फिलिपाईन्सने चीनचा ‘फिशिंग बॅन’ धुडकावला

फिलिपाईन्सने चीनचा ‘फिशिंग बॅन’ धुडकावला

मनिला -‘साऊथ चायना सी’मध्ये लष्करी सामर्थ्याच्या बळावर अरेरावी करणार्‍या चीनला फिलिपाईन्सने अजून एक धक्का दिला आहे. चीनकडून दरवर्षी लादण्यात येणारी मासेमारीवरील बंदी फिलिपाईन्सने उघडपणे धुडकावली. चीनने मासेवारीवर घातलेली बंदी फिलिपाईन्सच्या मच्छिमारांना लागू होत नाही, असे फिलिपाईन्सच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी बजावले. त्याचवेळी फिलिपाईन्सच्या ‘टास्क फोर्स’नेही स्वतंत्र निवेदन जारी करून फिलिपिनी मच्छिमारांनी आपल्या सागरी क्षेत्रात खुलेआम मासेमारी करावी, असे म्हटले आहे. त्यामुळे ‘साऊथ चायना सी’च्या मुद्यावरून फिलिपाईन्स व चीनमधील तणाव चांगलाच चिघळल्याचे दिसत आहे.

अवघ्या २४ तासांपूर्वी फिलिपाईन्सने चीनच्या साऊथ चायना सीमधील नौदल सरावावर कोरडे ओढले होते. फिलिपाईन्सच्या परराष्ट्र तसेच संरक्षण मंत्रालयाने स्वतंत्र निवेदन जारी करून चीनवर आक्रमक टीका केली होती. फिलिपाईन्सच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त करताना ‘चालते व्हा’ अशी प्रतिक्रिया नोंदविली होती. यावर चीनकडून जोरदार प्रत्युत्तरही देण्यात आले होते. फिलिपिनी मंत्र्यांनी शिष्टाचाराचे भान ठेवावे, असा सल्ला चीनकडून देण्यात आला होता.

मात्र त्यानंतर दोन देशांमधील वाद अधिकच टोकाला जाण्याचे संकेत मिळाले आहेत. चीनने १ मे ते ऑगस्ट या कालावधीत ‘फिशिंग बॅन’ची घोषणा केली आहे. साऊथ चायना सीमधील या बंदीच्या निर्णयात फिलिपाईन्सच्या सागरी क्षेत्राचा भाग असणार्‍या ‘वेस्ट फिलिपाईन सी’चा देखील समावेश आहे. त्यामुळे फिलिपाईन्सने त्याला कडाडून विरोध केला आहे. यापूर्वी फक्त नाराजी व्यक्त करणार्‍या फिलिपाईन्सने अधिक आग्रही भूमिका घेऊन आपल्या मच्छिमारांनी खुशाल ‘वेस्ट फिलिपाईन सी’मध्ये जाऊन मासेमारी करावी, असे निर्देश दिले आहेत. याबाबत थेट देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी निवेदन दिल्यामुळे चीनला चांगलाच धक्का बसल्याचे दिसते.

गेल्याच आठवड्यात फिलिपाईन्सचे तटरक्षक दल तसेच टास्क फोर्सने चिनी जहाजांचे घुसखोरीचे प्रयत्नही उधळून लावले होते. त्यानंतर दिलेल्या निवेदनात फिलिपाईन्स चीनच्या ‘नेव्हल मिलिशिआ’वरील टेहळणी कायम ठेवेल, असा इशाराही देण्यात आला होता. मात्र तरीही चीन फिलिपाईन्सच्या सागरी क्षेत्रात सातत्याने घुसखोरीचे प्रयत्न करीत असल्याचे समोर आले आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info