चीनने तैवानच्या मुद्यावर लष्करी साहसवादाला प्रोत्साहन देऊ नये

- तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन यांचा इशारा

तैपेई/बीजिंग – चीन व तैवानमधील मतभेद मिटविण्यासाठी लष्करी पर्यायाचा वापर हा उपाय नसून चीनच्या राजवटीने अशा लष्करी साहसवादाला प्रोत्साहन देऊ नये, असा इशारा तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन यांनी दिला. यावेळी तैवानच्या राष्ट्राध्यक्षांनी हॉंगकॉंगमधील मानवाधिकार व लोकशाहीवरही चिंता व्यक्त केली. दरम्यान, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी चीनच्या जनतेला संबोधित करताना पुन्हा एकदा तैवानचा मुद्दा उपस्थित करताना मातृभूमीचे विलिनीकरण महत्त्वाचा टप्पा असेल, असे बजावले आहे.

लष्करी साहसवादाला प्रोत्साहन

गेल्या काही महिन्यात तैवानचा मुद्दा चिघळत असल्याचे सातत्याने समोर येत आहे. चीन लष्करी तसेच राजनैतिक पातळीवर तैवानविरोधात आक्रमक पावले उचलत आहे. तैवानला समर्थन देणार्‍या देशांवर दडपण आणणे, तैवानला युद्धाच्या धमक्या देणे व युद्धनौका, पाणबुड्या तसेच लढाऊ विमाने तैवानच्या हद्दीनजिक पाठविणे या माध्यमातून चीन तैवानच्या मुद्यावर माघार घेणार नसल्याचे दाखवून देत आहे. चीनच्या या कारवायांवरून चीन व तैवानच्या नेतृत्त्वात शाब्दिक चकमकी उडाल्याचेही दिसून येते. जिनपिंग यांचे वक्तव्य व इंग-वेन यांचा इशारा त्याचाच भाग असल्याचे दिसत आहे.

लष्करी साहसवादाला प्रोत्साहन

नववर्षाच्या पूर्वसंध्येला चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी कम्युनिस्ट राजवटीची कामगिरी व उद्दिष्टांचा उल्लेख केला. ‘एक देश, दोन व्यवस्था या सूत्राची योग्य अंमलबजावणी महत्त्वाची असून हॉंगकॉंग व मकावचे स्थैर्य चीनसाठी आवश्यक आहे. मातृभूमीचे एकत्रीकरण ही चीन व तैवान दोन्ही भागातील जनतेची इच्छा आहे’, अशा शब्दात जिनपिंग यांनी तैवानच्या विलिनीकरणाची मोहीम पुढे चालू राहिल, असे बजावले. जिनपिंग यांच्या या वक्तव्याला तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन यांनी आपल्या भाषणातून प्रत्युत्तर दिले.

‘तैवानच्या स्थितीबाबत चीनच्या सत्ताधार्‍यांनी गैरसमज करून घेऊ नये. तैवान मुद्यावर सुरू असलेला लष्करी साहसवाद रोखण्यासाठी पावले उचलावीत. चीन व तैवानमधील मतभेद सोडविण्यासाठी लष्करी आक्रमण हा पर्याय असू शकत नाही, याची चीनने जाणीव ठेवावी’, असा इशारा तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन यांनी दिला. लोकशाही व स्वातंत्र्यासाठी धडपड करणे हा काही गुन्हा नाही आणि एकाधिकारशाही असलेल्या चीनपुढे तैवान कधीही झुकणार नाही, असेही तैवानच्या राष्ट्राध्यक्षा पुढे म्हणाल्या. हॉंगकॉंगला देण्यात येणारे समर्थन तैवान कधीच मागे घेणार नसल्याचेही इंग-वेन यांनी बजावले.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info