रशियाकडून युक्रेनचा अंत करण्याची धमकी – अमेरिका ब्लॅक सीमध्ये विनाशिका रवाना करण्याच्या तयारीत

रशियाकडून युक्रेनचा अंत करण्याची धमकी – अमेरिका ब्लॅक सीमध्ये विनाशिका रवाना करण्याच्या तयारीत

मॉस्को/किव्ह – युक्रेनने डोन्बासमधील जनतेवर लष्करी कारवाई केली, तर या जनतेच्या सुरक्षेसाठी रशियाकडून केल्या जाणार्‍या कारवाईने युक्रेनचा अंत होईल, अशी धमकी रशियाने दिली. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी काही तासांपूर्वी डोन्बासला भेट देऊन इथल्या जवानांचा आत्मविश्‍वास वाढविला. तसेच युक्रेनला नाटोने सदस्य करून घ्यावे, असे आवाहन झेलेन्स्की यांनी केले. त्यानंतर रशियाने युक्रेनला ही धमकी दिली आहे. दरम्यान, रशिया आणि युक्रेनच्या सीमेवर वाढलेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकेने ब्लॅक सीच्या क्षेत्रात आपली विनाशिका धाडण्याची तयारी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेनच्या सीमेवरील तणाव शिगेला पोहोचला आहे. युक्रेन डोन्बासमधील जनतेवर लष्करी कारवाई करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप रशिया करीत आहे. यासाठी रशियाने युक्रेनच्या सीमेजवळ रणगाड्यांची जमवाजमव केल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. रशिया पुन्हा एकदा २०१४ सालाप्रमाणे युक्रेनच्या पूर्वेकडील भागावर लष्करी कारवाईच्या तयारीत असल्याचा आरोप अमेरिकेने केला होता.

युक्रेनचा अंत

तर युक्रेनने देखील डोन्बासजवळ मोठ्या प्रमाणात लष्करी हालचाली केल्या आहेत. याशिवाय युक्रेनने नाटोबरोबर ‘कोझॅक मेस’ या युद्धसरावाची घोषणा केली असून नाटोचे हजारो जवान युक्रेनमध्ये दाखल होणार आहेत. याशिवाय युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी आपल्या देशाला नाटोचे सदस्यत्व द्यावे, अशी मागणी उचलून धरली आहे. नाटोचे सदस्यत्व मिळाल्यानंतर डोन्बासमधील युुद्ध संपुष्टात येईल. कारण युक्रेनला नाटोचे सदस्यत्व मिळाले तर रशियाला योग्य संदेश जाईल, असे झेलेन्स्की यांनी नाटोच्या अधिकार्‍यांबरोबर झालेल्या चर्चेत स्पष्ट केले.

नाटोचे सदस्य मिळालेला युक्रेन पुढे डोन्बासमध्ये बंडखोरांवर कारवाई करू शकतो, असे बोलले जाते. त्यामुळे झेलेन्स्की यांनी नाटोकडे केलेल्या मागणीवर रशियाकडून प्रतिक्रिया आली आहे. ‘‘युक्रेनने डोन्बासमधील जनतेवर कारवाईचा विचारही करू नये. कारण डोन्बासमध्ये ‘स्रेब्रेनिका’ घडले तर येथील जनतेच्या सुरक्षेसाठी रशिया नक्की हस्तक्षेप करील. असे झाले तर युक्रेनचा अंत होईल’’, अशी धमकी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ दिमित्री कोझॅक यांनी दिली.

१९९५ साली बोस्नियाच्या स्रेब्रेनिकामध्ये भीषण हत्याकांड घडले होते. यामध्ये आठ हजाराहून अधिक बोस्नियन इस्लामधर्मियांचा बळी गेला होता. त्याचा दाखला देऊन कोझॅक यांनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना धमकावले आहे. कोझॅक यांचा जन्म देखील डोन्बासमध्येच झाल्याचे रशियन माध्यमे लक्षात आणून देत आहेत.

दरम्यान, रशिया व युक्रेनमधील या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिका ‘ब्लॅक सी’मध्ये विनाशिका रवाना करणार असल्याची माहिती अमेरिकी वृत्तवाहिनीने दिली. तशीच आवश्यकता असेल तर अमेरिका एकाहून अधिक विनाशिका रवाना करू शकतो, असे या घडामोडींशी संबंधित अमेरिकी अधिकार्‍याच्या हवाल्याने सदर वृत्तवाहिनीने माहिती प्रसिद्ध केली.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info