टोकिओ/बीजिंग – तैवानच्या मुद्यावरुन जपान अधिकाधिक व्यापक भूमिका स्वीकारू लागला आहे. गेल्या आठवड्यात जपानच्या संरक्षणमंत्र्यांनी तैवानची सुरक्षा आपल्या देशाच्या सुरक्षेशी जोडलेली असल्याचे म्हटले होते. तर आत्ता जपानच्या उपसंरक्षणमंत्र्यांनी तैवान हा लोकशाही असलेला ‘देश’ असल्याचे सांगून इतर लोकशाहीवादी देशांनी तैवानच्या सुरक्षेसाठी जागे होण्याची आवश्यकता असल्याचे आवाहन केले. तैवानचा लोकशाही देश म्हणून जपानने केलेला उल्लेख चीनला चांगलाच झोंबला आहे. तसे करून जपानने गंभीर चूक केली, असा इशारा चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिला.
दोन दिवसांपूर्वी चीन आणि रशियाकडून फ्रेंडशिप ट्रिटीच्या विस्ताराची घोषणा झाली. पाश्चात्य देशांच्या वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर, सदर सहकार्याच्या विस्ताराची आवश्यकता असल्याचे उभय देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी म्हटले होते. जपानचे उपसंरक्षणमंत्री योशिहिदे नाकायामा यांनी हडसन इन्स्टिट्युट या अमेरिकन अभ्यासगटाच्या व्हर्च्युअल बैठकीत बोलताना, चीन आणि रशियातील या सहकार्यावर टीका केली. विशेषत: 1970च्या दशकापासून तैवानच्या लोकशाहीला समर्थन देण्यापेक्षा, चीनच्या ‘वन चायना’ धोरणाला पाठिंबा देणार्या अमेरिका तसेच जपानच्या निर्णयावर नाकायामा यांनी प्रश्न उपस्थित केले.
Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/china-warns-japan-over-declaring-taiwan-a-democratic-country/