इंधनसाठ्यांवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर ग्रीस व तुर्कीकडून नौदल सरावाची घोषणा

इंधनसाठ्यांवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर ग्रीस व तुर्कीकडून नौदल सरावाची घोषणा

अथेन्स/इस्तंबूल – भूमध्य सागरी क्षेत्रातील इंधनाच्या साठ्यांवरून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, ग्रीस व तुर्की या दोन्ही देशांनी स्वतंत्र नौदल सरावाची घोषणा केली आहे. सोमवारी तुर्कीने आपली सागरी संशोधन मोहीम काही दिवसांनी वाढविण्याचे जाहीर केले होते. तुर्कीच्या या निर्णयाला प्रत्युत्तर देताना ग्रीसने आपण नौदल सराव आयोजित करीत असल्याचे सांगितले होते. मात्र ग्रीसच्या प्रत्युत्तरादाखल तुर्कीने आपणही सराव घेत असल्याचा इशारा दिला. दोन्ही देशांकडून एकाच वेळी होणाऱ्या या सरावांमुळे भूमध्य सागरी क्षेत्रात संघर्षाची ठिणगी उडू शकते, असा दावा विश्लेषकांकडून करण्यात येत आहे.

नौदल सरावाची घोषणा

काही दिवसांपूर्वी तुर्कीने ‘नॅव्हटेक्स अलर्ट’ जारी करून आपले ‘ओरुक रेईस’ हे ‘रिसर्च शिप’ दोन जहाजांसह भूमध्य सागरी क्षेत्रात, ग्रीसच्या कॅस्टेलोरीझो बेटानजिक संशोधनासाठी दाखल होत असल्याची एकतर्फी घोषणा केली होती. तुर्कीच्या या घोषणेवर ग्रीससह युरोपीय देश व नाटोकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. ग्रीसने आपला संरक्षणदलांना हाय अलर्ट जारी करत तुर्कीच्या कारवायांची टेहळणी सुरू केली होती. त्यापाठोपाठ ग्रीसने फ्रान्सबरोबर भूमध्य सागरी क्षेत्रात संयुक्त नौदल सरावही केला होता. मात्र ग्रीस नाही उचललेली पावले व त्याला युरोपीय देशांनी दिलेले समर्थन याचा तुर्कीवर काहीही परिणाम झाला नसल्याचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांच्या नव्या घोषणेतून समोर येत आहे.

नौदल सरावाची घोषणा

शनिवारी तुर्की राष्ट्राध्यक्षांनी, ‘ब्लॅक सी’ सागरी क्षेत्रात तब्बल ३२० अब्ज घनमीटर इतका नैसर्गिक इंधनवायू साठा सापडल्याची घोषणा करतानाच, भूमध्य सागरात अजून एक जहाज तैनात करणार असून इंधनाच्या साठ्यासाठी मोहिमांची व्याप्ती वाढविल, अशी धमकीही दिली होती. सोमवारी ‘ओरुक रेईस’ या जहाजाची मोहीम काही दिवसांनी वाढविल्याचे सांगून एर्दोगन यांनी आपली ही धमकी खरी करुन दाखविली. तुर्की राष्ट्राध्यक्षांच्या या घोषणेवर ग्रीसकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली.

नौदल सरावाची घोषणा

एर्दोगन यांच्याकडून मोहीम वाढविण्याची घोषणा झाल्यानंतर, काही तासातच ग्रीसने आपण ‘क्रेटे’ बेटाजवळ नौदल सरावाचे आयोजन करीत असल्याचे जाहीर केले. हा भाग तुर्कीकडून दावा करण्यात येत असलेल्या सागरी क्षेत्रानजीक असल्याने बिथरलेल्या राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी पुन्हा एकदा ग्रीसला धमकावले. ग्रीसच्या हालचाली भूमध्य सागरात अराजकाचे बीज रोवत असून, यापुढे या क्षेत्रात होणाऱ्या सर्व संघर्षांना ग्रीसचा जबाबदार असेल, अशी धमकी तुर्की राष्ट्राध्यक्षांनी दिली.

भूमध्य सागराच्या मुद्द्यावरून ग्रीस व तुर्कीमध्ये चिघळत असलेल्या या तणावामुळे युरोपीय महासंघ व नाटोत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रीस व तुर्कीने परस्परांना सरावासंदर्भात दिलेल्या इशाऱ्यानंतर महासंघाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या जर्मनीने मध्यस्थीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. जर्मनीचे परराष्ट्रमंत्री हैको मास मंगळवारी ग्रीसमध्ये दाखल झाले असून, त्यानंतर ते तुर्कीलाही भेट देतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info