सुरक्षित शेल्टरचा आश्रय घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सोमवारच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांचे आदेश रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिल्याचे उघड झाले. हल्ल्यांनंतर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी संदेश प्रसारित केला. यात युक्रेनवर केलेले हल्ले हा क्रिमिआत घडविलेल्या घातपाती हल्ल्यांचा सूड असल्याचे त्यांनी उघडपणे बजावले. त्याचवेळी युक्रेनकडून करण्यात येणाऱ्या प्रत्येक दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर दिले जाईल, असा खरमरीत इशाराही पुतिन यांनी दिला. हल्ल्यांनंतर रशियात पुतिन यांच्या अध्यक्षतेखाली नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलची बैठक झाल्याचेही समोर आले आहे.

रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांवर आंतरराष्ट्रीय स्तरावरून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. रशिया आमचे अस्तित्त्व नष्ट करण्याचा प्रयत्न करीत असून युक्रेनला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात येत आहे, असा आरोप युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केला. युक्रेनवरील हल्ले अतिशय भीषण व दुर्दैवी असल्याचे नाटोने म्हटले आहे. तर युरोपिय महासंघाने रशियाचे हल्ले निंदनीय असल्याची प्रतिक्रिया दिली. रशियाचे हल्ले पुतिन यांच्या कमकुवतपणाचे प्रतीक असून अस्वीकारार्ह असल्याचे ब्रिटनने म्हटले आहे. फ्रान्सने सोमवारच्या हल्ल्यांवर तीव्र चिंता व्यक्त केली.

सोमवारच्या हल्ल्यांमधून रशियाने युक्रेनमधील संघर्षाची तीव्रता सामरिकदृष्ट्या वाढविण्याचे संकेत दिल्याचा दावा पाश्चिमात्य विश्लेषक करीत आहेत. हल्ल्यांसाठी रशियाने ‘कॅलिबर क्रूझ मिसाईल्स’सह ड्रोन्सचाही वापर केल्याचे समोर आले. संघर्षाला आठ महिने उलटल्यानंतरही रशियाने युक्रेनला जबर दणका देणारे हल्ले करून आपल्या लष्करी सामर्थ्याची झलक दाखविल्याचेही विश्लेषकांचे म्हणणे आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये एकापाठोपाठ घ्याव्या लागलेल्या माघारीनंतर रशियाचा पराभव झाल्याचे डांगोरे पिटणाऱ्या पाश्चिमात्य आघाडीला प्रचंड हादरा बसल्याचे मानले जाते.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info