शत्रूचा वेध घेऊन दणका देण्याची क्षमता रशियन नौदलाकडे आहे – राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा इशारा

रशियन नौदल

मॉस्को – ‘रशिया व रशियन हितसंबंधांचे रक्षण करण्यास रशियन नौदल पूर्णपणे सज्ज आहे. शत्रू पाण्याखाली, जमिनीवर अथवा हवेत कुठेही असला तरी नौदल त्याचा माग काढू शकते. आवश्यकता पडल्यास शत्रूला टाळता येणार नाही असा जबरदस्त दणका देण्यासही रशियन नौदल सक्षम आहे’, असा खरमरीत इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिला. गेल्या महिन्यात ब्र्रिटनची युद्धनौका ‘एचएमएस डिफेन्डर’ने क्रिमिआनजिकच्या सागरी हद्दीतून प्रवास केला होता. या मुद्यावरून रशिया व ब्रिटनमधील तणाव चांगलाच चिघळला होता. या पार्श्‍वभूमीवर पुतिन यांचा इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

रविवारी रशियन नौदलाच्या स्थापनेला 325 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सेंट पिट्सबर्गसह अनेक भागांमध्ये संचलनाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्राध्यक्ष पुतिन यावेळी पार पडलेल्या नौदल संचलनाला उपस्थित होते. यावेळी त्यांनी रशियन नौदलाच्या क्षमतेची व सज्जतेची प्रशंसा करून शत्रूदेशांना इशारा दिला. जगाच्या सागरी क्षेत्रातील बहुतांश प्रमुख भागांमध्ये रशियन नौदलाने आपले अस्तित्त्व दाखवून दिल्याचा दावा रशियन राष्ट्राध्यक्षांनी यावेळी केला. हायपरसोनिक क्षेपणास्त्रे, आण्विक पाणबुड्या, ‘कोस्टल डिफेन्स सिस्टिम्स’ यांच्या जोरावर रशियाने जगातील आघाडीच्या आरमारांमध्ये जागा मिळविल्याची ग्वाही पुतिन यांनी दिली.

Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/russian-navy-has-the-capability-to-strike-at-enemy-targets/