ओआगाडौगौ – आफ्रिकेच्या बुर्किना फासो या देशात झालेल्या भीषण नरसंहारात 132 जणांचा बळी गेला. हल्लेखोरांनी स्थानिकांची घरे, बाजारभाग आगीत बेचिराख केली. या हल्ल्याची जबाबदारी कुठल्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. पण आफ्रिका खंडाच्या साहेल भागात सक्रीय असणार्या अल कायदा आणि आयएससंलग्न दहशतवादी संघटना यामागे असल्याचा आरोप होत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये या दहशतवादी संघटनांचे बुर्किना फासो तसेच नायजर, नायजेरिया, माली या देशांमधील हल्ले वाढले आहेत. बुर्किना फासोच्या पूर्वेकडील याघा प्रांतातील सोल्हान गावात शुक्रवारी रात्री दहशतवाद्यांनी हल्ला चढविला. यावेळी दहशतवाद्यांनी स्थानिकांना घराबाहेर खेचून काढले आणि बेछूट गोळीबार केला. यातील बळींमध्ये मुलांचाही समावेश आहे. या हल्ल्यात 40 स्थानिक गंभीर जखमी झाले असून दहशतवाद्यांनी गावाची प्रचंड जाळपोळ केली. हे एक घृणास्पद हत्याकांड असून बुर्किनाच्या जनतेने दहशतवाद्यांविरोधात एकसंघ व्हावे, असे आवाहन राष्ट्राध्यक्ष रोश मार्क कोब्रे यांनी केले.
याशिवाय सोल्हान गावापासून दीडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या ताडारियात गावातही दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 14 जणांचा बळी गेल्याच्या बातम्या आहेत. गेल्या महिन्यात बुर्किना फासोच्या पूर्वेकडील भागातच दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 30 जणांचा बळी गेला होता. तर त्याआधीही बुर्किना फासोच्या उत्तरेकडील भागात दहशतवाद्यांनी हल्ले चढविले होते. पण शुक्रवारचा हल्ला गेल्या काही वर्षांमधील सर्वात भीषण हल्ला असल्याचा दावा केला जातो.
बुर्किना फासोतील या हल्ल्यावर संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनियो गुतेरस यांनी चिंता व्यक्त केली. 2015 सालापासून बुर्किना फासोमधील अल कायदा आणि आयएस संलग्न दहशतवादी संघटनांचे हल्ले वाढले आहेत. सुरुवातीला शेजारच्या मालीपर्यंत मर्यादित असलेल्या दहशतवादी हल्ल्यांची धग बुर्किना फासोलाही बसू लागली. या हल्ल्यांमुळे गेल्या दोन वर्षात बुर्किना फासोतील सुमारे 12 लाख नागरिक विस्थापित झाले.
सुमारे दोन कोटी इतकी लोकसंख्या आणि सकल राष्ट्रीय उत्पादकता 19 अब्ज डॉलर्सवर असलेल्या बुर्किना फासोचे लष्कर अतिशय सुमार दर्जाचे मानले जाते. दहशतवाद्यांवरील कारवाईसाठी बुर्किना फासोचे सरकार नागरी संरक्षणदलांचा देखील वापर करतात. पण दहशतवादी संघटना आता या नागरी संरक्षणदलाच्या स्वयंसेवकांनाही लक्ष्य करू लागले आहेत.
साहेल प्रांतातील दहशतवादविरोधी कारवाईसाठी फ्रान्सने आपले लष्करी पथक इथे तैनात केले आहे. जानेवारी महिन्यात फ्रेंच लष्कराने बुर्किना फासोत केलेल्या कारवाईत 20 दहशतवाद्यांना ठार केले होते. पण गेल्या काही महिन्यांपासून साहेल भागातील दहशतवादी हल्ल्यांची तीव्रता वाढली असून नायजर, माली आणि नायजेरिया या देशांच्या सीमेवरील गावांना दहशतवादी सातत्याने लक्ष्य करीत आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |