रशियाविरोधी युद्धात युक्रेन जिंकू शकत नाही

- अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्याचा दावा

मॉस्को/किव्ह – रशियाविरोधात सुरू असलेल्या युद्धात युक्रेन जिंकू शकणार नाही आणि अमेरिकेने युक्रेनवर रशियाबरोबरील वाटाघाटींसाठी दडपण आणावे, असा दावा अमेरिकेचे माजी अधिकारी ह्युज डे सँटिस यांनी केला. अमेरिकी अधिकाऱ्याचा हा दावा समोर येत असतानाच युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनीही, युक्रेनवर रशियाबरोबरील शांतीकरारासाठी दबाव आणण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे वक्तव्य केले आहे. पाश्चिमात्य नेते तसेच प्रसारमाध्यमांकडून यासंदर्भात सल्ले देण्यात येत असल्याचे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. दरम्यान, रशियाचे संरक्षणमंत्री सर्जेई शोईगु यांनी लुहान्स्क प्रांतातील बहुतांश भागावर रशियन फौजांनी नियंत्रण मिळविल्याचे जाहीर केले.

रशिया व युक्रेनच्या फौजांमध्ये गेल्या काही दिवसांपासून डोन्बास क्षेत्रासाठी निर्णायक संघर्ष सुरू आहे. डोन्बासमधील सेव्हेरोडोनेत्स्क, लिशिचान्स्क, स्लोव्हिआन्स्क व बाखमत या शहरांवर ताबा मिळविण्यासाठी रशियाने जबर हल्ले चढविले आहेत. रशियाकडून सातत्याने सुरू असणारा तोफा, रणगाडे, रॉकेट्स व क्षेपणास्त्रांचा मारा यामुळे युक्रेनी फौजांची पिछेहाट झाल्याची कबुली स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनीही युक्रेनी लष्करासह सेव्हेरोडोनेत्स्क व लिशिचान्स्क या दोन शहरांना मोठी हानी सोसावी लागल्याचे सांगितले. झेलेन्स्की यांनी या दोन शहरांचा उल्लेख ‘डेड सिटीज्‌‍’ अर्थात मृतप्राय बनलेली शहरे असा केला.

रशियाचे संरक्षणमंत्री शोईगु यांनी डोन्बासचा भाग असलेल्या लुहान्स्क प्रांताच्या 97 टक्के क्षेत्रावर रशियाने नियंत्रण मिळविल्याचे जाहीर केले आहे. लुहान्स्कमधील ज्या भागात संघर्ष सुरू आहे त्यातही रशियाची सरशी होत असल्याचे शोईगु यांनी स्पष्ट केले. लुहान्स्क क्षेत्रातील रशियन अधिकाऱ्यांनीही सेव्हेरोडोनेत्स्कचा बहुतांश भाग रशियाच्या ताब्यात असल्याचा दावा केला. पुढील संघर्ष लिशिचान्स्कसाठी सुरू असून रशियन फौजांनी हल्ल्यांची तीव्रता वाढविल्याची माहिती दिली. गेल्या 24 तासांमध्ये रशियाने परदेशी तोफा व शस्त्रसाठा मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त केला असून युक्रेनच्या 400 जवानांचा बळी गेल्याचे रशियाच्या संरक्षण विभागाने सांगितले.

दरम्यान, रशिया-युक्रेनदरम्यान वाटाघाटी सुरू होण्याचे वाढते संकेत मिळू लागले आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी यासंदर्भात वक्तव्य केले असून पाश्चिमात्य देश व माध्यमे युद्धाला कंटाळल्याचा दावा केला आहे. परदेशी नेते तसेच माध्यमांमधून आपल्याला रशियाशी वाटाघाटी करण्याबाबत दडपण आणले जात आहे, असेही झेलेन्स्की म्हणाले. झेलेन्स्की यांच्या या वक्तव्यापूर्वी अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनीही रशिया-युक्रेन वाटाघाटींबाबत वक्तव्य केल्याचे समोर आले.

अमेरिकेचे माजी परराष्ट्र अधिकारी ह्युज डे सँटिस यांनी एका लेखात, रशियाविरोधात युक्रेनच्या विजयाची शक्यता फेटाळून लावली आहे. लष्करीदृष्ट्या युक्रेनला विजय मिळणे शक्यच नसून वाटाघाटींच्या माध्यमातून निघणारा निष्कर्ष हाच एकमेव उपाय आहे, असे सँटिस यांनी बजावले. अमेरिका व मित्रदेशांनी वाटाघाटींसाठी युक्रेनवर दडपण आणणे गरजेचे आहे, असेही सँटिस यांनी सांगितले.

English       हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info