मॉस्को – डोन्बास क्षेत्रात नवे युद्ध सुरू करण्याचा प्रयत्न करणारे घटक युक्रेनच्या विनाशासाठी कारणीभूत ठरतील, असा खळबळजनक इशारा रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिला आहे. पाश्चात्य देश युक्रेनला नव्या संघर्षासाठी चिथावणी देत असल्याचा आरोपही परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी केला. गेल्याच आठवड्यात डोन्बासमध्ये झालेल्या संघर्षात युक्रेनच्या चार जवानांचा बळी गेल्याची माहिती लष्कराने दिली होती. तर दुसर्या बाजूला रशियन लष्कर सरावाच्या निमित्ताने पूर्व युक्रेननजिक मोठ्या प्रमाणावर लष्करी जमवाजमव करीत असल्याचे दावे पाश्चात्य माध्यमांमध्ये करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी दिलेला थेट इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.
गेल्याच आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी युक्रेनच्या मुद्यावर रशियाला इशारा दिला होता. ‘२०१४ साली रशियाने युक्रेनचा भूभाग असलेल्या क्रिमिआ बळकावला होता. याला अमेरिका कधीही मान्यता देणार नाही. आपला सहकारी देश असलेल्या युक्रेनच्या मागे अमेरिका ठामपणे उभी राहिल’, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी बजावले होते. त्यानंतर अमेरिकेच्या संरक्षण विभागाने रशियन संरक्षणदलांच्या युरोप व युक्रेननजिकच्या भागातील हालचाली वाढल्याचा दावा करून युरोपिअन कमांडला ‘हायेस्ट ऍलर्ट’ जारी केला होता.
या पार्श्वभूमीवर रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी आक्रमक इशारा देऊन, रशिया माघार घेणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. ‘प्रसारमाध्यमांमध्ये वेगवेगळी वृत्ते व दावे प्रसिद्ध होत आहेत. डोन्बासमध्ये युद्ध छेडण्यासाठी कारवाई केल्याच त्याचे परिणाम काय होऊ शकतात, याची संबंधित लष्कराला योग्य जाणीव असेल. लष्कराला युद्ध छेडण्यास राजकीय नेते भाग पाडणार नाहीत, अशी मला आशा आहे. युक्रेनमधील राजकीय नेत्यांना अमेरिका व मित्रदेश चिथावणी देत आहेत. डोन्बासमध्ये युद्ध छेडण्याची तयारी करणार्यांनी, त्यांची अशी कृती युक्रेनचा विनाश घडवून आणेल, हे लक्षात ठेवावे’, असे लॅव्हरोव्ह यांनी बजावले.
रशियाकडून युक्रेननजिकच्या क्षेत्रात लष्करी सरावाची तयारी सुरू आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर लष्करी जमवाजमव चालू असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. रशियाच्या या लष्करी तयारीवर युक्रेनकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. युक्रेनच्या संसदेत यासंदर्भात ठरावही मंजूर झाला असून, त्यात रशियाने डोन्बासमधील आपली तैनाती ताबडतोब हटवावी असा इशारा देण्यात आला आहे. युक्रेनच्या नेत्यांनी रशिया संघर्षबंदीसाठी तयार नसल्याचा आरोपही केला आहे.
गेल्या काही दिवसात रशिया व पाश्चात्य देशांमधील संबंध बिघडले असून रशियानेही त्याची स्पष्ट कबुली दिली आहे. युक्रेनमध्ये संघर्ष सुरू झाल्यास रशिया व पश्चिमी देशांमधील तणाव अधिक चिघळण्याची भीती विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |