रशियाकडून युक्रेनमधील शहरांवर 76 क्षेपणास्त्रांचा वर्षाव

- राजधानी किव्ह व ओडेसासह प्रमुख शहरे लक्ष्य

मॉस्को/किव्ह – अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांकडून युक्रेनला देण्यात येणारी प्रगत शस्त्रे व रशियन भूभागांवर होणाऱ्या हल्ल्यांना रशियाने सणसणीत प्रत्युत्तर दिले. शुक्रवारी रशियन संरक्षणदलांनी युक्रेनची राजधानी किव्हसह प्रमुख शहरांवर तब्बल 76 क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला. गेल्या तीन महिन्यात रशियाने इतक्या मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याची ही दहावी घटना ठरली आहे. शुक्रवारच्या हल्ल्यात वीजपुरवठा व पाणीपुरवठा यंत्रणांसह दूरसंचार सेवा पुरविणाऱ्या सुविधांनाही मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचे सांगण्यात येते.

गेल्या काही आठवड्यात रशियाने डोन्बास क्षेत्रातील मोहीम आक्रमक करतानाच खेर्सनसह इतर भागांमधील ड्रोन हल्ले व इतर मारा वाढविला होता. त्यामुळे युक्रेन जेरीस येत असल्याचे संकेत त्या देशातील नेते व अधिकाऱ्यांच्या वक्तव्यातून मिळण्यास सुरुवात झाली होती. युक्रेनमधील ही स्थिती सावरण्यासाठी पाश्चिमात्य आघाडी पुढे सरसावली असून नवे अर्थसहाय्य व शस्त्रसाठा पुरविण्याच्या घोषणा करण्यात आल्या. अमेरिकेने युक्रेनला पॅट्रियॉट क्षेपणास्त्रे देण्याचीही तयारी दर्शविली आहे.

त्याचवेळी युक्रेनची विशेष पथके व इतर सशस्त्र गटांनी रशियन भूभागातील जागा लक्ष्य करण्यास सुरुवात केली होती. यात संरक्षणतळ व इंधनसाठ्यांचा समावेश आहे. नवे शस्त्रसहाय्य व भूभागावर होणारे हल्ले याविरोधात रशियातून आक्रमक प्रतिक्रिया उमटली होती. शुक्रवारी झालेला क्षेपणास्त्रांचा हल्लाही त्याचाच भाग मानला जातो. शुक्रवारी सकाळी रशियाने युक्रेनची राजधानी किव्हसह बहुतांश शहरांवर हल्ले सुरू केले. यात खार्किव्ह, सुमी, ओडेसा, विनित्सिआ, क्रिव्हयि रिह, पोल्तावासह मध्य युक्रेनमधील शहरांचा समावेश आहे. या बहुतांश शहरांमधील वीजयंत्रणा व पाणीपुरवठा खंडित झाला आहे. काही शहरांमध्ये पुन्हा ‘ब्लॅकआऊट’ लागू करण्यात आल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली. इंटरनेट सुविधा पुरविणाऱ्या नेटवर्कवरही हल्ले झाल्याने ही सेवादेखील बंद पडल्याचे सांगण्यात येते. काही भागांमध्ये मोठी जीवितहानी झाल्याचे दावेही करण्यात आले आहेत. शुक्रवारच्या हल्ल्यांसाठी रशियाने ‘टीयू-95’, ‘टीयू-22’, ‘एसयु-35’, ‘मिग-31’ या विमानांचा तसेच ‘केएच-101’, ‘केएच-555’, ‘केएच-22’, ‘केएच-59’, कॅलिबर तसेच ‘एस-300’ क्षेपणास्त्रांचा वापर केल्याची माहिती युक्रेनने दिली. ब्लॅक सी क्षेत्रातील पाणबुड्या व युद्धनौकांवरूनही क्षेपणास्त्रे डागण्यात आल्याचे युक्रेनने म्हटले आहे.

ऑक्टोबर महिन्यात रशियाने युक्रेनविरोधात क्षेपणास्त्र हल्ल्यांचे मोठे सत्र सुरू केले होते. ही मोहीम सुरू झाल्यावर रशियाकडील क्षेपणास्त्रांचे साठे संपत चालल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. पण हे दावे व बातम्या खोट्या पाडून रशियाने गेल्या दोन महिन्यात तब्बल आठ वेळा युक्रेनवर क्षेपणास्त्रांचे हल्ले केले आहेत. यातून रशियाने आपली संरक्षणक्षमता दाखवून दिली आहे. गेल्या महिन्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी जर्मन चॅन्सेलर ओलाफ शोल्झ यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत या क्षेपणास्त्र हल्ल्यांचे समर्थन केले होते.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info