सरकारविरोधात निदर्शने करणार्‍या पत्रकाराला पकडण्यासाठी बेलारुसकडून लिथुआनियाला जाणारे विमान हायजॅक – अमेरिका-युरोपचे टीकास्त्र, रशियाकडून जोरदार समर्थन

सरकारविरोधात निदर्शने करणार्‍या पत्रकाराला पकडण्यासाठी बेलारुसकडून लिथुआनियाला जाणारे विमान हायजॅक – अमेरिका-युरोपचे टीकास्त्र, रशियाकडून जोरदार समर्थन

मिन्स्क – बेलारुसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्याविरोधात निदर्शने करणार्‍या नेत्याला पकडण्यासाठी प्रवासी विमान ‘हायजॅक’ करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. रविवारी ग्रीसची राजधानी अथेन्सवरून लिथुआनियाला जाणारे विमान जबरदस्तीने बेलारुसची राजधानी मिन्स्कमध्ये उतरविण्यात आले. त्यानंतर त्यातून प्रवास करणार्‍या रोमन प्रोटासेविक या पत्रकाराला तसेच त्यांच्या सहकार्‍याला अटक करण्यात आली. या घटनेवर अमेरिका व युरोपिय महासंघाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली असून बेलारुसविरोधात आक्रमक कारवाईचे संकेत दिले जात आहेत. रशियाने मात्र याचे समर्थन केले.

हायजॅक

रविवारी सकाळी आयर्लंडच्या ‘रायनएअर’ या कंपनीचे विमान ग्रीसमधून लिथुआनियासाठी निघाले होते. विमान बेलारुसच्या हद्दीतून लिथुआनियाच्या हवाईहद्दीत शिरण्यापूर्वी काही मिनिटे आधी बेलारुसच्या यंत्रणांनी विमानाला धोका असल्याचा अ‍ॅलर्ट दिला. अ‍ॅलर्ट देतानाच विमान जवळच्या अर्थात मिन्स्क शहराच्या विमानतळावर उतरविण्याचे आदेशही दिले. विमान मिन्स्क विमानतळावर न उतरविल्यास लढाऊ विमानाच्या सहाय्याने विमान उडवून देण्यात येईल, अशी धमकी देण्यात आल्याचा दावा विमानातील प्रवासी तसेच माध्यमांकडून करण्यात आला आहे.

हायजॅक

विमान बेलारुसच्या राजधानीत वळविण्याचे तसेच त्यासाठी ‘मिग-29’ लढाऊ विमान पाठविण्याचे आदेश बेलारुसचे राष्ट्राध्यक्ष लुकाशेन्को यांनी दिल्याचे उघड झाले आहे. बेलारुसमध्ये गेल्या ऑगस्ट महिन्यापासून राष्ट्राध्यक्ष लुकाशेन्को यांच्याविरोधात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या पत्रकार रोमन प्रोटासेविकला ताब्यात घेण्यासाठी विमान अपहरण करण्याची योजना आखण्यात आल्याचे समोर येत आहे. प्रोटासेविक यांच्याबरोबरच त्यांची सहकारी सोफिआ सॅपेगालाही बेलारुसच्या यंत्रणांनी ताब्यात घेतले. मिन्स्क विमानतळावरून रविवारी संध्याकाळी विमान लिथुआनियासाठी रवाना करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हायजॅक

 रायनएअर या कंपनीने तसेच ब्रिटनने सदर घटना एका देशाच्या राजवटीकडून घडविण्यात आलेले उघड अपहरण असल्याची टीका केली. अमेरिकेने सदर घटना अत्यंत धक्कादायक असल्याचे सांगून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. युरोपिय महासंघानेही बेलारुसचे कृत्य अपहरणाची घटना असल्याचे सांगून त्याविरोधात आक्रमक कारवाईचा इशारा दिला. नाटोनेही बेलारुसविरोधात पावले उचलण्याचे संकेत दिले. बेलारुसचा शेजारी देश असणार्‍या लिथुआनियाने बेलारुसमधील आपल्या नागरिकांना हा देश सोडण्याचे निर्देश दिले आहेत.

अमेरिका व युरोपमधून तीव्र टीका होत असतानाच रशियाने मात्र बेलारुसचे जोरदार समर्थन केले. ‘बेलारुसच्या परराष्ट्र विभागाने देशातील सर्व यंत्रणा सदर घटनेबाबत पारदर्शकता बाळगून सहकार्य करतील, असे स्पष्ट केले आहे. ही योग्य भूमिका ठरते. आंतरराष्ट्रीय समुदायाने शांतपणाने परिस्थितीची माहिती घ्यावी, असे मला वाटते’, अशी प्रतिक्रिया रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी दिली आहे. विमानात चार रशियन प्रवासी असल्याचे व ते मिन्स्क विमानतळावर उतरल्यानंतर बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे. हे प्रवासी रशियन गुप्तचर यंत्रणेचे एजंट असावेत व बेलारुसने सदर योजना रशियाच्या सहाय्यानेच पार पाडली असावी, असा दावा विश्‍लेषकांकडून करण्यात येत आहे. अन्यथा आपल्या बळावर बेलारूससारख्या देशाचे सरकार इतका मोठा निर्णय घेणे शक्यच नाही, अशी चर्चा माध्यमांमध्ये सुरू झालेली आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info