राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणवर हल्ल्याची तयारी केली होती अमेरिकेच्या वर्तमानपत्राचा दावा

न्यूयॉर्क – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणच्या सर्वात महत्त्वाच्या नातांझ अणुप्रकल्पावर हवाई हल्ले चढविण्याबाबत गांभीर्याने विचार करीत होते. गेल्या आठवड्यात आपल्या मंत्र्यांबरोबर चर्चा करताना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या पर्यायाविषयी विचारणा केली होती. पण मंत्र्यांनी विरोध केल्यामुळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना सदर पर्याय तूर्तास बाजूला ठेवावा लागला, अशी बातमी ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ या अमेरिकी वर्तमानपत्राने काही अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिली. अद्याप हा निर्णय घेतलेला नसला तरी, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणवरील हल्ल्याचा विचार सोडून दिलेला नाही, असे या अधिकाऱ्याने बजावल्याचे ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ने म्हटले आहे.

इराणवर हल्ल्याची तयारी

गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने इराणच्या अणुकार्यक्रमावर ठपका ठेवला होता. 2015 साली पाश्‍चिमात्य देशांबरोबर झालेल्या अणुकराराची मर्यादा ओलांडून इराणने युरेनियमचा 12 पट अधिक साठा केल्याचा आरोप अणुऊर्जा आयोगाने केला होता. अणुऊर्जा आयोगाच्या या अहवालानंतर गेल्या गुरुवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या मंत्र्यांची तसेच सल्लागारांची बैठक बोलाविली होती. उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स, परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ, नवनियुक्त संरक्षणमंत्री खिस्तोफर मिलर आणि संरक्षणदलप्रमुख मार्क मिले तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचा यात समावेश होता.

इराणवर हल्ल्याची तयारी

या बैठकीत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणच्या नातांझ अणुप्रकल्पावर हल्ला चढविण्याच्या पर्यायावर चर्चा केली होती. मात्र, इराणच्या अणुप्रकल्पावर हल्ला चढविल्यास भयंकर संघर्षाचा भडका उडेल, असे सांगून ट्रम्प यांच्या मंत्र्यांनीच याला विरोध केल्याची माहिती बैठकीशी संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. असे असले तरी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प इराणच्या इतर ठिकाणांवर किंवा इराकमधील इराणसंलग्न गटांवर हल्ले चढविण्याचा विचार करू शकतात, असा इशाराही अमेरिकी अधिकारी देत आहेत. इराणवर सायबर हल्ल्याची शक्यता नाकारता येणार नाही, असा दावा या अधिकाऱ्यांनी केल्याचे ‘द न्यूयॉर्क टाईम्स’चे म्हणणे आहे.

इराणवर हल्ल्याची तयारी

नातांझ येथे इराणचा सर्वात महत्त्वाचा अणुप्रकल्प आहे. या अणुप्रकल्पातील युरेनियमचा साठा इराणला अणुबॉम्ब निर्मितीच्या जवळ नेत असल्याचा दावा केला जातो. याच अणुप्रकल्पाच्या ठिकाणी काही महिन्यांपूर्वी संशयास्पद स्फोट झाले होते. त्यामागे इस्रायल असल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. आता अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प देखील सदर अणुप्रकल्पावरच हल्ल्याचा विचार करीत असल्याचे ‘द न्यूयॉर्क टाईम्स’च्या बातमीवरून समोर येत आहे.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे केवळ 70 दिवसांसाठी सत्तेवर असतील, पण इराणची राजवट कायमस्वरूपी असेल, असे सांगून इराणने काही दिवसांपूर्वी अरब देशांना धमकावले होते. मात्र, या दोन महिन्यांच्या कालावधीतही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प इराणला कायमची अद्दल घडवू शकतात आणि तसे करताना ट्रम्प प्रशासन कचरणार नाही, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी इराणला बजावले आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info