Breaking News

पॅरासेल आयलंडवर चिनी बॉम्बरची तैनाती हे व्हिएतनामच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन – व्हिएतनामच्या परराष्ट्र मंत्रालयाचा इशारा

हनोई – साऊथ चायना सीमधील पॅरासेल आयलंडवर चीनने तैनात केलेली बॉम्बर्स व लढाऊ विमाने व्हिएतनामच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन असून, या क्षेत्रातील शांतता धोक्यात आली आहे, असा इशारा व्हिएतनामच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिला. ‘पॅरासेल आयलंड'(होआंग सा) व ‘स्प्राटले आयलंड'(ट्रुऑन्ग सा) हे दोन्ही बेटसमूह व्हिएतनामचा अविभाज्य भाग आहेत, असेही परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या ‘ले थी थु हांग’ यांनी बजावले. व्हिएतनामने चीनला दिलेला हा खरमरीत इशारा ‘साऊथ चायना सी’च्या मुद्द्यावर दोन देशांमधील वाद अधिकच चिघळत असल्याचे संकेत देणारा ठरतो.

पॅरासेल आयलंड

गेल्या काही महिन्यांपासून चीनच्या साउथ चायना सीमधील हालचाली अधिक आक्रमक झाल्या आहेत. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर या सागरी क्षेत्राचा भाग असलेल्या छोट्या आशियाई देशांवर चीनकडून अरेरावी सुरू असून सातत्याने दडपण टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जुलै महिन्यात फिलिपाईन्सनजिक असलेल्या ‘मिसचिफ रीफ’ या कृत्रिम बेटावर चीनने आपल्या दोन प्रगत विनाशिका तैनात केल्या होत्या. त्याचवेळी ‘स्प्राटले आयलंड’ क्षेत्रातील ‘सुबी रीफ’ नावाने ओळखण्यात येणाऱ्या कृत्रिम बेटांवर ‘सुखोई ३०एमकेके’ या लढाऊ विमानांच्या तैनातीसही सुरुवात झाल्याचा दावा करण्यात आला होता. या महिन्याच्या सुरुवातीला चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सदर्न, नॉर्दर्न तसेच ईस्टर्न कमांडने लढाऊ विमानांसह बॉम्बर्स, फ्युएल टँकर्स, टेहळणी विमाने व ‘अर्ली वॉर्निंग एअरक्राफ्टस्’चा सराव घेतल्याची माहितीही चीनच्या सरकारी दैनिकाने दिली होती. व्हिएतनामनजीक असलेल्या ‘पॅरासेल आयलंड’ भागात अत्याधुनिक बॉम्बर्स व लढाऊ विमानांची तैनाती याचाच पुढील टप्पा दिसत आहे.

पॅरासेल आयलंड

या तैनातीपूर्वी, चीनने पॅरासेल आयलंड हा भाग आपलाच हिस्सा आहे हे दाखवण्यासाठी पावले उचलली होती. चीनच्या हैनान प्रांतापासून साऊथ चायना सीमधील पॅरासेल आयलंडपर्यंतचा भाग यापुढे चीनच्या किनारी क्षेत्राचा भाग (कोस्टल) म्हणून ओळखण्यात येईल, अशी घोषणा चीनने जुलै महिन्याच्या अखेरीस केली होती. चीनने १९७४ साली पॅरासेल आयलंडवर ताबा मिळविल्यानंतर त्याचा उल्लेख चीनच्या सागरी किनाऱ्यापासून काही अंतरावर असलेला भाग (ऑफशोअर) म्हणून केला होता. ‘ऑफशोअर’ऐवजी ‘कोस्टल’ असा बदल करून चीनने पुन्हा एकदा साऊथ चायना सी क्षेत्रावर आपलाच हक्क असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

पॅरासेल आयलंड

मात्र, साऊथ चायना सीमध्ये आपल्या वर्चस्ववादी महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी धडपडणार्‍या चीनला आंतरराष्ट्रीय पातळीवरून चांगलेच आव्हान मिळू लागले आहे. अमेरिका व युरोपसह जगातील अनेक प्रमुख तसेच लहान-मोठे देश चीनच्या कारवायांविरोधात उघड भूमिका घेत आहेत. जून महिन्यात, ‘कोहेसिव्ह अँड रिस्पोंसिव्ह आसियन’ या शीर्षकाखाली आयोजित केलेली आग्नेय आशियाई देशांची बैठक व्हिएतनाममध्ये पार पडली होती. त्यात ‘आसियन’ने साऊथ चायना सीमध्ये चिथावणीखोर कारवाया करणाऱ्या तसेच लष्करीकरणाचा प्रयत्न करणार्‍या चीनवरही टीकास्त्र सोडले होते. त्यापूर्वी आग्नेय आशियाई देशांनी अमेरिकेच्या साऊथ चायना सीविषयक आक्रमक भूमिकेला पाठिंबा देणारे निवेदनही प्रसिद्ध केले होते.

या हालचालींना शह देण्यासाठी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने लष्करी तैनाती वाढवण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. पॅरासेल आयलंडवर तैनात केलेले ‘शिआन एच-६जे’ हे चीनच्या हवाईदलातील सर्वात प्रगत बॉम्बर विमान म्हणून ओळखण्यात येते. पॅरासेल आयलंडचा भाग असणाऱ्या ‘वुडी आयलंड’वर दोन ‘शिआन एच-६जे’ बॉम्बर्स व काही लढाऊ विमाने तैनात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. चीनकडून साऊथ चायना सी क्षेत्रात सुरू असलेल्या या कारवायांसंदर्भात व्हिएतनामने भारताशी चर्चा केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info