चर्चेत ताठर भूमिका स्वीकारणार्‍या युक्रेनसाठी ‘न्यूक्लिअर ट्रायड’ सज्ज ठेवल्याचा रशियाचा इशारा

किव्ह – अखेरीस युक्रेनने रशियाबरोबर चर्चा करण्याची तयारी दाखविली. यानुसार बेलारूसमध्ये युक्रेन व रशियामध्ये चर्चा देखील सुरू झाली. मात्र यात युक्रेनने रशियासमोर ठेवलेल्या मागण्या या चर्चेच्या भवितव्यावर शंका उपस्थित करणार्‍या ठरत आहेत. रशियाने युक्रेनमधून संपूर्ण माघार घ्यावी, अशी मागणी व तत्काळ संघर्ष थांबावावा, असे युक्रेनचे म्हणणे आहे. २०१४ साली रशियाने ताब्यात घेतलेल्या क्रिमिआचाही ताबा रशियाने सोडून द्यावा, असे युक्रेनचे शिष्टमंडळ सांगत आहे. रशियाकडून युक्रेनच्या या मागण्या मान्य होण्याची शक्यता नाही.

‘न्यूक्लिअर ट्रायड’

ही चर्चा सुरू होण्यापूर्वीच, आपल्याला यातून फारसे काही निष्पन्न होईल असे वाटत नसल्याचे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की म्हणाले होते. युक्रेनची राजधानी किव्हला रशियन सैन्याने घेरले असून लवकरच किव्हचा ताबा रशियाकडे येईल, अशी चिन्हे दिसत आहेत. पण पाश्‍चिमात्य माध्यमांमध्ये मात्र युक्रेनचे लष्कर व जनता रशियन सैन्याचा प्रतिकार करीत असल्याच्या बातम्या येत आहेत. त्याचवेळी नाटोचे सदस्य असलेल्या युरोपिय देशांनी युक्रेनच्या लष्कराला सहाय्य पुरविण्याची तयारी केली आहे. यामुळे युक्रेनचे युद्ध अधिकच लांबू शकते. यामागे अमेरिकेे डावपेच असल्याचे संकेत मिळत आहे.

रशियासाठी युक्रेन अफगाणिस्तानसारखी रणभूमी बनेल असा इशारा अमेरिकेचे रशियातील माजी राजदूत मायकल मॅक्फॉल यांनी दिला आहे. मात्र रशिया हे युद्ध अधिक लांबवणार नसल्याचे स्पष्ट संकेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी दिले. या युद्धाचे अणुयुद्धात रुपांतर होऊ शकते, असा संदेश राष्ट्राध्यक्ष पुतिन देत आहेत. त्यासाठी त्यांनी आपल्या ‘न्यूक्लिअर फोर्सेस’ना सज्ज राहण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार रशियाचे ‘न्यूक्लिअर ट्रायड’ अर्थात लष्कर, नौदल व हवाई दलातील अण्वस्त्रे सज्ज ठेवण्यात आलेली आहेत, अशी थरकाप उडविणारी माहिती रशियन संरक्षणमंत्री सर्जेइ शोईगू यांनी दिली.

दरम्यान, युक्रेनच्या भवितव्यासाठी पुढेच २४ तास सर्वाधिक महत्त्वाचे ठरतील, असा दावा युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी केला. राजधानी किव्हला वेढा देऊन रशियन सैन्याने युक्रेनच्या खारकिव्हवर जबरदस्त रॉकेटहल्ले चढविले आहेत. तर आग्नेय युक्रेनमधील दोन शहरे रशियन सैन्याच्या ताब्यात आल्याचा दावा रशियन वृत्तसंस्थेने केला आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info