Breaking News

इंडोनेशियाची पाणबुडी संशयास्पदरित्या बेपत्ता

जकार्ता – इंडोनेशियन नौदलाची पाणबुडी ‘केआरआय नांगाला ४०२’ बुधवारी बेपत्ता झाली. बाली बेटाच्या सागरी हद्दीतून बेपत्ता झालेल्या या पाणबुडीवर ५३ नौदल अधिकारी होते. इंडोनेशियाच्या सुरक्षा यंत्रणा पाणबुडीच्या शोधासाठी लागल्या असून ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूरने देखील आपल्याला यासाठी सहाय्य करावे, असे आवाहन इंडोनेशियाने केले आहे.

इंडोनेशियाचे लष्करप्रमुख हादी तज्जांतो यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘केआरआय नांगाला ४०२’ पाणबुडी बुधवारी युद्धसरावात सहभागी होणार होती. या सरावासाठी बंदरात दाखल होण्याआधीच सदर पाणबुडीचा संपर्क तुटला. बाली बेटापासून उत्तरेकडील ६० मैल अंतरावर पाणबुडी बेपत्ता झाल्याचा दावा केला जातो.

पाणबुडीच्या शोधासाठी नौदलाने विनाशिका, गस्तीनौका तसेच हायड्रोग्राफिक शोधजहाज देखील तैनात केले आहे. याशिवाय हेलिकॉप्टर्सच्या सहाय्याने देखील हवाई सर्वेक्षण सुरू आहे. सदर पाणबुडी शेवटची संपर्कात होती, त्याठिकाणी इंधनगळती झाल्याचा दावा केला जातो. त्यामुळे पाणबुडी ७०० मीटर खोल गेल्याचा दावा स्थानिक वृत्तवाहिनीने केला आहे. अशाप्रकारच्या दुर्घटनांसाठी आवश्यक पाणबुडी बचाव जहाज ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूरकडे आहे. त्यामुळे इंडोनेशियाच्या सरकारने या आपल्या दोन्ही शेजारी देशांना पाणबुडीच्या तपासासाठी सहाय्य मागितले आहे. या पाणबुडीमध्ये वरिष्ठ अधिकार्‍यासह तीन गनर आणि ४९ नौसैनिक होते.

जर्मन बनावटीची ही पाणबुडी १९८१ साली इंडोनेशियाच्या नौदलात सामील झाली होती. गेली चार दशके इंडोनेशियाच्या नौदलाच्या सेवेत असलेल्या पाणबुडीची २०१२ साली दक्षिण कोरियामध्ये दुरूस्ती झाली होती. इंडोनेशियाच्या नौदलात एकूण पाच पाणबुड्या आहेत. २०२४ सालापर्यंत आणखी तीन पाणबुड्या नौदलाच्या सेवेत दाखल करण्यासाठी इंडोनेशियाचे प्रयत्न सुरू आहेत.

इंडोनेशिया १७ हजाराहून लहानमोठ्या बेटांचा देश असून या देशाच्या सागरी सुरक्षेला गेल्या काही वर्षांपासून आव्हाने मिळत आहेत. इंडोनेशियाच्या नतूना बेटांच्या हद्दीतील चीनच्या मच्छिमार जहाजांच्या घुसखोरी वाढल्या आहेत. गेल्या वर्षी चीनच्या या घुसखोरीवर इंडोनेशियाने आक्षेप नोंदविला होता. यावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी प्रतिक्रिया देताना, चीन दावा करीत असलेल्या सागरी क्षेत्रात मासेमारी करण्यासाठी चीनची जहाजे स्वतंत्र असल्याचे म्हटले होते.

यानंतर इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी नतूना बेटाला भेट दिली. तसेच आपल्या सार्वभौमत्वाच्या सुरक्षेसाठी इंडोनेशिया सक्षम असल्याची घोषणा केली होती. तसेच चीनच्या जहाजांना आपल्या सागरी क्षेत्रातून निघून जाण्याचा इशारा दिला होता. काही आठवड्यांपूर्वी इंडोनेशियाच्या मच्छिमारांनी चीनच्या नौदलाचे सागरी ड्रोन्स देखील हस्तगत केले होते.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info