- मानवतावादी सहाय्य करणार्यांवरही हमासचे मॉर्टर हल्ले
- हमासच्या रॉकेट हल्ल्यात दोन थाई कामगारांचा बळी
- इस्रायलकडून हमासचे १६० दहशतवादी ठार केल्याचा दावा
- वेस्ट बँकमध्ये दंगलखोरांकडून इस्रायलच्या जवानांवर हल्ले
जेरूसलेम – इस्रायलवरील हमासचे रॉकेट व क्षेपणास्त्र हल्ले सुरू असून यात थायलंडच्या दोन नागरिकांचा बळी गेला. तर इस्रायलने गाझावर चढविलेल्या हल्ल्यात आत्तापर्यंत हमासचे १६० दहशतवादी ठार झाले आहेत. गाझातील जनतेला मानवतावादी सहाय्य पुरविण्यासाठी इस्रायलने गाझाबरोबरील सीमा खुली केली होती. पण इथेही मॉर्टर्सचे हल्ले झाल्यानंतर इस्रायलने ही सीमा बंद करून टाकली. हमासला मानवी सहाय्य नको, तर संघर्षच अपेक्षित आहे, असा आरोप इस्रायलने केला आहे.
गेल्या दोन दिवसांमध्ये गाझातील हमासच्या भुयारीमार्गांच्या जाळ्यांवर तसेच माध्यमांच्या इमारतीवर केलेल्या कारवाईमुळे इस्रायली लष्करावर जोरदार टीका होत आहे. यापैकी अल-जाला इमारतीवर हल्ला चढवून इस्रायलने माध्यमांची गळचेपी केल्याचा आरोप केला जातो. पण माध्यमांची कार्यालये असलेल्या इमारतीचा वापर हमास मानवी ढाल म्हणून करीत होती व याचे पुरावे आपल्याकडे असल्याचे इस्रायलने म्हटले होते. इस्रायलचे हे पुरावे अमेरिकेच्या हवाली केले आहेत. हमासने पॅलेस्टिनींचा मानवी ढाल म्हणून वापर केल्यामुळेच पॅलेस्टिनींचा बळी गेल्याचे इस्रायलचे म्हणणे आहे.
गेल्या सात दिवसांमध्ये गाझापट्टीतील हमास आणि इस्लामिक जिहादने इस्रायलवर ३४०० हून अधिक रॉकेट व क्षेपणास्त्र हल्ले चढविले आहेत. यापैकी ९० टक्के रॉकेट व क्षेपणास्त्रे इस्रायलच्या आयर्न डोम या प्रगत हवाई सुरक्षा यंत्रणेने भेदले. तर साडेचारशे रॉकेट्स गाझाची सीमाही ओलांडू शकले नसल्याचे इस्रायली लष्कराचे म्हणणे आहे. आयर्न डोम यंत्रणेमुळे हमासच्या या हल्ल्यांची झळ फार कमी झाली आहे. अन्यथा गाझातील दहशतवादी संघटनांनी चढविलेल्या या हजारो रॉकेट्सच्या हल्ल्यांमध्ये इस्रायलचे हजारो नागरिकांचा बळी गेला असता, याकडे इस्रायली लष्कर लक्ष वेधत आहेत.
हमासकडे एका सेकंदात चार ते नऊ रॉकेट प्रक्षेपित करणारे लॉंचर्स आहेत. गेल्या तीन दिवसात यापैकी ६५ लॉंचर्स तसेच रणगाडाभेदी लॉंचर्स उद्ध्वस्त केल्याचे इस्रायली लष्कराने जाहीर केले. मंगळवारी इस्रायलने गाझातील हमासचे भुयारी मार्गांचे आणखी एक जाळे उद्ध्वस्त केले. यानंतर हमासने इस्रायलच्या बीरशेबा, दिमोना, ओफाकीम, अश्दोद, ऍश्खेलॉन आणि तेल अविव शहरावर जोरदार रॉकेट हल्ले चढविले. इस्लामिक जिहादच्या कमांडरचा सूड घेण्यासाठी तेल अविववर भीषण हल्ल्यांची धमकी हमासने दिली.
या धमकीनंतर गाझापट्टीतून इस्रायलच्या सीमेजवळील एका प्रकल्पावर रॉकेट हल्ला झाला. यामध्ये सदर प्रकल्पात काम करणार्या थायलंडच्या कामगारांचा बळी गेला.
गाझातील जनतेला मानवतावादी सहाय्य पुरविण्यासाठी इस्रायलने एरेझ क्रॉसिंग खुली केली होती. हे सहाय्य सुरू असतानाच गाझातून मॉर्टर हल्ले झाले. यामध्ये आपला जवान जखमी झाल्याची माहिती इस्रायली लष्कराने दिली. ‘इस्रायलवर हल्ले चढविणे हेच हमासचे ध्येय आहे. पॅलेस्टिनी जनतेला मानवतावादी सहाय्य मिळाले नाही तरी त्यांना त्याची पर्वा नाही’, अशी जळजळीत टीका इस्रायली लष्कराने केली. गाझाबरोबरच आता लेबेनॉन आणि सिरियाच्या सीमाभागातूनही इस्रायलवर रॉकेट्स आणि स्फोटकांनी भरलेल्या ड्रोनचे हल्ले सुरू झाले आहेत. मंगळवारी सकाळी लेबेनॉनच्या सीमेतून सहा रॉकेट प्रक्षेपित करण्यात आले. यातील एकही रॉकेट इस्रायलच्या सीमेत प्रवेश करू शकला नाही. पण इस्रायलने त्वरीत कारवाई करून या रॉकेट हल्ल्यांना उत्तर दिले. लेबेनॉनमधील पॅलेस्टिनी गटांनी हे हल्ले चढविल्याची शक्यता इस्रायली लष्कराने वर्तविली. तर सिरियातूनही इस्रायलच्या उत्तरेकडील भागात ड्रोन सोडण्यात आले होते. पण आयर्न डोमने सदर ड्रोन भेदले.
दरम्यान, गाझा, लेबेनॉन व सिरियातून होणार्या या हल्ल्यांना उत्तर देणार्या इस्रायलला अंतर्गत दंगलींनाही सामोरे जावे लागत आहे. मंगळवारी जेरूसलेम तसेच वेस्ट बँकच्या वेगवेगळ्या भागांमध्ये दंगली उसळल्या. यापैकी हेब्रॉनमध्ये दंगलखोराने आयईडी स्फोटके, सबमशिन गन आणि सूरा हातात घेऊन इस्रायली जवानांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी वेळीच कारवाई करून त्याला अटक केली. तर रामल्लाच्या बैत अल या भागात दंगलखोरांनी इस्रायली जवानांवर गोळीबार केला असून यात दोन जवान जखमी झाले आहेत. जेरूसलेमच्या शेख जराह भागात शेकडो पॅलेस्टिनींनी ज्यूंच्या विरोधात दंगली सुरू केल्याच्या बातम्या येत आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |