लेबेनॉन सामाजिक विस्फोटापासून काही दिवस दूर – लेबेनॉनच्या काळजीवाहू पंतप्रधानांचा इशारा

सामाजिक विस्फोट

बैरूत – ‘लेबेनॉन सामाजिक विस्फोटापासून अवघे काही दिवस दूर आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने लेबेनॉनला या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावे. कारण या संकटाच्या उंबरठ्यावर उभा असलेला लेबेनॉनमधील सामाजिक विस्फोटाचे परिणाम जगभरात उमटतील’, असा इशारा लेबेनॉनचे काळजीवाहू पंतप्रधान हसन दियाब यांनी दिला. लेबेनीज पंतप्रधानांच्या या इशार्‍यावर वर्ल्ड बँकने चिंता व्यक्त केली. तर, इस्रायल व इस्रायलची जनता लेबेनॉनला या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी तयार असल्याचा प्रस्ताव इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी दिला. कतारने लेबेनीज जवानांना महिन्याभराचे राशन पुरविण्याची तयारी व्यक्त केली आहे.

लेबेनॉन भीषण अराजकतेच्या दिशेने पावले टाकत आहे. लेबेनॉनमधील 60 टक्क्याहून अधिक जनता दारिद्य्ररेषेखाली गेल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. लेबेनॉच्या चलनाचे मूल्य 91 टक्क्यांहून खाली घसरले आहे. लेबेनीज जनता त्रस्त बनली असून बाजारातील वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्याचा दावा केला जातो. लेबेनॉनमध्ये इंधनाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून पेट्रोलपंपांवर हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. जागतिक बँकेने देखील, लेबेनॉन इतिहासातील सर्वात भीषण मंदीला सामोर जात असल्याचे सांगून त्यावर चिंता व्यक्त केली.

Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/lebanon-pm-warns-of-social-explosion/