चीनच्या राजवटीकडून अमेरिकी शेअरबाजारांमधील चिनी कंपन्यांची नोंदणी रोखण्याच्या हालचाली – अमेरिकेतील गुंतवणूक क्षेत्राला धक्का देण्याचा प्रयत्न

शेअरबाजार

बीजिंग/वॉशिंग्टन – चीनच्या आघाडीच्या कंपन्यांकडून भांडवलासाठी अमेरिकी शेअरबाजारांमध्ये होणारी नोंदणी रोखण्यासाठी चीनच्या सत्ताधारी राजवटीने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच चीनच्या ‘दिदी इन्क.’ या कंपनीने अमेरिकेच्या न्यूयॉर्क स्टॉक एक्सेंजमध्ये नोंदणी करून ‘आयपीओ’ सादर केला होता. या ‘आयपीओ’नंतर काही दिवसातच चिनी यंत्रणांनी ‘दिदी इन्क.’च्या अ‍ॅपविरोधात कारवाई केल्याचे समोर आले आहे. चीनच्या राजवटीने आपल्याच कंपन्यांविरोधात कारवाई करण्याची ही तिसरी वेळ ठरली आहे. ‘दिदी इन्क.’ पूर्वी ‘अलिबाबा’ व ‘टेन्सेंट’ या कंपन्यांविरोधातही चिनी यंत्रणांनी कारवाई केली होती.

चीनच्या आठ सरकारी कंपन्यांसह सुमारे 250 कंपन्यांनी आतापर्यंत अमेरिकेच्या शेअरबाजारात नोंदणी केली आहे. या नोंदणीमागचा उद्देश अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय स्तरावरून मोठ्या प्रमाणात निधी उभा करण्याचा असल्याचे मानले जाते. चिनी कंपन्यांनी आतापर्यंत अशा नोंदणीतून जवळपास दोन ट्रिलियन डॉलर्सचा निधी उभारण्यात यश मिळविल्याचे सांगण्यात येते. यावर्षीही पहिल्या सहा महिन्यात 34 चिनी कंपन्यांनी अमेरिकी शेअरबाजारांमधून सुमारे 12.5 अब्ज डॉलर्सचा निधी उभा केला आहे.

Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/movements-by-the-chinese-regime-to-prevent-the-registration-of-chinese-companies-in-the-us-stock-market/