लाखोजणांचा बळी घेणार्‍या सिरियातील गृहयुद्धाला दहा वर्षे पूर्ण झाली

लाखोजणांचा बळी घेणार्‍या सिरियातील गृहयुद्धाला दहा वर्षे पूर्ण झाली

दमास्कस – सिरियातील गृहयुद्धाला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत सिरियातील गृहयुद्धात सुमारे एक लाख १७ हजाराहून अधिकजणांचे बळी गेल्याची नोंद झालेली आहे. मात्र ही जाहीर करण्यात आलेली बळींची संख्या आहे. प्रत्यक्षात सिरियातील हिंसाचारात तीन लाख, ८७ हजाराहून अधिक बळी गेले आहेत. कदाचित बळींची संख्या सहा लाखांच्या जवळ जाऊ शकते, अशी चिंता सिरियातील मानवाधिकार संघटनांनी व्यक्त केली आहे. या घनघोर संघर्षामुळे जीव वाचवण्यासाठी शेजारी देशांमध्ये धाव घेणार्‍या सिरियन विस्थापितांची संख्या ५५ लाखांच्याही पुढे आहे. तर आपले घर सोडून सिरियातच सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतलेल्यांची संख्या ७६ लाखांवर आहे.

२०१० साली ट्युनिशियामध्ये हुकूमशाही राजवटींविरोधात ‘जस्मिन रिव्होल्युशन’ पेटले होते. या आंदोलनाने ट्युनिशिया तसेच पुढच्या काही महिन्यांमध्ये इजिप्त, लिबियातील हुकूमशाही राजवटी उलथल्या होत्या. १५ मार्च २०११ साली सिरियातील बशर अल-अस्साद राजवटीविरोधात या आंदोलनाची ठिणगी पडली. इजिप्तमधील होस्नी मुबारक, लिबियातील मुअम्मर गद्दाफी यांच्याप्रमाणे सिरियातील अस्साद यांचे साम्राज्यही उधळले जाईल, असे दावे केले जात होते. पण गेल्या दहा वर्षांपासून अस्साद राजवटीच्या विरोधातील गृहयुद्ध अजूनही सुरूच आहे.

या गृहयुद्धात अस्साद राजवटीच्या विरोधात अमेरिका व अरब देशांचे समर्थन असलेले ‘सिरियन डेमोक्रॅटिक फ्रंट’ (एसडीएफ) व कुर्द बंडखोरांचा-‘वायपीजी’ संघर्ष करीत आहेत. तर तुर्कीचे समर्थन असलेले ‘सिरियन नॅशनल आर्मी’ (एसएनए) गटही यात सहभागी आहे. तर अस्साद राजवटीच्या समर्थनार्थ इराणचे रिव्होल्युशनरी गार्ड्स, कुद्स फोर्सेस या लष्करी पथकाबरोबर हिजबुल्लाह, कतैब हिजबुल्लाह व इतर दहशतवादी संघटनाही सहभागी झाल्या आहेत. सिरियामध्ये लष्करी तळ असलेल्या रशियाने २०१५ साली या गृहयुद्धात उडी घेतली. सिरियातील गृहयुद्धाचा फायदा घेऊन सुरुवातीला अल कायदा व त्यानंतर २०१३ साली ‘आयएस’ या दहशतवादी संघटनांनी सिरियात मोठ्या प्रमाणात नरसंहार घडविला. ‘आयएस’ने सुरू केलेल्या नरसंहारामुळे सिरियातील लाखो जण तुर्की, लेबेनॉन, जॉर्डन, इराक आणि इजिप्तमधील शरणार्थी शिबिरात राहत आहेत. तर संयुक्त राष्ट्रसंघाने सिरियातच उभारलेल्या शिबिरांमध्ये राहणार्‍यांची संख्या ७६ लाखांहून अधिक असल्याचा दावा केला जातो. यामध्ये दोन तृतियांश इतक्या प्रमाणात महिला व मुलांचा समावेश असल्याची चिंता मानवाधिकार संघटना व्यक्त करीत आहे.

सध्या सिरियाचा ६३ टक्के भूभाग अस्साद राजवटीच्या ताब्यात आहे. यामध्ये मध्य आणि दक्षिण सिरियाचा समावेश आहे. तर अमेरिकेचे समर्थन असलेल्या ‘एसडीएफ’च्या ताब्यात २५ टक्के भूभाग आहे. तुर्कीने सिरियाच्या उत्तरेकडील सीमाभागावर आपली पकड बसविली आहे.

गेल्या दहा वर्षांच्या गृहयुद्धाने अस्साद राजवटीच्या समर्थनार्थ लढणारे टोळीवाले नेते आता अधिक प्रबळ झाल्याची टीका होत आहे. त्याचबरोबर सिरियाच्या इंधनाच्या साठ्यांवर कुर्द बंडखोर तसेच तुर्कीसंलग्न दहशतवादी संघटनांनी ताबा घेतला आहे. तुर्कीसंलग्न संघटना इंधनाची तस्करी करीत असून रशिया व सिरियाची विमाने यावर हवाई हल्ले चढवित आहेत. यामुळे सिरियाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून सुमारे ७५ टक्के जनता दारिद्ˆयरेषेखाली गेल्याची माहिती दोन वर्षांपूर्वीच्या पाहणीतून समोर आली होती.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info