चीन तैवान ताब्यात घेईल आणि अमेरिका काहीही करणार नाही – ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान केव्हिन रूड यांचा दावा

चीन तैवान ताब्यात घेईल आणि अमेरिका काहीही करणार नाही – ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान केव्हिन रूड यांचा दावा

वॉशिंग्टन – चीनच्या लढाऊ विमानांची तैवानच्या हवाई हद्दीतील घुसखोरी वाढलेली असतानाच, ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान केव्हिन रूड यांनी सार्‍या जगाचे लक्ष वेधून घेणारा इशारा दिला. ‘दशकभराच्या कालावधीत चीन तैवानचा ताबा घेईल. यानंतर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे स्थान माओ त्से तुंग यांच्याइतके उंचावेल’, असा दावा रूड यांनी केला. इतकेच नाही तर तैवान ताब्यात घेण्याच्या चीनच्या कारवाईला अमेरिकाही फारसा विरोध करणार नाही. कारण अमेरिकेला उतरती कळा लागलेली आहे,’ असा धक्कादायक निष्कर्ष ऑस्ट्रेलियाच्या माजी पंतप्रधानांनी नोंदविला.

दोन वेळा ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधानपद भूषविलेल्या केव्हिन रूड यांची ओळख चीनधार्जिणा नेता अशी आहे. २००७ ते २०१० सालादरम्यान पंतप्रधानपदावर आलेल्या रूड यांनी ऑस्ट्रेलियाचे हितसंबंध नजरेआड करून चीनला फार मोठ्या सवलती दिल्याचे उघड झाले होते. पुढे २०१३ सालीही रूड ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदावर आले, पण यावेळी त्यांचे पंतप्रधानपद काही महिनेच टिकले होते. सध्या केव्हिन रूड अमेरिकेतील ‘एशिया सोसायटी न्यूयॉर्क’ या संघटनेसाठी काम करीत आहेत. चीन तसेच अमेरिकेबाबत धक्कादायक निष्कर्ष नोंदवून रूड यांनी एका प्रकारे चीनच्या पुढच्या काळातील हालचालींचे संकेत दिल्याचे दिसते.

‘महासत्ता असलेल्या अमेरिकेलाही मागे टाकणारे अत्याधुनिक लष्कर विकसित करण्याच्या दिशेने चीन आगेकूच करीत आहे. तैवानला चीनमध्ये सामावून घेण्याचे ध्येय चीनने आपल्यासमोर ठेवलेले आहे. पण ही समस्या वाटाघाटींनी सुटण्याची शक्यता मावळत चाललेली आहे, याचीही जाणीव चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग व इतर चिनी नेत्यांना झालेली आहे, असे रूड यांनी म्हटले आहे.

दुसर्‍या बाजूला जिनपिंग सत्तेवर आल्यानंतर ‘एक देश दोन व्यवस्था’ हे तत्त्व बाजूला सारून चीनने हाँगकाँगवर नियंत्रण मिळविले आहे. हाँगकाँगमधली निदर्शने चिरडून टाकण्यासाठी चीनने याच्या नेत्यांना अटक केली आणि माध्यमांवरही निर्बंध लादले आहेत. हे सारे पाहत असलेला तैवान कधीही चीनमध्ये सामील होणार नाही. त्यामुळे तैवान चीनला सर्व शक्तीनिशी प्रतिकार करील आणि अखेरीस या युद्धात पराभूत होईल. कारण अमेरिका या संघर्षात तैवानला सहाय्य करू शकणार नाही’, असा दावा केव्हिन रूड यांनी केला.

अमेरिकेकडे निदान आशिया खंडात तरी चीनला आव्हान देण्याइतके लष्करी सामर्थ्य नाही. त्यामुळे अमेरिकेचे चीनसमोर काहीही चालणार नाही. म्हणूनच आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी अमेरिका चीन-तैवान संघर्षात पडणार नाही, याची चीनला जाणीव आहे’, अशी मांडणी रूड यांनी केली आहे. आशियातील इतर देश देखील चीनच्या विरोधात अमेरिकेला साथ देणार नाहीत, असे रूड पुढे म्हणाले. गेल्या काही दिवसात बायडेन प्रशासन चीनबाबत बोटचेपे धोरण स्वीकारीत असल्याची टीका अमेरिकेत सुरू झाली आहे. बायडेन सत्तेवर येत असतानचा, चीनने म्यानमारमध्ये लष्करी बंड घडवून आणले. त्यानंतर तैवानच्या हवाई हद्दीत चीनची घुसखोरी वाढत चालली आहे. ईस्ट चायना सी क्षेत्रात जपानला आव्हान देण्यासाठी चीनने हालचाली सुरू केल्या आहेत. बायडेन आपल्या विरोधात काहीही करू शकणार नाहीत, याची खात्री पटल्यानेच चीन हे सारे करीत आहे, असे आरोप सुरू झाले आहेत.

अशा परिस्थितीत चीनधार्जिणे अशी ओळख असलेल्या केव्हिन रूड यांनी तैवानच्या बाबतीत दिलेला इशारा लक्षवेधी ठरतो. बायडेन यांच्या कार्यकाळात चीन बेकाबू होईल, हा अमेरिकेच्या काही नेत्यांनी दिलेला इशारा प्रत्यक्षात उतरत असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info