डोनेस्क व लुहान्स्कच्या स्वातंत्र्याची घोषणा करून रशियन राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनमध्ये दहा हजार शांतीसैनिक तैनात केले

- रशियावर कठोर निर्बंधांची अमेरिका व मित्रदेशांची घोषणा

शांतीसैनिक

मॉस्को – रशिया युक्रेनवर हल्ला चढविण्याच्या तयारीत असल्याचे दावे ठोकणार्‍या युक्रेन, अमेरिका व इतर पाश्‍चिमात्य देशांना रशियाने अनपेक्षित धक्का दिला. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनचा भाग असलेल्या डोनेस्क आणि लुहान्स्क या भागांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता घोषित केली. रशियाचे वर्चस्व असलेल्या या भागात दहा हजार शांतीसैनिक पाठविण्याची घोषणाही रशियन राष्ट्राध्यक्षांनी करून टाकली. सोमवारी रात्री राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी केलेल्या या घोषणेनंतर अमेरिका व पाश्‍चिमात्य देशांनी रशियाविरोधात आगपाखड सुरू केली. अमेरिका व युरोपिय देशांनी रशियावर कडक निर्बंध लादून या कारवाईला प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे.

शांतीसैनिक

रशियन जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी युक्रेनमुळे रशियासमोर खड्या ठाकलेल्या सुरक्षाविषयक आव्हानांची जाणीव करून दिली. युक्रेन पाश्‍चिमात्यांच्या इशार्‍यांवर नाटोचा सदस्य बनण्याचे प्रयत्न करीत आहे. एकदा का नाटोला आपला तळ युक्रेनमध्ये स्थापन करण्याची संधी मिळाली, तर अवघ्या काही मिनिटात युक्रेनमधून सोडलेली क्षेपणास्त्रे रशियावर आदळू शकतील. हा धोका रशिया खपवून घेऊ शकत नाही. वारंवार प्रयत्न करूनही युक्रेनच्या सरकारने शांतता कायम राखण्यासाठी रशियाने केलेल्या प्रयत्नांना प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे रशियाला आपल्या सुरक्षेसाठी आवश्यक ते निर्णय घेणे भाग पडत आहे, असे सांगून राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी डोनेस्क आणि लुहान्स्क बाबत ही घोषणा केली.

पाश्‍चिमात्य देश रशियावर आर्थिक निर्बंध लादण्याच्या धमक्या देत आहेत. काही केले तरी हे निर्बंध लादण्याची तयारी त्यांनी फार आधीच केली होती. ज्या प्रमाणात रशियाचे सार्वभौमत्त्व भक्कम होत जाईल, त्या प्रमाणात रशियावरील पाश्‍चिमात्यांचे निर्बंध वाढत जातील, असा टोला राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी लगावला. मात्र आपल्या सुरक्षेसाठी आवश्यक ते निर्णय घेण्याचा अधिकार रशियाला आहे व रशिया यापुढे तेच करील, असे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी ठासून सांगितले. दरम्यान, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत बोलताना रशियन राजदूतांनी पाश्‍चिमात्य देशांना सज्जड इशारा दिला. रशियाच्या विरोधात लष्करी कारवाई करताना एकदा नाही तर दोन वेळा विचार करावा, असे या राजदूतांनी बजावले.

शांतीसैनिक

दरम्यान, अमेरिकेने रशियन राष्ट्राध्यक्षांच्या या घोषणेवर जहाल प्रतिक्रिया नोंदविली आहे. अमेरिका जबर आर्थिक निर्बंध लादून रशियाची कोंडी करील, असे व्हाईट हाऊसने जाहीर केले. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी रशियावरील निर्बंधांची घोषणाच करून टाकली. यानुसार रशियन राष्ट्राध्यक्षांचे तीन निकटवर्तीय उद्योजक व पाच रशियन बँकांवर ब्रिटनने निर्बंध लादले आहेत. तर जर्मनीने रशियाबरोबरील नॉर्ड स्ट्रीम २ इंधनप्रकल्प स्थागित करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षा परिषदेत बोलताना अमेरिकेच्या प्रतिनिधींनी रशिया संयुक्त राष्ट्रसंघाची खिल्ली उडवित असल्याचा ठपका ठेवला. सर्वच देशांनी रशियाच्या या अरेरावीविरोधात ठाम भूमिका स्वीकारावी, अशी मागणी अमेरिकेसह ब्रिटन व जर्मनीने देखील केली आहे.

