विस्तारवादी नाटोमुळे युरोपचे पुन्हा तुकडे होण्याची भीती – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा इशारा

विस्तारवादी

मॉस्को – शीतयुद्धाच्या काळातील संघर्षाचे अवशेष असणार्‍या नाटोच्या विस्तारवादी धोरणांमुळे युरोपात अविश्‍वास व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे युरोपचे पुन्हा तुकडे होण्याची भीती आहे, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिला. रशिया हा युरोप खंडाचाच भाग आहे, यावर भर देऊन रशिया व युरोपिय महासंघाने परस्परांमधील संबंध दृढ करण्यासाठी अनेक पावले उचलल्याचा दावाही पुतिन यांनी केला. मात्र युक्रेनमध्ये २०१४ साली घडविण्यात आलेल्या सशस्त्र बंडानंतर परिस्थिती वेगाने बदलण्यास सुरुवात झाली असून युरोपच्या सुरक्षेला नव्या शस्त्रस्पर्धेचा धोका निर्माण झाल्याचे रशियन राष्ट्राध्यक्षांनी बजावले.

२२ जून, १९४१ या दिवशी तत्कालिन जर्मनीतील नाझी हुकुमशहा ऍडॉल्फ हिटलरने रशियन संघराज्यावर (सोव्हिएत रशिया) हल्ला चढविला होता. या घटनेला ८० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी एका जर्मन साप्ताहिकात आपली भूमिका मांडणारा लेख लिहिला. या लेखात त्यांनी, दुसर्‍या महायुद्धात सोव्हिएत रशियाने जर्मनीच्या नाझी राजवटीचा पराभव केला होता व युरोपला गुलामगिरीतून वाचविले होते, याची आठवण करून दिली.

Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/nato-expansion-fears-europe-being-piece-apart-warns-vladimir-putin/