इस्रायलने इराणच्या जहाजांवर हल्ले चढविले – अमेरिकी वर्तमानपत्राचा दावा

इस्रायलने इराणच्या जहाजांवर हल्ले चढविले – अमेरिकी वर्तमानपत्राचा दावा

वॉशिंग्टन – सिरियासाठी इंधन व शस्त्रास्त्रांची तस्करी करणार्‍या इराणच्या जहाजांवर इस्रायलने गेल्या दोन वर्षात किमान १२ हल्ले चढविल्याचा दावा अमेरिकेच्या वर्तमानपत्राने केला. यापैकी काही जहाजांवर इस्रायलने बॉम्ब हल्ले चढविल्याचे सदर वर्तमानपत्राने म्हटले आहे. काही तासांपूर्वी रेड सीच्या क्षेत्रातून प्रवास करणार्‍या मालवाहू जहाजात स्फोट होऊन आग लागल्याची बातमी समोर येत आहे. सदर जहाज इराणचे असल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या वर्तमानपत्राने प्रसिद्ध केलेली ही बातमी लक्ष वेधून घेत आहे.

‘द वॉल स्ट्रिट जर्नल’ या अमेरिकी वर्तमानपत्राने इस्रायलने इराणच्या इंधन व मालवाहू जहाजांवर चढविलेल्या हल्ल्यांची बातमी गुरुवारी प्रसिद्ध केली. यामध्ये २०१९ सालापासून इस्रायलने ‘रेड सी’च्या सागरी क्षेत्रात केलेल्या कारवाईची माहिती दिली. इंधन तसेच शस्त्रास्त्रे घेऊन सिरियासाठी निघालेल्या जहाजांना इस्रायली लष्कराने लक्ष्य केले. यामध्ये काही जहाजे इराणच्या मालकीची होती. तर काही जहाजांवर इराणचे इंधन व शस्त्रास्त्रे होती. अवैध इंधन निर्यात रोखून इराणच्या अर्थव्यवस्थेची कोंडी करण्यासाठी इस्रायलने हे हल्ले चढविल्याचा दावा सदर वर्तमानपत्राने केला.

अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांनुसार इराण इतर देशांना इंधनाची विक्री करू शकत नाही. कारण अशाप्रकारे इंधनाच्या निर्यातीतून मिळणारा पैसा इराण इस्रायल तसेच आखातातील दहशतवादी कारवायांसाठी वापरत असल्याचा आरोप अमेरिका व इस्रायलने केला होता. त्यामुळे इराणची ही अवैध इंधनाची निर्यात रोखण्यासाठी इस्रायलने सदर जहाजांवर कारवाई केल्याचे अमेरिकी वर्तमानपत्राने म्हटले आहे.

या व्यतिरिक्त इराण मालवाहू जहाजातून शस्त्रास्त्रांची तस्करी करून इस्रायलविरोधी हिजबुल्लाह व इतर दहशतवादी संघटनांना शस्त्रसज्ज करीत असल्याचा आरोप इस्रायल करीत आहे. त्यामुळे सदर जहाजांवर कारवाई करून इस्रायलने इराणची शस्त्रतस्करी देखील मोडून काढल्याचे अमेरिकी वर्तमानपत्राचे म्हणणे आहे. यापैकी काही जहाजांवर इस्रायलने बॉम्बहल्ले चढविल्याचा दावा अमेरिकी वर्तमानपत्राने केला. यासाठी अमेरिकी वर्तमानपत्राने काही फोटोग्राफ्स प्रसिद्ध केले आहेत.

अमेरिकेच्या तसेच आखातातील काही अधिकार्‍यांच्या हवाल्याने सदर माहिती प्रसिद्ध केल्याचे सदर वर्तमानपत्राने म्हटले आहे. पण इराणने या बातमीवर बोलण्याचे टाळले आहे. मात्र इराणच्या शिपिंग उद्योगातील काही व्यावसायिकांनी रेड सीच्या क्षेत्रातून प्रवास करणार्‍या जहाजांवर हल्ले झाल्याचे मान्य केले. किमान दोन इराणी जहाजांना स्फोटानंतर माघारी परतावे लागले होते, अशी कबुलीही या व्यावसायिकांनी दिली. इराणचे सरकार किंवा अधिकारी याची कबुली देणार नाहीत. कारण असे केले तर इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर न देणारा इराण कमकुवत आहे, असा संदेश यातून जाऊ शकतो, असेही सदर व्यावसायिकांनी अमेरिकी वर्तमानपत्राला सांगितले आहे.

दरम्यान, गुरुवारी रेड सीच्या क्षेत्रातून प्रवास करणार्‍या इंधनवाहू जहाजात संशयास्पदरित्या स्फोट होऊन आग लागल्याची बातमी काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली आहे. या स्फोटामागील कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. पण सदर जहाज ‘शहर-ए-कोर्द’ इराणी मालकीचे होते, असा दावा केला जातो. या जहाजाचे फोटोग्राफ्सही प्रसिद्ध झाले आहेत. पण इराणच्या सरकारने किंवा माध्यमांमध्ये याबाबतची बातमी प्रसिद्ध झालेली नाही.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info