– नायजरमधील हल्ल्यात 58 जणांचा बळी
– नायजेरियातील संघर्षात 50 हून अधिक ठार
– मालीतील दहशतवादी हल्ल्यात 11 जवानांचा बळी
निआमे/बमाको/अबुजा – सोमवारी पश्चिम आफ्रिकेतील ‘साहेल रिजन’ म्हणून ओळखण्यात येणार्या देशांमध्ये झालेल्या हिंसाचारात 100हून अधिक जणांचा बळी गेला आहे. नायजरमधील ‘तिलाबेरी’ भागात झालेल्या हल्ल्यांमध्ये 58 जणांचा बळी गेला आहे. तर मालीत दहशतवादी गटाने लष्करी चौकीवर चढविलेल्या हल्ल्यात 11 जवानांचा बळी गेला असून अनेक जवान बेपत्ता असल्याचेही सांगण्यात येते. नायजेरियामध्ये ‘स्पेशल फोर्सेस’ने केलेल्या कारवाईत बोको हरामच्या 41 दहशतवाद्यांचा बळी गेल्याची माहिती दिली. त्याचवेळी बोको हरामने लष्कराच्या 30हून अधिक जवानांना ठार केल्याचा दावा केला.
आफ्रिकेतील नायजर, माली, बुर्किना फासो, चाड, नायजेरिया व मॉरिशानिया या देशांना ‘साहेल कंट्रीज्’ म्हणून ओळखले जाते. या साहेल क्षेत्रात गेल्या काही वर्षात दहशतवादी संघटनांचा प्रभाव सातत्याने वाढत आहे. ‘अल कायदा’ व ‘आयएस’ या दोन्ही संघटनांशी निगडित गट आपले वर्चस्व राखण्यासाठी सातत्याने हल्ले चढवित आहेत. सोमवारी झालेला हिंसाचार त्याचाच भाग असल्याचे दिसत आहे.
नायजरमध्ये तिलाबेरी भागात ‘चिनेदोगर’ गावाजवळ सशस्त्र हल्लेखोरांनी पहिला हल्ला चढविला. दुपारी जवळच्या बाजारपेठेतून गाड्यांमधून माघारी येणार्या गावकर्यांवर हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 20 जणांचा बळी गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. या हल्ल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास सशस्त्र हल्लेखोरांनी दोन गावांवर हल्ले चढविले असून त्यात सुमारे 28 जणांचा बळी गेल्याचे सांगण्यात येते.
हे दोन्ही हल्ले माली व बुर्किना फासोच्या सीमेपासून जवळ असणार्या भागांमध्ये झाले आहेत. हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने स्वीकारली नसली तरी ‘बोको हराम’ किंवा ‘आयएस’संलग्न दहशतवादी गटाने हल्ला चढविल्याचा संशय सूत्रांनी व्यक्त केला आहे. स्थानिक यंत्रणांनी यामागे वांशिक बंडखोर संघटनेचा हात असू शकतो, अशीही शक्यता वर्तविली आहे. गेल्या तीन महिन्यात झालेला हा दुसरा मोठा हल्ला ठरला आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात झालेल्या हल्ल्यात सुमारे 100 जणांचा बळी गेला होता.
नायजेरियामध्ये लष्कराच्या ‘स्पेशल फोर्सेस’नी बोर्नो प्रांतात केलेल्या कारवाईत ‘बोको हराम’च्या 41 दहशतवाद्यांना ठार केले. यावेळी दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या 60हून अधिक महिला व मुलांची सुटका करण्यात आली आहे. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आल्याची माहिती अधिकार्यांनी दिली. यावेळी लष्कराच्या चार जवानांना प्राण गमवावे लागले, असे लष्करी सूत्रांनी नमूद केले. मात्र ‘बोको हराम’ने स्वतंत्र निवेदन प्रसिद्ध करून किमान 30हून अधिक जवानांना मारल्याचा दावा केला असून काही जवानांचे अपहरण केल्याचेही सांगितले आहे.
मालीच्या ईशान्य भागातील अन्सोंगो शहराजवळ असणार्या लष्करी चौकीवर सोमवारी दहशतवाद्यांनी हल्ला चढविला. या हल्ल्यात 11 जवानांचा बळी गेला असून अनेक जवान बेपत्ता झाले आहेत. मालीत गेल्या महिन्याभरात दहशतवादी गटांनी लष्करी चौकीला लक्ष्य करण्याची ही दुसरी वेळ ठरते. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात मध्य मालीतील मोपतीमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात माली लष्कराच्या 10 जवानांचा बळी गेला होता.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |