कोरोनाची साथ हा चीनच्या जैविक शस्त्रांच्या संशोधनातील पहिला धोका – अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांचा इशारा

कोरोनाची साथ हा चीनच्या जैविक शस्त्रांच्या संशोधनातील पहिला धोका – अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांचा इशारा

वॉशिंग्टन – ‘कोरोनाची साथ चीनमधील प्रयोगशाळेतूनच सुरू झाली. चीनच्या सत्ताधारी राजवटीकडून अजूनही जैविक शस्त्रांवर संशोधन सुरू आहे. त्यामुळे भविष्यात कोरोनाच्या साथीइतक्याच किंवा त्याहून अधिक वाईट साथींच्या विळख्यात जग सापडू शकते. चीनच्या प्रयोगशाळेतून कोरोनाप्रमाणेच पुन्हा एखाद्या विषाणूचा धोका निर्माण होण्याची शक्यता वास्तवात उतरू शकते’, असा इशारा अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी दिला.

‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने (डब्ल्यूएचओ) चीनमधून सुरू झालेल्या कोरोना साथीसंदर्भातील एक अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. यात कोरोनाची साथ चीनच्या वुहान प्रयोगशाळेतून सुरू झाल्याचे नाकारण्यात आले आहे. मात्र त्याचवेळी कोरोनाचा उगम व चीनची भूमिका यासंदर्भात अधिक अभ्यास होण्याची गरजही व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्र्यांनी केलेली टीका महत्त्वाची ठरते.

एका ऑस्ट्रेलियन दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत पॉम्पिओ यांनी, कोरोनाची साथ चीनच्या प्रयोगशाळेतून सुरू झाल्याचा दावा सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे उपलब्ध असल्याचेही स्पष्ट केले. चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीने कोरोना साथीची माहिती दडपल्याचा आरोपही त्यांनी केला. चीनने कोरोनाबाबत स्वीकारलेल्या धोरणामुळे लाखो जणांना जीव गमवावा लागला व अब्जावधी डॉलर्स वाया गेले, याकडेही अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्र्यांनी लक्ष वेधले. पुढील काळात चीनकडून असे काही पुन्हा घडणार नाही, यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने सावधगिरी बाळगायला हवी, असेही पॉम्पिओ यांनी यावेळी बजावले.

चीनकडून लोकशाहीविरोधात सुरू असलेल्या कारवाया व इतर आक्रमक धोरणांवरही माईक पॉम्पिओ यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. ‘जगाच्या वेगवेगळ्या भागांमधील लोकशाही कमकुवत करणे हेच चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीचे मूळ उद्दिष्ट आहे. मार्क्स-लेनिनवादी विचारसरणी हीच जगासाठी योग्य विचारसरणी असल्याची त्यांची धारणा आहे. ही विचारसरणी इतरांवर लादण्यासाठी चीन प्रयत्न करीत आहे’, असा आरोप अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्र्यांनी केला.

हॉंगकॉंग, झिंजिआंग व तैवानमध्ये सुरू असलेल्या कारवायांवरूनही पॉम्पिओ यांनी चीनला लक्ष्य केले. हे मुद्दे उपस्थित झाले की प्रत्येक वेळी चीन ‘अंतर्गत बाब’ असल्याचे सांगून इतरांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करते. मात्र आंतरराष्ट्रीय नियम व करार तोडल्यास त्याची किंमत मोजावी लागेल, याची जाणीव अमेरिका व मित्रदेशांनी चीनला करून देण्याची गरज आहे, असा इशाराही माजी परराष्ट्रमंत्र्यांनी यावेळी दिला.

यापूर्वी पॉम्पिओ यांनी बायडेन प्रशासनाने चीनबाबत स्वीकारलेल्या मवाळ धोरणावर जोरदार टीकास्त्र सोडले होते.‘अमेरिकेचे विद्यमान प्रशासन फारच मवाळ असल्याची जाणीव जिनपिंग यांनी झाली आहे. फक्त विरोध करायचा म्हणून बायडेन प्रशासन विरोध करणार, त्यापलिकडे कुठलीही कृती करू शकणार नाही, हे जिनपिंग यांना कळून चुकले आहे’, असे पॉम्पिओ यांनी गेल्या महिन्यात अमेरिकी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info