अमेरिकेतील सर्वात मोठ्या इंधनवाहिनीवर सायबरहल्ला

अमेरिकेतील सर्वात मोठ्या इंधनवाहिनीवर सायबरहल्ला

वॉशिंग्टन – अमेरिकेतील सर्वात मोठी इंधनवाहिनी व पुरवठा करणारी यंत्रणा म्हणून ओळखण्यात येणार्‍या ‘कोलोनिअल पाईपलाईन’वर मोठा सायबरहल्ला चढविण्यात आला आहे. या सायबरहल्ल्यानंतर कंपनीने आपली पाईपलाईन व इंधनपुरवठा पूर्णपणे बंद केला आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना या घटनेची माहिती देण्यात आली असून ऊर्जा विभाग व केंद्रीय तपासयंत्रणांनी चौकशी सुरू केल्याचे व्हाईट हाऊसकडून सांगण्यात आले. अमेरिकेच्या पूर्व भागातील जवळपास नऊ हजार किलोमीटर लांबीच्या या इंधनवाहिनीतून दररोज सुमारे २३ लाख बॅरल इंधनाचा पुरवठा करण्यात येतो.

पूर्व अमेरिकेत न्यूजर्सीपासून ते टेक्सासपर्यंत पसरलेल्या ‘कोलोनिअल पाईपलाईन’वर शुक्रवारी सायबरहल्ला झाल्याचे समोर आले. हल्ल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून कंपनीने आपले पाईपलाईन नेटवर्क पूर्णपणे बंद केले. सायबरहल्ल्याचा तपास करण्यासाठी कंपनीने ‘फायर आय’ या सायबरसुरक्षा कंपनीचे सहाय्य घेतले असून सदर हल्ला ‘रॅन्समवेअर’ प्रकारातील असल्याचे उघड झाले आहे. या प्रकारच्या हल्ल्यांमध्ये हॅकर्स अथवा त्यांचा गट नेटवर्क व माहितीवर पूर्ण ताबा मिळवून त्याबदल्यात मोठ्या प्रमाणावर खंडणीची मागणी करतो.

Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/cyber-attack-largest-fuel-pipeline-united-states/