युक्रेनमधील लुहान्स्क प्रांत लवकरच रशियाच्या नियंत्रणाखाली असेल

- संरक्षणमंत्री सर्जेई शोईगु यांचा दावा

लुहान्स्क प्रांत

मॉस्को/किव्ह – पूर्व युक्रेनमधील डोन्बास क्षेत्राचा भाग असलेला लुहान्स्क प्रांत लवकरच रशियाच्या नियंत्रणाखाली असेल, असा दावा रशियाचे संरक्षणमंत्री सर्जेई शोईगु यांनी केला. गेल्या काही दिवसात रशियन फौजांनी लुहान्स्कमधील महत्त्वाच्या शहरांवर जोरदार मारा केला आहे. या माऱ्यामुळे युक्रेनच्या लष्कराला माघार घ्यावी लागली असून रशिया दडपण वाढवित असल्याची कबुली युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी दिली. दरम्यान, मारिपोलच्या स्टील फॅक्टरीमधून युक्रेनच्या जवानांची माघारीची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे सांगण्यात येते.

युक्रेनमधील लष्करी मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू केल्याची माहिती रशियाने गेल्या महिन्यात दिली होती. या दुसऱ्या टप्प्यात पूर्व युक्रेनमधील डोन्बासपासून ते युक्रेनच्या शेजारी असलेल्या मोल्दोव्हाच्या सीमेपर्यंतचा भाग ताब्यात घेण्यात येईल, असे संकेत वरिष्ठ रशियन अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार, रशियन फौजांनी युक्रेनमधील आपल्या तैनातीची फेररचना करून डोन्बामधील हल्ले वाढविले होते. त्याला यश मिळत असल्याचे समोर येत आहे. रशियाने डोन्बासचा भाग असलेल्या डोनेत्स्क व लुहान्स्क प्रांतातील बहुतांश भागावर ताबा मिळविल्याचे समोर येत आहे.

लुहान्स्क प्रांत

गेल्या काही दिवसात रशियन फौजांकडून लुहान्स्कमधील महत्त्वाची शहरे असलेल्या लिसिचान्स्क व सेव्हेरोडोनेत्स्कवर क्षेपणास्त्रे, रॉकेट्स व तोफांचा जोरदार मारा केला आहे. युक्रेनच्या लष्कराचा तळ असलेल्या डोनेत्स्कमधील बाखमत शहरावरही मोठे हल्ले चढविण्यात आले आहेत. सेव्हेरोडोनेत्स्कवर केलेल्या हल्ल्यात 12 नागरिकांचा बळी गेल्याचे व अनेक जण जखमी झाल्याची माहिती युक्रेनने दिली. तर रशियाचे संरक्षणमंत्री शोईगु यांनी लुहान्स्क प्रांत लवकरच युक्रेनपासून मुक्त करण्यात येईल, असा दावा केला.

लुहान्स्क प्रांत

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनाही रशियाच्या आक्रमक हल्ल्यांची दखल घेणे भाग पडले आहे. रशियन फौजा डोन्बास क्षेत्राला झोडपून काढत आहेत व रशियाने या क्षेत्राचे रुपांतर नरकात केले आहे, अशी प्रतिक्रिया झेलेन्स्की यांनी दिली. डोन्बासव्यतिरिक्त राजधानी किव्हच्या उत्तरेला असलेल्या चेर्निहिव्ह, दक्षिणेतील ओडेसा व मध्य युक्रेनमध्ये रशियाने क्षेपणास्त्र हल्ले केल्याची माहिती युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी दिली. चेर्निहिव्हमधील क्षेपणास्त्रहल्ल्यात मोठी जीवितहानी झाल्याचेही झेलेन्स्की यांनी सांगितले.

दरम्यान, रशियासमोर शरणागती पत्करलेल्या मारिपोल स्टील फॅक्टरीतील युक्रेनी जवानांना युद्धकैदी म्हणून दर्जा देण्यात येईल, अशी माहिती ‘रेडक्रॉस’ या आंतरराष्ट्रीय यंत्रणेने दिली आहे. आतापर्यंत या फॅक्टरीतून 1,908 युक्रेनी जवानांनी शरणागती पत्करली असून त्यातील अनेकांवर रशियन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info