रशियाचा बेलारूसशी अण्वस्त्रांच्या तैनातीचा करार

- घातक व बेजबाबदार निर्णय असल्याचा नाटोचा ठपका

मिन्स्क – युक्रेनच्या लष्कराकडून जिंकलेला बाखमतचा भूभाग कंत्राटी सैन्य पुरविणाऱ्या रशियाच्या वॅग्नर ग्रुपने रशियन लष्कराच्या हवाली केला. या युद्धात आपले २० हजार जवान ठार झाल्याचे वॅग्नर ग्रुपने म्हटले आहे. मात्र या बातमीपेक्षाही आंतरराष्ट्रीय माध्यमांचे लक्ष वेधून घेतले ते रशिया व बेलारूसमध्ये पार पडलेल्या ‘न्यूक्लिअर वेपन्स डील’ने. या करारानुसार रशिया आपली अण्वस्त्रे बेलारूसमध्ये तैनात करणार आहे. नाटोने स्वीकारलेल्या धोरणामुळे रशिया व बेलारूसला हा निर्णय घ्यावा लागल्याचा दावा दोन्ही देशांच्या संरक्षणमंत्र्यांनी केला आहे. तर नाटोने हा निर्णय घातक आणि बेजबाबदार असल्याचा ठपका ठेवला.

अण्वस्त्रांच्या तैनातीचा करार

रशियाचे संरक्षणमंत्री सर्जेई शोईगू व बेलारूसचे संरक्षणमंत्री व्हिक्टोर क्रेनिन यांनी गुरुवारी या ‘न्यूक्लिअर वेपन्स डील’वर स्वाक्षऱ्या केल्या. रशिया व बेलारूसला नाटोच्या कारवायांपासून फार मोठा धोका संभवतो. नाटोच्या आण्विक हालचालींमुळे संभवणारा धोका लक्षात घेऊन रशिया व बेलारूसला यासंदर्भात निर्णय घेणे भाग पडले. नाटोने रशिया व बेलारूसच्या विरोधात अघोषित युद्ध छेडलेले आहे, असे सांगून रशियाचे संरक्षणमंत्री शोईगू यांनी या कराराचे समर्थन केले.

या करारानुसार रशिया आपली अण्वस्त्रे बेलारूसमध्ये तैनात करणार आहे. याचा अर्थ रशिया बेलारूसला अण्वस्त्रे पुरवित आहे, असा होत नाही. तर बेलारूसमध्ये तैनात असली तरी ही अण्वस्त्रे रशियाच्याच ताब्यात राहतील. त्याचा वापर करायचा की नाही, याचा निर्णय रशियाच घेईल, असे संरक्षणमंत्री शोईगू यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी बेलारूसच्या संरक्षणासाठी रशिया या देशाला इस्कंदर क्षेपणास्त्रे पुरविणार असल्याची घोषणाही यावेळी संरक्षणमंत्री शोईगू यांनी केली. बेलारूसचे संरक्षणमंत्री क्रेनिन यांनी देखील नाटोच्या आक्रमक धोरणांमुळे परिस्थिती चिघळल्याने बेलारूसमध्ये अण्वस्त्रे तैनात करण्याचा निर्णय घ्यावा लागला असे म्हणाले. या तैनातीमुळे पाश्चिमात्य शक्तींना या क्षेत्रातील आपल्या कारवायांवर फेरविचार करावा लागेल, असे बेलारूसचे संरक्षणमंत्री पुढे म्हणाले. या अण्वस्त्रांच्या तैनातीला फार मोठे धोरणात्मक महत्त्व असल्याची बाब देखील संरक्षणमंत्री क्रेनिन यांनी लक्षात आणून दिली.

अण्वस्त्रांच्या तैनातीचा करार

युक्रेनचे युद्ध सुरू झाल्यानंतर, बेलारूसने रशियाचे उघडपणे समर्थन केले होते. इतकेच नाही तर पाश्चिमात्य देशांपासून संभवणारा धोका वाढल्याने रशियाने बेलारूसमध्ये अण्वस्त्रे तैनात करावी, अशी मागणी बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झँडर लुकोशिन्को यांनी केली होती.

रशियाच्या प्रभावक्षेत्रातील देशांना नाटोमध्ये सहभागी करून घेण्याच्या योजनेला फार मोठे यश मिळत असताना, रशियाने बेलारूसमध्ये अण्वस्त्रे तैनात करण्याची तयारी करून अमेरिका व नाटोच्या इतर सदस्यदेशांना फार मोठा धक्का दिल्याचे दिसते. नाटोने याची गंभीर दखल घेतली आहे. बेलारूसमध्ये अण्वस्त्रे तैनात करण्याचा रशियाचा निर्णय अतिशय घातक आणि बेजबाबदार असल्याचा ठपका नाटोने ठेवला आहे. तर नाटोने रशिया व बेलारूसच्या विरोधात पुकारलेल्या अघोषित युद्धाला मिळालेले हे प्रत्युत्तर असल्याचा दावा रशियन संरक्षणमंत्र्यांनी केला आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info