अमेरिकेने नौदल वर्चस्व गाजवून चीनला चिथावणी देऊ नये – चीनचा इशारा

अमेरिकेने नौदल वर्चस्व गाजवून चीनला चिथावणी देऊ नये – चीनचा इशारा

बीजिंग/वॉशिंग्टन – अमेरिकेच्या युद्धनौकेने ‘पॅरासेल आयलंड’ क्षेत्रात घातलेली गस्त हा वर्चस्व गाजवून चिथावणी देण्याचा प्रकार असल्याचा आरोप चीनने केला आहे. तसेच अमेरिकेने पुन्हा असे प्रयत्न करू नये, अस इशाराही चीनच्या संरक्षणदलाने दिला आहे. शुक्रवारी अमेरिकेची प्रगत विनाशिका ‘युएसएस जॉन मॅक्केन’ ने साऊथ चायना सीमधील ‘पॅरासेल आयलंड’ जवळून गस्त घातली होती. गेले काही महिने अमेरिकेने साऊथ चायना सीच्या मुद्यावरून चीनवर दडपण वाढविण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी अमेरिका व मित्र देशांकडून साऊथ चायना सी क्षेत्रात सातत्याने युद्धनौकांची गस्त सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच कॅनडाच्या युद्धनौकेनेही साऊथ चायना सी क्षेत्रातून प्रवास केला होता.

चीनला चिथावणी

‘अमेरिकी विनाशिकेने चीनच्या परवानगीशिवाय सागरी हद्दीत प्रवेश करण्याची घटना नौदल सामर्थ्याच्या बळावर एकतर्फी वर्चस्व दाखविणारी बाब ठरते. ही उघड लष्करी चिथावणी आहे. अमेरिकेने अशा चिथावणीखोर कारवाया ताबडतोब थांबवाव्यात. अमेरिकेच्या कारवायांमुळे या क्षेत्रात दुर्घटना घडू शकते. त्यामुळे साऊथ चायना सीच्या सागरी तसेच हवाईहद्दीतील लष्करी मोहिमांवर अमेरिकेने नियंत्रण ठेवावे’, असा इशारा चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’चे प्रवक्ते कर्नल झँग नान्डॉंग यांनी दिला. अमेरिकेच्या मोहिमा चीनचे सार्वभौमत्त्व व हितसंबंधांचे उल्लंघन करणाऱ्या असून, त्याविरोधात चीन योग्य पावले उचलेल, असेही चिनी प्रवक्त्यांनी बजावले.

गेल्या काही महिन्यात चीनकडून साऊथ चायना सी क्षेत्रात जोरदार कारवाया सुरू आहेत. शेजारील देशांच्या नौका बुडविणे, सागरी हद्दीत घुसखोरी करणे व लष्करी सामर्थ्याच्या बळावर धमकावणे यासारखे उद्योग सातत्याने सुरू आहेत. चीनने आपल्या सागरी वाहतुकीशी निगडित नियमांमध्येही बदल केला आहे. त्यानुसार, चीनच्या हैनान प्रांतापासून साऊथ चायना सीमधील पॅरासेल आयलंडपर्यंतचा भाग यापुढे चीनच्या किनारी क्षेत्राचा भाग (कोस्टल) म्हणून ओळखण्यात येणार आहे. साऊथ चायना सी क्षेत्रावर आपलाच हक्क असल्याचे दाखविण्याचा हा नवा प्रयत्न मानला जातो आहे. यापूर्वी, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने ‘साऊथ चायना सी’ क्षेत्रातील सुमारे ८० भौगोलिक ठिकाणांना चिनी नावे देऊन ती आपल्याच मालकीची असल्याचा आव आणला होता. त्याचवेळी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सदर्न, नॉर्दर्न तसेच ईस्टर्न कमांडनकडून लढाऊ विमानांसह बॉम्बर्स, फ्युएल टँकर्स, टेहळणी विमाने व ‘अर्ली वॉर्निंग एअरक्राफ्टस्’चा सातत्याने सरावही सुरू आहे.

