चीनच्या विमानवाहू युद्धनौकेचा तैवानच्या आखाताजवळ सराव – अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका साऊथ चायना सीमध्ये दाखल

चीनच्या विमानवाहू युद्धनौकेचा तैवानच्या आखाताजवळ सराव – अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका साऊथ चायना सीमध्ये दाखल

बीजिंग/वॉशिंग्टन – गेल्या चोवीस तासांमध्ये ‘ईस्ट व साऊथ चायना सी’च्या क्षेत्रातील कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. चीनच्या ‘लिओनिंग’ विमानवाहू युद्धनौकेने जपानच्या मियाकोच्या आखातातून प्रवास करून तैवानच्या आखाताजवळ युद्धसराव सुरू केला आहे. चीनच्या युद्धनौकेचा हा युद्धसराव जपान आणि तैवानसाठी इशारा असल्याचा दावा केला जातो. त्याचवेळी अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका ‘युएसएस थिओडोर रूझवेल्ट’ आपल्या ताफ्यासह ‘साऊथ चायना सी’मध्ये दाखल झाली आहे. वर्षभरानंतर अमेरिका व चीनच्या विमानवाहू युद्धनौका एकमेकांसमोर येतील, अशी भीतीदायक शक्यता माध्यमांकडून वर्तविली जात आहे.

जपानच्या संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, चीनच्या ‘लिओनिंग’ विमानवाहू युद्धनौकेने आपल्या पाच विनाशिकांच्या ताफ्यासह आक्रमक सागरी हालचाली केल्या. या युद्धनौकांनी जपानच्या ओकिनावा बेटांच्या सागरी हद्दीजवळून, मियाकोच्या आखातातून प्रवास केला. चीनच्या युद्धनौकांनी जपानच्या सागरी क्षेत्राचे उल्लंघन केलेले नाही, असे जपानच्या संरक्षण मंत्रालयाने सागितले. पण चिनी युद्धनौकांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी जपानने आपली विनाशिका आणि गस्तीनौका रवाना केल्या.

गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात देखील चीनच्या युद्धनौकेने जपानच्या ओकिनावा बेटांजवळून पॅसिफिक महासागरात प्रवास केला होता. त्यावेळी चिनी युद्धनौकांनी जपानच्या विनाशिकांच्या दिशेने धोकादायक प्रवास केल्याची टीकाही झाली होती. पण यावेळी मियाकोचे आखात ओलांडल्यानंतर चीनच्या विनाशिका यु टर्न घेऊन सोमवारी उशीरा तैवानच्या आखाताजवळ धडकल्या. चिनी युद्धनौकांनी तैवानच्या आखाताजवळ युद्धसराव सुरू केला.

चीनच्या विमानवाहू युद्धनौकेचा गेल्या २४ तासातील हालचाली जपान आणि तैवानसाठी इशारा असल्याचा दावा या दोन्ही देशांची माध्यमे करीत आहेत. गेल्या काही आठवड्यांमध्ये जपानने इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील भारत, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया या देशांबरोबर सहकार्य वाढविले आहे. तर जपान व अमेरिकेत ‘टू प्लस टू’ चर्चा पार पडली असून पुढच्या आठवड्यात जपानचे पंतप्रधान अमेरिकेच्या दौर्‍यावर जात आहेत. त्याआधी चीनने जपानला धमकावल्याचा दावा जपानची माध्यमे करीत आहेत.

तर गेल्या काही आठवड्यांमध्ये तैवानने आंतरराष्ट्रीय स्तरावर राजकीय हालचाली वाढविल्या आहेत. गेेल्या आठवड्यात तैवानच्या विशेषदूतांनी अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांची भेट घेतली. या पार्श्‍वभूमीवर, सदर युद्धसरावाद्वारे चीन तैवानला इशारा देत असल्याची टीका स्थानिक माध्यमे करीत आहेत. ईस्ट चायना सीच्या क्षेत्रातील चीनच्या हालचाली वाढत असताना, अमेरिकेची अजस्त्र विमानवाहू युद्धनौका ‘रूझवेल्ट’ आपल्या ताफ्यासह साऊथ चायना सीमध्ये दाखल झाली आहे.

फिलिपाईन्सच्या सागरी क्षेत्रात चीनच्या दोनशेहून अधिक मिलिशिया जहाजांनी घुसखोरी केली आहे. या घुसखोरीच्या विरोधात फिलिपाईन्सने आक्रमक भूमिका घेतली आहे. अशावेळी अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौकेचे या क्षेत्रात दाखल होणे, चीनसाठी आव्हान असल्याचे दिसत आहे.

हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info