शांतीसैनिक

रशियाने याआधी २००८ साली साऊथ ओसेटिया आणि अबखाझिया हे भाग जॉर्जियापासून तोडून त्यांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली होती. २०१४ साली रशियाने युक्रेनवर हल्ला चढवून क्रिमिआ प्रांताचा ताबा घेतला होता. तसेच पूर्व युक्रेनमधील डोनेस्क व लुहान्स्क प्रातांच्या काही भागावर रशियासमर्थक बंडखोरांनी ताबा मिळविला होता. तेव्हापासूनच युक्रेनचे डोनेस्क व लुहान्स्कवरील नियंत्रण गमावले होते. यासाठी युक्रेनने केलेल्या लष्करी कारवाईत गेल्या सात वर्षात जवळपास १० हजार जणांचा बळी गेल्याचे सांगितले जाते. या बंडखोरांच्या मागे रशियाचे लष्करी सामर्थ्य असल्याचा आरोप युक्रेनने केला होता.

असे असूनही रशियाच्या या कारवाईवर निर्बंध लादण्याखेरीज पाश्‍चिमात्य देश कुठलीही प्रतिक्रिया देऊ शकले नव्हते. आता डोनेस्क व लुहान्स्क यांना स्वतंत्र देश घोषित करून रशियाने नोटाचे सदस्यत्त्व स्वीकारण्याच्या तयारीत असलेल्या युक्रेनला आणखी एकदा धडा शिकविल्याचे दिसत आहे.

युक्रेन रशियाबरोबरील राजनैतिक संबंध तोडण्याच्या तयारीत

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी रशियाबरोबरील राजनैतिक संबंध तोडून टाकण्याची तयारी केली आहे. आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने तशी शिफारस केली असून लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल, असे झेलेन्स्की यांनी जाहीर केले. मात्र रशियाने डोनेस्क व लुहान्स्कमध्ये सैन्य पाठवून या दोन्ही भागांना स्वतंत्र देश जाहीर केले असले, तरी त्याचा उल्लेख आक्रमण असा न करण्यासाचा सावधपणा युक्रेनी राष्ट्राध्यक्षांनी दाखवला. रशियाची कारवाई युक्रेनच्या सार्वभौमत्त्वाचा भंग करणारी ठरते, असे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. अमेरिका, फ्रान्स व जर्मनी या देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी झेलेन्स्की यांची चर्चा पार पडली. मात्र युक्रेनने अजूनही रशियाच्या कारवाईला लष्करी प्रत्युत्तर देण्याची अधिकृत पातळीवर घोषणा केलेली नाही. वेळ आलीच तर इमर्जन्सी जाहीर केली जाईल, असे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. दरम्यान, युक्रेनच्या लष्कराचा डोनेस्क व लुहान्स्कमधील रशियासमर्थक बंडखोरांचा संघर्ष सुरू झाल्याच्या बातम्या येत आहेत. यात युक्रेनचे दोन जवान ठार झाले आहेत. हा संघर्ष पुढच्या काळात चिघळू शकतो. पण सध्या तरी युक्रेन याबाबत सावधपणा दाखवित असल्याचे दिसत आहे. अमेरिका युक्रेनसाठी रशियाबरोबर युद्ध पुकारण्याची जोखीम पत्करेल का? अशी चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू झालेली आहे.

 

हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info