चीनला चिथावणी

चीनकडून आक्रमक हालचाली सुरू असतानाच अमेरिकेनेही वेगाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. साऊथ चायना सी क्षेत्रात अमेरिकेच्या टेहळणी व लढाऊ विमानांसह ड्रोन्सच्या फेऱ्या वाढल्याचे समोर आले आहे. गेल्या पाच महिन्यात अमेरिकेने, साऊथ चायना सी क्षेत्रात किमान चार वेळा विमानवाहू युद्धनौका व ‘कॅरिअर स्ट्राईक ग्रुप’ची तैनाती केली होती. त्याचवेळी ‘फ्री अँड ओपन इंडो-पॅसिफिक’ आणि ‘फ्रीडम ऑफ नॅव्हिगेशन’ धोरणानुसार अमेरिकी नौदलाच्या युद्धनौका सातत्याने साऊथ चायना सीमध्ये गस्तही घालत आहेत. शुक्रवारी अमेरिकी नौदलातील ‘युएसएस जॉन मॅक्केन’ य प्रगत विनाशिकेने घातलेली गस्तही त्याचाच भाग ठरतो. चीनकडून सातत्याने हल्ल्याच्या धमक्या व इशारे दिले जात असतानाही ते धुडकावून लावत, अमेरिका आपल्या वाढत्या संरक्षणतैनातीतून चीनला स्पष्ट सामरिक संदेश देत असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

चीनला चिथावणी

दरम्यान, अमेरिकेने आपली प्रगत ‘एफ-३५’ लढाऊ विमाने तैवानला द्यावीत, असा सल्ला अमेरिकेच्या माजी संरक्षण अधिकाऱ्याने केला आहे. गेले काही दिवस चीन तैवाननजीकच्या क्षेत्रात आपल्या लष्करी सामर्थ्याचे आक्रमकरित्या प्रदर्शन करीत आहे. चीनचे माजी अधिकारी, विश्लेषक व प्रसारमाध्यमे सातत्याने तैवानवर हल्ले चढविण्याच्या धमक्याही देत आहेत. या पार्श्वभूमीवर, चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी ‘एफ-३५’ सारखे स्टेल्थ तंत्रज्ञान असणारे ‘फिफ्थ जनरेशन फायटर’ निर्णायक ठरेल, असा दावा ‘पेंटागॉन’चे माजी अधिकारी स्टीफन ब्रिएन यांनी केला. चीनकडे अनेक प्रगत लढाऊ विमाने व बॉम्बर्स असून, त्याला प्रत्युत्तर देऊन चीनवर हल्ला करण्यास आवश्यक असलेल्या प्रगत विमानांचा तैवानकडे अभाव असल्याचे ब्रिएन यांनी म्हटले आहे. तैवानसाठी अमेरिका ‘एफ-३५’चा समावेश असलेला ‘स्टँडबाय फोर्स’ तयार ठेऊ शकते किंवा ही विमाने तैवानला ‘लीज’वर दिली जाऊ शकतात, असा सल्ला त्यांनी दिला आहे. तैवानकडे सध्या अमेरिकेने दिलेली ‘एफ-१६’ व ‘एफ-५’ आणि ‘मिराज २०००’ ही लढाऊ विमाने आहेत.

अमेरिकेकडून तैवानची संरक्षणसज्जता वाढविण्याचे प्रयत्न सुरू असतानाच, चीनने शुक्रवारी पुन्हा तैवानच्या हवाईहद्दीत घुसखोरी केल्याचे समोर आले आहे. शनिवारी तैवान आपला ‘नॅशनल डे’ साजरा करीत असून, त्या पार्श्वभूमीवर घुसखोरी करून चीनने तैवानला धमकावण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते. चीनने ‘वाय-८’ व ‘वाय-९’ ही ‘अँटी सबमरीन एअरक्राफ्टस्’ पाठवल्याची माहिती तैवानच्या संरक्षण विभागाने दिली.

हिंदी    English

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info