चीनकडून पाकिस्तानसह १२ देशांमध्ये संरक्षणतळ उभारण्याच्या हालचाली – अमेरिकेच्या संरक्षण विभागाचा अहवाल

चीनकडून पाकिस्तानसह १२ देशांमध्ये संरक्षणतळ उभारण्याच्या हालचाली – अमेरिकेच्या संरक्षण विभागाचा अहवाल

वॉशिंग्टन/बीजिंग – चीनची कम्युनिस्ट राजवट आपल्या विस्तारवादी महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी जगाच्या विविध भागात पाय रोवण्याचे प्रयत्न करीत असल्याची माहिती अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या अहवालातून समोर आली आहे. ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’कडून पाकिस्तानच्या ग्वादरसह श्रीलंका, म्यानमार अंगोला, ताजिकिस्तानसारख्या १२ देशांमध्ये संरक्षणतळ उभारण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा इशारा पेंटॅगॉनच्या अहवालात देण्यात आला आहे. हे तळ उभारण्यासाठी ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’सारख्या योजनांचा छुप्या रीतीने वापर करण्यात येत असल्याचेही अमेरिकेने बजावले. काही महिन्यांपूर्वीच चीन पाकिस्तानच्या ग्वादर बंदरात सर्वात मोठा नौदल तळ उभारत असल्याचा दावा अमेरिकेचे लष्करी अभ्यासक ‘एच. आय. सटन’ यांनी केला होता.

अमेरिकेच्या संरक्षण विभागाने नुकताच ‘मिलिटरी अँड सिक्युरिटी डेव्हलपमेंट इन्व्हॉल्व्हिंग द पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना २०२०’ नावाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. संसदेला सादर केलेल्या या अहवालात, गेल्या २० वर्षात चीनने संरक्षणक्षेत्रात केलेली प्रगती, योजना व महत्त्वाकांक्षा यांचा उल्लेख करण्यात आला आहे. चीनच्या लष्कराने २०१७ साली आफ्रिकेतील जिबौतीमध्ये आपला परदेशातील पहिला संरक्षणतळ सक्रिय केला होता. त्यानंतर चीनकडून आशियासह आफ्रिका व लॅटिन अमेरिकेतील देशांमध्ये संरक्षणतळ उभारण्याच्या हालचालींना वेग देण्यात आला. गेल्या तीन वर्षात चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने पाकिस्तानच्या ‘ग्वादर’सह आफ्रिका खंडातील नामिबिया व लॅटिन अमेरिकेतील अर्जेंटिनामध्ये संरक्षणतळाची उभारणी जवळपास पूर्ण केली आहे. ‘ट्रॅकिंग, टेलिमेट्री अँड कमांड स्टेशन्स’च्या रूपात हे तळ सक्रिय असल्याचे पेंटॅगॉनने आपल्या अहवालात नमूद केले आहे.

याव्यतिरिक्त म्यानमार, श्रीलंका, थायलंड, सिंगापूर, इंडोनेशिया, युएई, केनिया, सेशल्स, टांझानिया, अंगोला व ताजिकिस्तान या देशांमध्येही तळ उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ‘मिलिटरी लॉजिस्टिक्स फॅसिलिटीज’च्या नावाखाली या हालचाली चालू असल्याचे अमेरिकेच्या संरक्षण विभागाने बजावले. हे तळ उभारण्यासाठी व्यापार व गुंतवणुकीच्या नावाखाली सुरू केलेल्या ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’चा वापर सुरू असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. पाकिस्तानमध्ये या ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’ योजनेखाली सुरू केलेल्या ‘चायना पाकिस्तान इकॉनोमिक कॉरिडॉर’ अंतर्गत चालू असणाऱ्या हालचाली याचे ठळक उदाहरण आहे, याकडे अमेरिकी अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षांपासून भारतीय विश्लेषक ग्वादरमध्ये चीनच्या लष्करी हालचाली वाढल्याचे इशारे देत होते. पाकिस्तान बरोबरच म्यानमार, बांगलादेश, श्रीलंका या देशांमध्येही चीन आपले तळ विकसित करण्यासाठी हालचाली करीत असल्याचेही बजावण्यात आले होते. मात्र बांगलादेशसह म्यानमार व श्रीलंकेतील चीनच्या इराद्यांना सुरुंग लागला असून, त्यामुळेच चीनने पाकिस्तानकडे लक्ष अधिक केंद्रित केल्याचे दिसत आहे. जून महिन्यात अमेरिकेतील अभ्यासक ‘एच. आय. सटन’ यांनी ग्वादर मधील चिनी तळाची माहिती देताना सॅटेलाईट फोटोग्राफ्सही प्रसिद्ध केले होते. त्यात जवानांसाठी उभारण्यात आलेल्या वसाहती, मोठ्या भिंती, सुरक्षा चौक्या, लष्करी मनोरे व काटेरी कुंपणे दाखविण्यात आले होते.

जिबौती व पाकिस्तानपाठोपाठ पॅसिफिक महासागरातील ‘वनाटु’ बेटावर तसेच आग्नेय आशियातील कंबोडियामध्ये गुप्तपणे लष्करी तळ उभारण्याचे चीनचे प्रयत्नही उघड झाले आहेत. चीनच्या या कारवायांना शह देण्यासाठी अमेरिकेने पुढाकार घेतला असून भारत, ऑस्ट्रेलिया व जपानसह युरोपीय देशांची मजबूत आघाडी उभारण्यासाठी हालचाली सुरू आहेत.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info