अफगाणी जनता व लष्करामध्येही तालिबानची दहशत वाढली

  • 24 तासात 13 जिल्ह्यांवर तालिबानचा ताबा
  • कंदहारमध्ये सुरक्षेसाठी शेकडो जणांचे स्थलांतर
  • अफगाणी जवानांनी ताजिकिस्तानात आश्रय घेतला

तालिबानची दहशत

काबुल – गेल्या चोवीस तासात तालिबानच्या 143 दहशतवाद्यांना ठार केल्याचे अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले. मात्र अफगाणी जनता आणि लष्करात तालिबानची दहशत वाढल्याचे समोर येत आहे. गेल्या चोवीस तासात तालिबानने अफगाणिस्तानमधील 13 जिल्ह्यांचा ताबा घेतला. या हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली नसली तरी तालिबानच्या दहशतीमुळे कंदहार, कुंदूझ, जोवझान प्रांतात शेकडो नागरीकांनी स्थलांतर केल्याच्या बातम्या येत आहेत. तर तालिबानच्या हल्ल्यांमुळे घाबरलेल्या 300 हून अधिक अफगाणी जवानांनी ताजिकिस्तानमध्ये पलायन केले.

आंतरराष्ट्रीय तसेच अफगाणी संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या अफगाणिस्तानातील सुमारे 15 प्रांतांमध्ये लष्कर आणि तालिबान यांच्यात जोरदार संघर्ष सुरू आहे. अफगाणिस्तानच्या दक्षिण, पूर्व तसेच ईशान्येकडील भागात तालिबानला जबरदस्त यश मिळत असल्याचे स्थानिक माध्यमांचे म्हणणे आहे. अमेरिका व नाटो लष्कराच्या माघारीच्या वेगाबरोबर तालिबानच्या हल्ल्यांची तीव्रता वाढल्याचा दावा केला जातो. अफगाणिस्तानच्या ईशान्येकडे तालिबानच्या दहशतवाद्यांनी मुसंडी मारली आहे.

Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/taliban-seize-13-district-terror-spread-among-afghan-people-and-army/