Breaking News

इस्रायलने सौदीला ‘आयर्न डोम’ पुरवावी – इस्रायलच्या लष्करी विश्‍लेषकाचा सल्ला

तेल अविव – येमेनमधील इराणसंलग्न हौथी बंडखोरांचे सौदी अरेबियावरील ड्रोन्स, रॉकेट्स आणि क्षेपणास्त्रांचे हल्ले वाढत चालले आहेत. हे हल्ले परतावून लावण्यासाठी इस्रायलने सौदीला ‘आयर्न डोम’ ही क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा पुरवावी, असे इस्रायलमधील आघाडीच्या अभ्यासगटाचे विश्‍लेषक जोएल गुझानस्की यांनी सुचविले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सौदीला शस्त्रविक्री करण्याचे थांबविले आहे. अशा परिस्थितीत, इराण हा समानशत्रू असलेल्या इस्रायलने सौदीला लष्करी सहाय्य करावे, असा सल्ला गुझानस्की यांनी दिला आहे.

‘आयर्न डोम’, शस्त्रविक्री, जोएल गुझानस्की, क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा, लष्करी सहाय्य, इस्रायल, सौदी, बाहरिन, TWW, Third World War

२०१५ सालापासून येमेनमध्ये गृहयुद्ध भडकले असून हौथी बंडखोरांनी राष्ट्राध्यक्ष सालेह यांची राजवट उधळून लावली आहे. त्याचबरोबर सालेह यांच्या राजवटीला समर्थन देणार्‍या सौदी अरेबियावरही हौथींनी हल्ले सुरू ठेवले आहेत. इराण हौथी बंडखोरांच्यामार्फत आपल्या ड्रोन्स व क्षेपणास्त्रांची चाचणी घेत असल्याचा आरोप केला जातो. गेल्या पाच वर्षांहून अधिक काळात हौथींनी सौदीवर ८६० हून अधिक ड्रोन्स व क्षेपणास्त्रांचे हल्ले चढविल्याचा दावा केला जातो. यामध्ये बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचाही समावेश आहे.

यापैकी काही बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे सौदीची राजधानी रियाधपर्यंत धडकली होती. पण अमेरिकेने सौदीमध्ये तैनात केलेल्या पॅट्रियॉट या यंत्रणेच्या सहाय्याने हौथींचे हे बॅलेस्टिक हल्ले सौदीने यशस्वीरित्या भेदले होते. सौदीची राजधानी तसेच इंधनक्षेत्रापर्यंत धडकणारी हौथींकडील बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांपासून फक्त सौदी किंवा अरब देशांनाच नाही तर इस्रायलच्या सुरक्षेलाही तितकाच धोका असल्याचा इशारा जोएल गुझानस्की यांनी दिला.

‘आयर्न डोम’, शस्त्रविक्री, जोएल गुझानस्की, क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा, लष्करी सहाय्य, इस्रायल, सौदी, बाहरिन, TWW, Third World War

‘इन्स्टिट्यूट फॉर नॅशनल सिक्युरिटी स्टडिज्’ (आयएनएसएस) या इस्रायली अभ्यासगटात आखातातील राजकारण आणि सुरक्षा या विषयावर गुझानस्की यांचा विशेष अभ्यास आहे. त्यांनी इस्रायली वर्तमानपत्रासाठी लिहिलेल्या लेखात सौदीला ‘आयर्न डोम’ ही इस्रायली क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा पुरविण्याचा सल्ला दिला आहे. लघु, मध्यम किंवा दीर्घ पल्ल्याचे रॉकेट्स आणि क्षेपणास्त्रे हाणून पाडण्यामध्ये इस्रायलने कौशल्य प्राप्त केले आहे. त्यामुळे इस्रायलने सौदीला देखील सदर यंत्रणा पुरवून इराण व इराणसंलग्न दहशतवादी संघटनांचे हल्ले रोखण्यासाठी सहाय्य करावे, असे गुझानस्की यांनी सुचविले.

गेल्या काही वर्षांपासून सौदीने मोठ्या प्रमाणात शस्त्रखरेदी केली आहे. पण तरीही सौदीच्या राजवटीची स्वसंरक्षणाची क्षमता मर्यादित आहे, याकडे गुझानस्की यांनी लक्ष वेधले. अमेरिकेने सौदीला पॅट्रियॉट ही क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा पुरविली असून पुढील दोन वर्षात थाड ही प्रगत हवाई सुरक्षा यंत्रणा देखील सौदीच्या संरक्षणदलात सामील होऊ शकते. पण अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने काही आठवड्यांपूर्वीच सौदीला शस्त्रविक्री रोखण्याचा निर्णय घेतला होता, याकडेही गुझानस्की यांनी लक्ष वेधले. युएईच्या बाबतीतही बायडेन प्रशासनाने असाच निर्णय घेतलेला आहे.

त्या पार्श्‍वभूमीवर, इस्रायलच्या ‘आयर्न डोम’ यंत्रणेच्या खरेदीसाठी सौदी तसेच युएई उत्सुक असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच इस्रायल सौदी, युएई व बाहरिन यांच्यासह स्वतंत्र लष्करी आघाडी उघडण्याच्या तयारीत असल्याचे दावे इस्रायली माध्यमांनी केले होते. युएईच्या कंपन्यांनी इस्रायली शस्त्रनिर्मिती कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info